आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 15 Thousand Rupees Bribe Taker Suspended Head Constable

१५ हजारांची लाच घेणारा हेडकॉन्स्टेबल निलंबित, ठाणेदाराची उचलबांगडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- विनयभंगाच्याप्रकरणात १५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या बार्शिटाकळी पोलिस ठाण्यातील हेडकॉन्स्टेबल संजय लांडे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केल्यानंतर बुधवारी त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली, तर ठाणेदार प्रकाश निंघोट संशयाच्या घेऱ्यात आल्याने त्यांची उचलबांगडी करण्यात आली.
बार्शिटाकळी ठाणेदाराचे पितळ "दिव्य मराठी'ने उघडे पाडल्यानंतर त्यांना कंट्रोलरूमला अटॅच करण्यात आले आहे. ठाणेदार प्रकाश निंघोट संशयाच्या घेऱ्यात आल्याने बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली. प्राध्यापक महिलेची विनयभंगाची तक्रार दाखल करणे, प्रकाश निंघोट यांच्या चांगलेच अंगलट आले. "दिव्य मराठी'ने वस्तुस्थिती मांडल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

बार्शिटाकळी येथील एका शिक्षण संस्थाचालकाविरोधात विनयभंगाची तक्रार देण्यासाठी एक महिला प्राध्यापक १९ ऑगस्ट रोजी पोलिस ठाण्यात गेली होती. मात्र, विवाहितेने पुराव्यानिशी म्हणजेच ऑडिओ टेप दिल्यानंतरही पोलिसांनी तक्रार घेऊन गुन्हा दाखल केला नाही. त्यानंतर महिला प्राध्यापक आणि त्यांचा पती हे वारंवार पोलिस ठाण्यात गेले. मात्र, त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन हेडकॉन्स्टेबल संजय लांडे याने गुन्हा दाखल करण्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी केली. पाच हजार रुपये संजय लांडे यास दिल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपपत्र पाठवणे माझ्याच हातात आहे, असा धाक दाखवत संजय लांडे याने पुन्हा १० हजार रुपयांचा तगादा तक्रारदारास लावला. या प्रकरणाचे सर्व रेकॉडिंग तक्रारदाराकडे असल्यामुळे त्यांनी २० सप्टेंबर रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यावरून एसीबीने सापळा रचून संजय लांडे याला मेडिकल कॉलेजमधून अटक केली होती. लांडे याच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांनी त्याला २३ सप्टेंबर रोजी निलंबित केले आहे, तर ठाणेदार प्रकाश निंघोट यांची उचलबांगडी केली आहे.