आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इम्पॅक्ट : संत चोखा जन्मस्थळासाठी 5 कोटी, 50 लाख मार्चपूर्वीच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देऊळगावराजा - बाराव्या शतकातील संत चोखोबा यांचे जन्मस्थळ अद्यापही उपेक्षित असल्याची खंत व्यक्त करून सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी या जन्मस्थळाचा विकास करण्यासाठी मार्चपूर्वीच ५० लाख रुपयांचा निधी देणार असून, एप्रिलनंतर पुन्हा पाच कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच ५० लाखांचा निधी मार्चपर्यंत खर्च करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिले.

मेहुणाराजा येथे गुरुवारी संत चोखा मेळा यांचा ७४८ वा जन्मोत्सव सोहळा आयोजित केला. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर होते. खासदार प्रतापराव जाधव, जन्मस्थळाचे मुख्य प्रवर्तक आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. चोखोबाच्या काळात जातीय व्यवस्था ही अतिशय शिगेला पोहोचली होती. माणसात परमेश्वर असल्याची शिकवण देणारी आपली संस्कृतीसुद्धा जातीपातीत विभागली गेली होती. बहुजन समाजात जन्माला आलेले संत चोखोबा एकमेव संत होते. परंतु, त्यांची शिकवण आजच्या काळामध्ये जोपासली जात नसल्याची खंत मंत्री बडोले यांनी व्यक्त केली. संत चोखा मेळा यांची समाधी जीर्ण अवस्थेत राहणार नाही, यासाठी मार्चपूर्वी ५० लाख रुपये देणार आहे, तर एप्रिलमध्ये पाच कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. तसेच संत चोखा मेळा यांच्या जन्म दिनानिमित्त राज्यातील पाच लोकांना पुढील वर्षीपासून संत चोखामेळा समाज सेवा पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच देऊळगावराजा येथे मागासवर्गीय मुलीचे वसतिगृह मंजूर झाले नसेल, तर ते तत्काळ मंजूर करून निधीची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी दादाराव मसूदवाले यांनी केले. सूत्रसंचालन बबनराव कुमठे यांनी केले, तर व्ही. एस. जाधव यांनी आभार मानले.

विशेष घटक योजनेतून विकास आराखडा तयार करावा : १९७२ साली या जन्म स्थळाचा विकास आराखडा तयार झाला आहे. तेव्हापासून हा आराखडा रेंगाळत पडला आहे. विशेष घटक योजनेतून हा विकास आराखडा तयार करावा, अशी मागणी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

सकाळी झाली शासकीय महापूजा : संत चोखोबाच्या जन्मस्थळी आज सकाळी साडेसात वाजता शासकीय महापूजा आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, जिल्हा परिषद अध्यक्षा अलका खंडारे यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी सीईओ दीपा मुधोळ, सभापती गणेश बस्सी, आशाताई झोरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग, गटविकास अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मोकाटे, दादाराव मसूदवाले, डी. एस. दराडे, सरपंच राधाबाई कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

तीर्थक्षेत्राला वर्ग दर्जा द्यावा
संत चोखा मेळा यांनी वर्ण व्यवस्थेवर परखडपणे लिखाण केले. त्या काळात वर्ण व्यवस्थेतील असलेले दोष आपल्या अभंगातून मांडले. त्यामुळे या तीर्थक्षेत्राला वर्गाचा दर्जा देण्यात यावा. त्याला पर्यटनाचा वर्ग दर्जा मी देईन, अशी घोषणा खासदार प्रतापराव जाधव यांनी केली.
पंढरपुरातून अस्थी आणून समाधी बांधणार : नागरे
पंढरपूरयेथील विठ्ठल मंदिराच्या पायथ्याशी संत चोखोबा यांच्या अस्थी ठेवण्यात आल्या आहेत. या अस्थी काढून सन्मानाने त्यांची समाधी बांधणार असल्याचे प्रदीप नागरे यांनी सांगितले.

छायाचित्र: मेहुणा राजा येथे संत चोखामेळा यांच्या पुतळयाचे दर्शन घेताना सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले.
बातम्या आणखी आहेत...