आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकारी म्हणतात, केंद्रीय प्रवेश पुढील वर्षी,तिढा अकरावीचा; डाेनेशन मागणाऱ्यांची तक्रार करा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अकोल्यात अकरावी प्रवेशाचा तिढा चिघळत चालला आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी हे प्रवेश केंद्रीय पद्धतीनेच व्हावेत, अशी विद्यार्थी, पालकांची अपेक्षा आहे. या मागणीसाठी विद्यार्थी संघटनाही रस्त्यावर उतरत आहेत. या प्रश्नी सक्षम जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे. यासंदर्भात आज त्यांची भूमिका जाणून घेतली असता त्यांनीही पुढील वर्षीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने करू, असे सांगितले. गैरप्रकाराबद्दल विचारले असता त्यांनी डोनेशनची तक्रार थेट माझ्याकडे करा, कारवाई होईल, असे स्पष्ट केले.
अकरावी प्रवेशात महाविद्यालये आणि ट्युशन क्लास यांच्यातील युतीमुळे मनमानी कारभार सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांची लूट सुरू आहे. ट्युशन क्लाससाठी आजूबाजूच्या जिल्ह्यातील हजारो मुले अकोल्यात प्रवेश घेत आहेत. त्यांची माहिती पत्रकाच्या किमतीपासून लूट सुरू आहे. आम्ही सांगतो तेथे डोनेशन देऊन प्रवेश घ्या, कॉलेजला जाता फक्त क्लास करा आणि गुण मिळवा, असा प्रकार सुरू आहे. यावर पारदर्शक अशी केंद्रीय प्रवेश पद्धत हाच मार्ग आहे. ती लागू व्हावी यासाठी “दिव्य मराठी’ने पुढाकार घेतला आहे. त्याला विद्यार्थी पालकांचा जोरदार प्रतिसाद मिळत असून, विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. हा प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची मागणी होत आहे. वैधानिक विकास मंडळाचे माजी सदस्य संजय खडक्कार यांनीही तशी विनंती केली आहे.

या प्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांची बाजू जाणून घेतली असता त्यांनी सांगितले की मी माहिती घेतली, पण तांत्रिक बाबीमुळे ही प्रवेश पद्धती या वर्षी लागू करणे शक्य नाही, असे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे, मी पण याच मताचा आहे. मात्र, पुढील वर्षी ही पद्धती लागू करण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले जातील. सध्या सुरू असलेल्या गैरप्रकाराबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की विद्यमान पद्धतीमध्ये आर्थिक फसवणूक नाकारता येत नाही. पण, कोणाचीही फसवणूक होऊ नये यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. याउपरही कोणी डोनेशन मागत असेल तर थेट माझ्याकडे तक्रार करा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
बातम्या आणखी आहेत...