आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prediction Of Bhendwal Says Monsoon Will Be Good This Year

भेंडवळची भविष्यवाणी : पीकपाणी उत्तम, पण प्रलयाची भीती; मंदीचे सावट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - देशातील पीकपाण्याची स्थिती उत्तम राहणार असून पावसाळ्यातील पहिला महिना वगळता अन्य तीन महिन्यांत दमदार पाऊस पडणार अाहे. प्रसंगी जलप्रलय येऊन जीवितहानीची भीतीही अाहे. देशाच्या अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट राहील, तसेच परकीय घुसखाेरीची डाेकेदुखी कायम राहील. राजसत्तेला काेणताही धाेका नाही, मात्र देशात राजकीय वादंगाचे सावट राहील. बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ (ता. जळगाव जामाेद) येथे साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेल्या घटमांडणीचे भाकीत गुरुवारी पहाटे वर्तवण्यात अाले.

चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि शारंगधर महाराज यांनी अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयी नरहरी शिवराम वाघ यांच्या शेतात मांडलेल्या या घटमांडणीतून नैसर्गिकरीत्या झालेल्या बदलांवर आधारित हे भाकीत वर्तवले. ही ‘भविष्यवाणी’ एेकण्यासाठी विदर्भ आणि खान्देश पट्ट्यातील सीमावर्ती भागातील जवळपास पाच हजार शेतकरी उपस्थित होते. बुलडाणा, जळगाव खान्देश व मध्य प्रदेशलगतच्या आदिवासी पट्ट्यातील शेतकरी वर्गाची भेंडवळच्या या घटमांडणीच्या भाकीतावर मोठी श्रद्धा असून या भाकीताच्या आधारेच ते खरीप, रब्बी पिकांचे नियोजन करतात.

पाडव्यालाही घटमांडणी
दोन पद्धतीमध्ये ही घटमांडणी होते. गुढीपाडव्याच्या दिवशी भाकीत वर्तवणारे महाराज हे गावातील मारुती मंदिराच्या पारावर घटमांडणी करतात. त्यानंतर नऊ दिवस जंगलात तथा अन्य गावात जाऊन भिक्षा मागून मिळेल तेवढेच अन्न ते खातात. या काळात ते कोणाशीही बोलत नाहीत. रामनवमीच्या दिवशी गावात ते परत येऊन घटमांडणीचे निरीक्षण करतात. मात्र, हे निरीक्षण जाहीर करत नाहीत. अक्षय्य तृतीयेच्या घटमांडणीचे भाकीत ते जाहीर करतात.

साडेतीनशे वर्षांची परंपरा
शेतकऱ्यांच्या आस्था आणि श्रद्धेच्या कसोटीवर आपलीशी वाटणारी भेंडवळची घटमांडणी साडेतीनशे वर्षांपूर्वी सुरू झाली आहे. पुरातन नीलवती विद्येचे जाणकार असलेले चंद्रभान महाराज यांनी ही परंपरा सुरू केली. परंपरागत ज्ञान, निसर्गाशी जुळलेली नाळ आणि अनुभवाच्या जोरावर त्यांनी ही भाकिते वर्तवली. सोबतच पशुपक्ष्यांचे निसर्गासंदर्भातील संकेत अभ्यासून त्यांनी भाकिते वर्तवली होती. त्यांच्या पिढीअंतर्गतच सध्या ही परंपरा आहे. रामदास महाराज वाघ यांचे निधन झाल्यानंतर सध्या पुंजाजी महाराज गतवर्षीपासून भाकिते वर्तवत आहेत. त्यांची ही अकरावी पिढी आहे.

नैसर्गिक संकटाची भीती
या घटमांडणीत वेगवेगळ्या वस्तू प्रतीकात्मक स्वरूपात मांडलेल्या असतात. पृथ्वीचे प्रतीक असलेली पुरी तुटलेली व घटाबाहेर अाल्याचे दिसून अाले. त्यावरून देशात महापूर, सुनामीसारखी आपत्तीचा अंदाज वर्तवण्यात अाला. घटातील पाण्यात मुंग्या मृत आढळल्याने किनारपट्टीच्या भागात जीवितहानी होण्याचे भाकीत वर्तवण्यात आले आहे.

अन्नाची नासाडी हाेण्याचे संकेत
पावसाळा चांगला राहणार असून पहिल्या महिन्यात तुलनेने कमी, उर्वरित तीन महिन्यांत तो दमदार असला तरी अवकाळीचा फटका व प्रसंगी जलप्रलयाची भीती अाहे. अन्नाच्या नासडीची शक्यता आहे. खरीप पीक चांगले राहील, तरी उडीद, मूग, गहू, हरभरा ही पिके मोघम व अनिश्चित राहतील. तांदळाचे पीक तेजीत राहील.

घुसखोरीचा धोका देशापुढे कायम
घटातील सुपारी राजाचे व पानविडा राजगादीचे प्रतीक असते. या वर्षी सुपारी पानावर असली तरी त्यावर माती आहे. त्यामुळे राजसत्ता कायम राहील मात्र राजकीय वाद हाेतील. घटातील मसुरी शत्रू सैन्याचे प्रतीक असून करडई संरक्षण यंत्रणा दर्शवते. नैसर्गिकरीत्या यामध्ये झालेले बदल पाहता शत्रूची घुसखोरी सत्ताधाऱ्यांना डोकेदुखी राहणार आहे.

अशी असते घटमांडणीची पद्धत
सात फूट व्यासाचा गोलाकार घट अक्षय्य तृतीयेला सूर्यास्तसमयी तयार करण्यात येतो. यामध्ये १८ प्रकारची धान्ये समान अंतरावर ठेवण्यात येतात. अंबाडी (दैवत), कपाशी, ज्वारी, तूर, मूग, उडीद, तीळ, भादली, बाजरी, हिवाळी मूग, साळी (तांदूळ), जवस, लाख, वाटाणा, गहू, हरभरा, करडी (संरक्षण यंत्रणा), मसूर (शत्रू) ठेवण्यात येते. घटाच्या मध्यभागी दोन फुटांचा खड्डा खोदून त्यात मातीची चार ढेकळे (पावसाळ्याचे चार महिने) त्यावर पाण्याने भरलेला करवा (मातीचे भांडे) ठेवण्यात येते. त्यावर वडा, भजा, करंजी, पुरी, सांडोळी, कुरडई, पापड, पानविडा सुपारी ठेवण्यात येते. दुसऱ्या दिवशी नैसर्गिकरीत्या झालेले बदल बघून त्याच्या आधारावर हे भाकीत वर्तवण्यात येते. प्रत्येक धान्य व अन्नपदार्थ हे कोणत्या न कोणत्या बाबीचे प्रतीक म्हणून ठेवण्यात येते.

बियाणे कंपन्यांचे मार्केटिंग
हे भाकीत कितपत सत्यात उतरते हे काेणीही सांगू शकत नसले, तरी लाखाे शेतकऱ्यांचा त्यावर विश्वास अाहे. विदर्भ, खान्देश आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागातील शेतकरी, आदिवासी या भाकीताच्या आधारावरच खरिपाचे नियोजन करत असतात. शेतकऱ्यांची हाेणारी गर्दी पाहता दहा वर्षांपासून बियाणे कंपन्यांनी या ठिकाणी मार्केटिंग सुरू केले.

ठोकताळ्यांत सत्यांश
गतवर्षी देशात सत्तांतर होईल, मात्र ते अस्थिर राहील, असे भाकीत केले होते. सत्तांतर झाले मात्र सरकार स्थिर आहे. लहरी हवामानाचा फटका पिकांना बसेल, असे सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपिटीचा माेठा फटका बसला.

काय सांगते हवामानशास्त्र?
देशात सरासरीच्या 93 टक्के पाऊस पडेल, असा पहिला अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (अायएमडी) ने बुधवारी जाहीर केला, तर ‘स्कायमेट’ या खासगी संस्थेनेही देशात १०२ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला अाहे.

भाकीत अशास्त्रीय पद्धतीने
^भेंडवळ येथील घटमांडणीचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास झालेला नाही. हे भाकीत त्यांच्या पारंपरिक ज्ञान व अनुभवाच्या आधारावर वर्तवण्यात येते. अशास्त्रीय पद्धतीवर ते अवलंबून आहे.
डॉ. सी. पी. जायभाये, कृषी संशोधक, पीकेव्ही संशोधन केंद्र