अकोला- स्वस्तधान्य दुकानातील गहू अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकण्यासाठी आणला असता, पोलिसांनी अडत दुकानाच्या बाहेरच गव्हाने भरलेल्या वाहनावर छापा टाकला. या वेळी पोलिसांनी ३४ पोते गहू आणि वाहन जप्त केले आहे. याप्रकरणी गव्हाचा मालक आणि वाहनाचा चालक यांना अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
गहू बार्शिटाकळीतील हलपुरा येथील अब्दुल अजीम अब्दुल अजीज हा थेट कउबासमध्ये विक्रीसाठी आणत असल्याची माहिती रामदासपेठ पोलिसांना मिळाली. त्यावरून त्यांनी मंगळवारी कृषी उत्पन्न बाजार समिती गाठली. येथे त्यांना हुसे यांच्या अडत दुकानासमोर एम.एच. ३० एबी ८८२ क्रमांकाचे पीकअप वाहन उभे असलेले दिसले. या वाहनामध्ये ३४ पोते गहू होता. याविषयी पोलिसांनी चौकशी केली असता, वाहनचालक मनोहर श्रीराम भवाने रा. बार्शिटाकळी याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यांनी सखोल चौकशी केली असता हा गहू दुकानातील असल्याचे चौकशीत समजले. त्यामुळे पोलिसांनी गव्हाचा मालक, चालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.