आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तयारी खरिपाची: सात लाख क्विंटल ‘महाबीज’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- राज्यातील शेतकर्‍यांसाठी खुशखबर आहे. ‘महाबीज’ने यंदा राज्यात सात लाख 28 हजार क्विंटल बियाण्यांच्या पुरवठ्याचे नियोजन केले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण अधिक असल्याने राज्यातील शेतकर्‍यांना चालू हंगामात बियाण्यांची कमतरता भासणार नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या महाबीजचे महाव्यवस्थापक पद रिक्त असून, या पदावर नियुक्ती करण्यात आलेले परभणीचे जिल्हाधिकारी डॉ. एस. डी. वानखडे लवकरच रुजू होतील, अशी माहिती कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

राज्यासाठी लागणार्‍या एकूण बियाण्यांपैकी जवळपास 50 टक्के बियाण्यांचा पुरवठा महाबीजतर्फे केला जातो. खरीप हंगामासाठी महामंडळाने एकूण सात लाख 28 हजार क्विंटल बियाण्यांच्या पुरवठ्याचे नियोजन केले असून, जवळपास 93 टक्के बियाण्यांचा तालुका तसेच जिल्हास्तरावर पुरवठा पूर्ण करण्यात आल्याची माहिती महाबीजच्या अधिकार्‍यांनी दिली. उर्वरित बियाण्यांच्या पुरवठ्याचे काम आठवडाभरात पूर्ण करण्याचा विश्वासही अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

महाबीज अद्यापही पोरकेच
राज्यातील बियाण्यांचे सरकारी व्यवस्थापन करणारे महाबीज पोरके असून, खरीप हंगाम 2013 ला सुरुवात झाली असली तरी अद्यापही महाबीजच्या महाव्यवस्थापकपदी कोणीही रुजू झालेले नाही.

विविध योजनेअंतर्गत पुरवठा होणार !
खरीप हंगामासाठी महामंडळाने विविध योजनेअंतर्गत राज्यातील लाभार्थी जिल्ह्यांमध्ये प्राधान्याने बियाण्यांचा पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. यात प्रामुख्याने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना (कडधान्य), गतिमान कडधान्य विकास कार्यक्रम (अ‍े3पी) (वाटप), राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना (संकरित धान), एकात्मिक तृणधान्य विकास कार्यक्रम (सुधारित धान) आदी योजनांचा समावेश आहे.

बियाणे वितरणावर नियंत्रण ठेवायला हवे
मागील वर्षी बियाण्यांचा तुटवडा जाणवला होता. यंदा सात लाखांवर बियाणे राज्यात उपलब्ध होणार असल्याने शेतकरीराजा सुखावेल. वेळेवर बीज न मिळाल्यास शेतकर्‍यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो. महाबीजतर्फे नेहमीच योग्य ते नियोजन केले जाते. मात्र शेतकर्‍यांपर्यंत बीज पोहोचण्यासाठी वितरणावर प्रशासनाच्या नियंत्रणाची गरज आहे.
- प्रकाश मानकर, अध्यक्ष भारत कृषक समाज