आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काॅलेजात लुटीची ‘शाळा’,१०० ते ५०० रुपयांपर्यंत करण्यात येतेय प्रॉस्पेक्ट्सची विक्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महाविद्यालयांमध्ये अनधिकृतपणे अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. २० रुपये किमतीचा प्रवेश अर्ज विद्यार्थ्यांना १०० ते ५०० रुपयांपर्यंत प्रॉस्पेक्ट्सच्या माध्यमातून विकल्या जात आहे. एक महाविद्यालय २०० प्रवेशांसाठी एक हजार प्रॉसपेक्ट्सची विक्री करते. काही महाविद्यालयांमध्ये प्रवेशापूर्वीच लाखो रुपयांची कमाई विद्यार्थ्यांच्या जीवावर होत आहे. त्यामुळे दुष्काळी जिल्ह्यात एक-एका विद्यार्थ्याला प्रॉस्पेक्टसच्या माध्यमातून हजार रुपयांपर्यंत खर्च येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या नियमांना हरताळ फासण्याचे प्रकार अकोल्यात राजरोसपणे घडत आहे. त्याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्यामुळे प्रवेश शुल्काच्या नावाखाली डोनेशन पद्धतीचे पेव फुटले आहे. शहरात दरवर्षी अकरावी प्रवेश प्रक्रिया राबवताना कनिष्ठ महाविद्यालयांची चांदी होत आहे. महाविद्यालयाची संपूर्ण माहिती असलेली माहिती पुस्तिका म्हणजेच प्रॉस्पेक्टसमध्येच प्रवेश अर्ज दिल्या जातो. या प्रवेश अर्जाची २० रुपये किंमत आहे. मात्र, २० रुपये किमतीच्या अर्जासाठी विद्यार्थ्यांना १०० ते ५०० रुपयांपर्यंतचे प्रॉस्पेक्टस विकत घ्यावे लागते. एक विद्यार्थी प्रवेश मिळावा म्हणून अनेक महाविद्यालयांमध्ये प्रवेश अर्ज करतो. त्यासाठी त्याला एकापेक्षा अनेक महाविद्यालयांचे प्रॉस्पेक्टस विकत घ्यावे लागतात. आधीच जिल्ह्यात दुष्काळ असताना विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जासाठी १०० रुपयांचे प्रॉस्पेक्टस विकत घ्यावे लागते.
अकोल्याला ऑनलाइन का नाही? : ऑनलाइनप्रवेश पद्धतीत डोनेशनचा प्रश्न येत नाही. प्रत्येकाला संधी मिळते. मेट्रोसिटीमध्ये ऑनलाइन प्रवेश करता येतात हे चुकीचे आणि तथ्यहीन आहे. त्याला काहीही आधार नाही, अशी प्रतिक्रिया सहायक शिक्षण उपसंचालक सुशीलकुमार पाटील यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना दिली. अमरावतीमध्ये अकरावीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होतात, मग अकोल्यात का नाही, असे ते म्हणाले. ऑनलाइन प्रवेशासाठी शिक्षण विभाग आणि मुख्याध्यापकांनी पुढाकार घेणे आवश्यक असते. ज्या महाविद्यालयांमध्ये कमी प्रवेश होतात. त्यांनी एकत्र येऊन ऑनलाइनसाठी आग्रह धरावा. अकोल्यात पाच-दहा महाविद्यालयांचा ऑनलाइन पद्धतीला विरोध असू शकतो. मात्र, शिक्षण विभाग आणि इतर महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांचा विरोध असण्याचे कारण नाही. अकोल्यात पुढील वर्षी ऑनलाइन पद्धतीनेच प्रवेश होतील, अशा सूचना देण्यात येणार आहेत. प्राचार्यांना प्रवेशाचा अधिकार असला, तरी शिक्षण विभागाचे त्यावर नियंत्रण ठेवावेच लागते. ज्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश मिळत नसेल, त्यांनी शिक्षण विभागाशी संपर्क साधावा, असेही सुशीलकुमार पाटील म्हणाले.

फिशरीज, इलेक्ट्राॅनिक्स फसवे; "नीट'शी काहीही संबंध नाही
^अकरावीत फिशरीजला प्रवेश म्हणजे मेडिकलला प्रवेश, हा विद्यार्थी आणि पालकांचा गैरसमज दूर केला पाहिजे. फिशरीजला प्रवेश घेतल्यास बारावीची टक्केवारी वाढते. मात्र, या वाढलेल्या टक्केवारीचा नीट एमएचसीईटी या परीक्षेशी काहीही संबंध नाही. '' प्रा. नितीन ओक

प्राॅस्पेक्ट्स विक्री नकोच, फक्त प्रवेश अर्जच द्यावेत!
^प्रॉस्पेक्टस छापण्यासाठी जेवढा खर्च आला असेल तेवढीच रक्कम आकारल्यास ओरड होणार नाही. मात्र, १०० ते ५०० रुपयांपर्यंत प्रॉस्पेक्टसची विक्री ही गंभीर बाब आहे. २० रुपयांपर्यंत प्रवेश अर्जाची किंमत असावी.महाविद्यालयांनी माहिती नोटीस बोर्डवर लावावी. '' सुशीलकुमार पाटील, सहायकशिक्षण उपसंचालक, अमरावती

महाविद्यालयांची सविस्तर माहिती प्रॉस्पेक्टसमध्ये असते. या माहितीशी विद्यार्थ्यांना प्रवेशापूर्वी काहीही संबंध नाही. प्रत्येक शाखेची माहिती नोटीस बोर्डवर महाविद्यालयांनी लावल्यास १०० रुपयांचे प्रॉस्पेक्ट घेण्याची त्यांना गरज भासणार नाही. मात्र, प्रवेशाच्या माध्यमातूनही कमाई करण्याची संधी महाविद्यालये सोडत नसल्यामुळे प्रॉस्पेक्टसच्या माध्यमातून लाखो रुपये उकळण्याचा प्रकार सुरू आहे. महाविद्यालयांची जाहिरातच विद्यार्थ्यांच्या पैशातून सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
बातम्या आणखी आहेत...