आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलडाणा कृषी पर्यटनासाठी आणखी ५० लाखांचा निधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - बुलडाणा येथील सरकारी तलावावरील कृषी पर्यटन केंद्रासाठी ५० लाख रुपये देण्यात आले असून, पुन्हा ५० लाख रुपये अधिकचा निधी देण्यात आला अाहे. तसेच बुलडाणा शहरातून जाणाऱ्या वळण रस्त्यालाही वळण दिले जाईल, अशी माहिती देतानाच जिल्हा नियोजन समितीने विविध विभागांना प्रस्तावित केलेल्या नियतव्ययानुसार विभागांनी कामे केली पाहिजेत. आपल्या विभागाकडील नियोजन समितीमधील मंजूर कामे विहीत मुदतीत पूर्ण करावीत, अशा सूचना पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात सोमवार, २८ सप्टेंबर रोजी जिल्हा नियोजन समितीची सभा घेण्यात आली. या वेळी अध्यक्षस्थानावरून आढावा घेताना पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी खासदार प्रतापराव जाधव, खासदार रक्षाताई खडसे, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ, जिल्हा परिषद अध्यक्षा अलकाताई खंडारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्ह्यातील आणि वर्ग तीर्थक्षेत्रांचा अखर्चित असलेला निधी तातडीने कामांचे नियोजन करून खर्च करण्याचे आदेश देऊन पालकमंत्री खडसे म्हणाले की, बुलडाणा जिल्ह्यात राज्यात सर्वात जास्त तीर्थक्षेत्र विकास निधी मिळतो. या माध्यमातून तीर्थक्षेत्रासोबतच परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होऊ शकतो. ते पुढे म्हणाले की, मोताळा तालुक्यातील खरेदी-विक्री संघाची जमीन कवडीमोल भावाने विकता पणन संचालकांच्या मान्यतेनंतर तिथे प्रशासकीय संकुल बनवता येईल. या तालुक्यात जास्तीत जास्त दूध डेअरी आहेत. त्यामुळे दूधाचे संकलन जास्त आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांसाठी वैरण विकास कार्यक्रम राबवण्यात येईल. तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना गायी, म्हशींसाठी ५० टक्के अनुदान, ४० टक्के कर्ज आणि केवळ १० टक्के लाभार्थी हिस्सा घेऊन देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच उत्पन्नाचे साधन मिळणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदान २५ टक्के कर्ज देण्यात येऊन गाय, म्हैस दिल्या जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीस यांची उपस्थिती
बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा नियोजन अधिकारी सेडाम यांनी केले. या बैठकीला आमदार पांडुरंग फुंडकर,आमदार चैनसुख संचेती, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार डॉ. संजय रायमूलकर, आमदार आकाश फुंडकर, आमदार हर्षवर्धन सपकाळ, आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, आमदार राहुल बोंद्रे, जिल्हा परिषदचे सभापती, सदस्य, लोकप्रतिनिधी, विभागप्रमुख, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

जिल्हा बँकेच्या दोषींवर कारवाई करणार
बुलडाणाजिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या परिस्थितीसाठी जबाबदार असणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी या वेळी दिला.

नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र निमगावला
नांदुरायेथील ग्रामीण रुग्णालयास तातडीने जमीन उपलब्ध करून तिथे ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती करावी. सद्य:स्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय सुरू करावे आणि नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव येथे स्थलांतरित करण्यात यावे, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी या वेळी त्यांनी दिल्या.

बिनविरोध ग्रामपंचायतींना दहा लाख रुपये
नुकत्याचपार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या ग्रामपंचायतींना प्रत्येकी दहा लाख रुपये देण्यात येणार आहेत. या निधीमधून ग्रामपंचायतींनी विकास कामे करावयाची आहेत, असेही पालकमंत्री खडसे यांनी या नियोजन बैठकीत सांगितले.

"दिव्य मराठी' इम्पॅक्ट
"दिव्यमराठी'ने नियोजनाच्या आराखड्यासंदर्भात शनिवार, २६ सप्टेंबरच्या अंकात वृत्त प्रकाशित केले होते. त्या वृत्ताची दखल या बैठकीत घेण्यात आली. पर्यटन केंद्रासाठी अधिक ५० लाख रुपये मिळाले. तसेच काम नियतवेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. कामांना मान्यता मिळाल्याने कामे प्रलंबित असल्याचे "दिव्य मराठी'च्या वृत्तात म्हटले होते.