आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mohan Bhagwat Call Uddhav Thackeray, News In Marathi

भाजपवर संघाचा दबाव, सरसंघचालकांचा मुंबई दौरा रद्द, उद्धवशी फोनवरून चर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या छुप्या पाठिंब्यावर भाजपने राज्यात सत्ता स्थापन केल्यामुळे रा. स्व. संघात अस्वस्थता असल्याचे समजते. त्यामुळे शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी संघाने भाजपवर दबाव आणला असल्याची चर्चा आहे. त्यासाठीच सरसंघचालक मोहन भागवत सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होते. परंतु, भागवत यांचा मुंबई दौरा रद्द झाल्याने दोघांत फोनवर चर्चा झाल्याचेही वृत्त आहे.

राष्ट्रवादीचा टेकू घेऊन सरकार टिकवण्याच्या भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या भूमिकेवर चहुबाजूंनी टीकेची झोड उठली आहे. संघाचे नेतृत्वही या भूमिकेवर नाराज असल्याचे संघाचे नेते खासगीत बोलत आहेत. भाजप शिवसेनेतील संबंधांवरील अनिश्चिततेचे ढग आणि सरकारवरील टांगती तलवार दूर व्हावी, अशीच संघनेतृत्वाची अपेक्षा असल्याचे सांगितले जात आहे. सरसंघचालक भागवत हे सोमवारी एका कार्यक्रमासाठी मुंबईत जाणार होते. तेव्हाच ही चर्चा होण्याचे आडाखे बांधले जात होते. परंतु, दौरा रद्द झाल्याने दोघांत फोनवरून चर्चा झाली आहे. संघाच्या एका ज्येष्ठ नेत्याने मात्र यासंदर्भात भाष्य करण्यास नकार दिला. संघप्रमुख अशा बाबींत सहभागी होत नसतात, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

दबाव असल्याची भाजप नेत्याची कबुली
राष्ट्रवादीचीमदत घेण्याच्या भूमिकेवर टीकेची झोड उठली असताना शिवसेनेला सोबत घेण्यासाठी भाजपवर दबाव वाढत असल्याची कबुली भाजपच्या प्रदेश स्तरावरील पदाधिकाऱ्यांनीही ‘दिव्य मराठी’ला दिली. राष्ट्रवादीसोबत कदापिही जाणार नाही, असे त्रिवार सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांची क्लिपिंग सोशल मीडियावरून प्रसारित होत असल्याकडेही या नेत्याने लक्ष वेधले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या सहभागाचे सकारात्मक संकेत नागपुरात बोलताना दिले. राजकारणात चर्चेची दारे कधीच बंद होत नाहीत. ही भावना आमच्यासह शिवसेनेतही बळावत असल्याचे सूचक िवधान मुख्यमंत्र्यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यातून शिवसेनेच्या मंत्रिमंडळातील सहभागाबाबत भाजपचे नेतृत्व सकारात्मक असल्याचा स्पष्ट अर्थ काढला जात आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार २५ नोव्हेंबर ते डिसेंबर यादरम्यान केव्हाही होऊ शकतो, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
सरकारमध्ये सहभागासाठी शिवसेनाही उत्सुक
मुंबई फडणवीससरकारने गोंधळात संमत करून घेतलेल्या विश्वासदर्शक ठरावावर आक्षेप घेणारी शिवसेना सरकारमध्ये सहभागी होण्यास आजही उत्सुक आहे. भाजपने राष्ट्रवादीशी जवळीक करून स्वत:च्या पायावर कसा धोंडा पाडून घेतला आहे, असा प्रचार शिवसेना नेत्यांनी अगदी केंद्रीय पातळीवर संघ वर्तुळापर्यंत संपर्क साधून सुरू केला आहे. सरसंघचालक उद्धव यांच्यात यावर चर्चा होणार असल्याच्या बातम्याही शिवसेनेच्या वर्तुळातूनच माध्यमांपर्यंत पुरविण्यात आल्याचे बोलले जाते. सोमवारी शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळी आदरांजली वाहण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह भाजपचे काही नेते शिवाजी पार्कवर येण्याची शक्यता आहे. यातून या जुन्या मित्रपक्षांमध्ये पुन्हा मनाेमिलनाचे सूर जुळण्याची शक्यताही राजकीय वर्तुळात बोलली जात आहे.