आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडीच कोटी रुपयांच्या मांडुळासह चौघांना अटक, वन विभागाची कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - दुर्धर आजारावरील औषंधासाठी तसेच गुप्त धनाच्या शोधासाठी मांडूळ जातीच्या सापाला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड मागणी असल्याची चर्चा आहे. हा कोट्यवधी रुपयांचा 'मांडूळ' अकोल्यातील चौघे जण अडीच कोटी रुपयांमध्ये विक्री करण्यासाठी दर्यापूरपासून जवळच असलेल्या दहीहंडा गावाजवळ गेले असता सापळा रचून बसलेले अमरावती एलसीबीचे पोलिस व वन विभागाच्या पथकाने या चौघांना शनिवारी दुपारी रंगेहाथ पकडलेे.

 

कारवाईदरम्यान एक जण पळून गेला. पकडलेल्या चौघांकडून पोलिसांनी मांडूळ तसेच चार वाहने जप्त केली आहेत. या कारवाईमुळे मांडूळांची तस्करी करणारे मोठे राॅकेट उघडकीस येण्याची शक्यता बळावली आहे.


अ. हनिफ अ. हबीब (३६,रा. गुलजारपुरा, अकोला), गवर शहा कादर शहा (४७,रा. अकोट रोड, अकोला), अफझल हुसेनअली मियाज अली (५९, रा. अकोटफैल, अकोला) आणि तस्लीम शहा लुकमन शहा (३५, रा. टाकळी, अकोला) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. एक जण पसार झाला आहे. या चौघांविरुद्ध दर्यापूर पोलिस ठाण्यात शनिवारी उशिरा रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अकोला येथील हे चौघे मांडूळ जातीच्या साप विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती वन विभाग व पोलिसांना मिळाली होती. यापूर्वी त्यांनी अशाप्रकारे साप विक्री केल्याचा संशय पोलिसांनाही आला होता. त्यामुळे मागील तीन ते चार दिवसांपासून पोलिस व वन विभागाच्या पथकाने या टोळीचा माग सुरू केला होता. दरम्यान, पोलिस व वन विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांनी 'डमी' ग्राहक बनून अकोल्यातील या टोळीसोबत संपर्क साधला. या टोळीने मांडूळ असल्याचे सांगून त्यासाठी तब्बल पाच कोटी रुपये किंमत मोजावी लागेल, असेही सांगितले. मात्र व्यवहार करत असताना तडजोडीअंती हा व्यवहार अडीच कोटी रुपयांवर ठरला. व्यवहार ठरल्यामुळे शनिवारी दुपारी दर्यापूर ते अकोला मार्गावरील चोहोट्टा बाजार, दहीहांडा येथील पुलाजवळ साप घेऊन या आणि त्याच ठिकाणी रक्कम देऊ असे बोलणे झाले. ठरल्याप्रमाणे पोलिस व वन विभागाचे दोन डमी ग्राहक पुलाजवळ गेले. त्याचवेळी एका कारमध्ये चार व्यक्ती मांडूळ साप घेऊन आले. तसेच एक जण दुचाकीने आला होता. यांचा देवाण घेवाणीचा व्यवहार सुरू असतानाच दबा धरून बसलेल्या पोलिस व वन विभागाच्या पथकाने या टोळीला पकडले.

 

त्यावेळी टोळीतील सर्वांनीच पळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिस व वन विभागाच्या पथकाने त्यांना पकडले. दरम्यान, पोलिसांनी मांडूळ सापाला वन विभागाच्या ताब्यात दिले. ही कारवाई वाइल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो, मंुबई, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची चमू तसेच परतवाडा वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यासह स्थानिक गुन्हे शाखेचे संतोष मुंदाने, योगेश सांभारे, त्र्यंबक मनोहरे, प्रवीण अंबाडकर आदींनी केली आहे.

 

मांडूळ आला कुठून?
मांडूळ साप दुर्मिळच आहे. असे असतानाही अकाेल्यातील या टोळीने हा साप विक्रीसाठी आणला आहे. त्या टोळीमध्ये अजून काही सहकारी आहेत का? ते हा साप कुठून आणतात, अशी सखोल माहिती वन विभाग घेणार अाहे. या सापाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असल्याचे वन विभागाच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

 

मांडुळाला जागतिक बाजारात मोठी मागणी
मांडूळ हा साप दुतोंड्या तसेच 'मातीखाया' या नावानेही ओळखला जातो. या सापाची आंतरराष्ट्रीय बाजारात छुप्या पद्धतीने प्रचंड मागणी आहे. त्यामुळे मांडुळाची तस्करी कोट्यवधी रुपयांमध्ये केली जाते. दुर्धर आजारांचे औषध तयार करण्यासाठी मांडुळाचा वापर होत असल्याची चर्चा आहे. तसेच गुप्त धन शोधण्यासाठी मांडूळ महत्त्वाचा असल्याची अंधश्रद्धा असल्याचे आजच्या घटनेनंतर बोलले जात आहे. 

बातम्या आणखी आहेत...