Home | Maharashtra | Vidarva | Akola | night police patrolling with public in akola

घरफोड्या रोखण्यासाठी पोलिसांसमवेत नागरिकांचीही पेट्रोलिंग

प्रतिनिधी | Update - Jul 20, 2013, 10:07 AM IST

शहरात वाढलेल्या घरफोडया रोखण्यासाठी शहरात ‘सिटीझन पोलिसिंग’चा उपक्रम राबवण्यात येत आहे.

 • night police patrolling with public in akola

  अकोला - शहरात वाढलेल्या घरफोडया रोखण्यासाठी शहरात ‘सिटीझन पोलिसिंग’चा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये नागरिक आणि पोलिस संयुक्तपणे सहभागी होत आहेत. यासाठी खदान, गोरक्षणरोडवरील परिवार कॉलनी, आसरा कॉलनी, टेलिकॉम कॉलनी, निवारा कॉलनी, केशवनगर, माधवनगर भागातील युवकांनी पुढाकार घेतला आहे.

  अलीकडच्या काळात शहरात चोरी, घरफोडी, लुटमार यांसारखे संपत्तीचे गुन्हे घडण्याचे प्रकार वाढले आहेत. मागील 20 दिवसांत सर्वात जास्त घरफोडीच्या घटना खदान पोलिस ठाण्यांतर्गत घडल्या. या सर्व घटना भरदिवसा घडल्या, हे येथे उल्लेखनीय. या घटनांमध्ये घरफोड्यांनी सोने, चांदीच्या दागिन्यांवरच हात साफ केले.

  या घरफोडीच्या घटना रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने आखलेल्या ‘अँक्शन प्लॅन’चा चोरट्यांनी धुव्वा उडवल्याने आता नागरिकच पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून घरफोडी रोखण्यासाठी सज्ज झाले आहेत. पोलिसांचेही त्यांना उत्स्फूर्त सहकार्य मिळत आहे.

  बाहेरगावी जाताना
  घरफोडी रोखण्यासाठी पोलिस प्रयत्न करीत आहेत. नागरिकांनीही खबरदारी घेणे आवश्यक आहे. बाहेरगावी जाण्यापूर्वी नागरिकांनी संपर्क साधल्यास त्यांच्या घराच्या परिसरात अधिक गस्त घालण्यात येईल. ’’ शैलेश सपकाळ, ठाणेदार.

  असा आहे उपक्रम
  सिटीझन पोलिसिंगचा उपक्रम गोरक्षणरोडवरील परिवार कॉलनी, आसरा कॉलनी, टेलिकॉम कॉलनी, निवारा कॉलनी, केशवनगर, माधवनगरात राबवण्यात येत आहे. यामध्ये 25 स्थानिक नागरिक सहभागी होतात तसेच 15 पोलिस त्यांना सहकार्य करतात. या सर्व 40 जणांचे आठ गट तयार करण्यात आले आहेत.

  अशी होते अंमलबजावणी
  सिटीझन पोलिसिंगअंतर्गत तयार केलेले गट सकाळी 10 ते 4 या दरम्यान परिसरात गस्त घालतात. हे गट परिसरातील कुलूप असलेल्या घरांची चौकशी करतात. घरमालकांचा संपर्क क्रमांक मिळवतात. घरातील मंडळी परत केव्हा येणार, याबाबत पोलिस विचारणा करतात. या सर्व संभाषणाची पोलिस डायरीत नोंद करतात.

  ..रात्री घरांवर ‘लक्ष’
  रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांना कुलूप असलेल्या घरांची यादी दिली जाते. पोलिस या घरांवर विशेष लक्ष ठेवतात. चार ते पाच वेळा या घरांच्या परिसरात गस्तही घालण्यात येते.

  नागरिकांचा पुढाकार
  तीन दिवसांपूर्वी खदान पोलिसांनी नागरिकांची बैठक घेतली. बाहेरगावी जाण्यापूर्वी नागरिकांनी त्याची पूर्वकल्पना पोलिसांना द्यावी, असे पोलिस अधिकार्‍यांनी या बैठकीत सांगितले. त्यानुसार बाहेरगावी गेलेल्या पाच कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली आहे.

Trending