आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'सर्वोपचार' मध्ये सिटी स्कॅननंतर तिसऱ्या दिवशी रिपोर्ट, मग उपचार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- रुग्णाचे सीटीस्कॅन केल्यानंतर त्याच दिवशी रिपोर्ट मिळायला हवा. मात्र, रुग्णांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी सिटी स्कॅनचा रिपोर्ट दिल्या जातो. परिणामी डॉक्टरांचे पुढील उपचार थांबतात. रोगाचे निदानच होत नसल्याने रुग्णांवर आहे त्याच स्थितीत पडून राहावे लागत आहे. हे वास्तव आहे सर्वोपचार रुग्णालयातील. 


सर्वोपचार रुग्णालय हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारित आहे. शासकीय महाविद्यालयाच्या अखत्यारित असलेल्या रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांसह सुविधा आहेत; मात्र अंमलबजावणी करणारी येथील यंत्रणा कुचकामी ठरत असल्याने ते रुग्णांच्या पथ्यावर पडत आहेत. रुग्णांना मिळणाऱ्या सोयी येथे वेळेवर मिळत नाहीत. सीटीस्कॅन, एक्सरे ची सुविधा रुग्णालयात आहे. मात्र त्याच्या रिपोर्टसाठी रुग्णांना ताटकळत बसावे लागते. पॅरालिसिसचा झटका आलेल्या रुग्णाला १७ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले. लगेच डॉक्टरांच्या सल्ल्यावरून त्याच दिवशी सीटीस्कॅन करण्यात आले. मात्र रिपोर्ट १९ एप्रिलला देण्यात आला. जर रिपोर्टच वेळेवर मिळत नसेल तर डॉक्टर कुठल्या आधारावर उपचार करतील असा प्रश्न आहे. सिटी स्कॅनचे रिपोर्ट दुपारी दोन वाजेपर्यंत देण्याची वेळ आहे. त्यानंतर रिपोर्ट मिळत नाही आणि संध्याकाळी रुग्णांना रिपोर्ट देण्याची कोणतीही सोय नाही. सीटीस्कॅन, सोनोग्राफी सकाळी केल्यानंतर शक्य होईल त्यांना तत्काळ तर काहींना संध्याकाळी रिपोर्ट देण्याची सोय व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे. 


संबंधित वॉर्डात रिपोर्ट का पाठवण्यात येऊ नये
रुग्णांचे सीटीस्कॅन, सोनोग्राफी केल्यानंतर त्यांचे रिपोर्ट हे रुग्ण दाखल असलेल्या संबंधित वॉर्डामध्ये पाठवणे आवश्यक आहे. तसे केल्यास रुग्णांचा रिपोर्ट संबंधित डॉक्टरांनाच मिळेल व डॉक्टरला पुढील उपचार करणे सोपे जाईल. 

 

बुधवारपर्यंत सीटीस्कॅनसह सर्वच रिपोर्ट मिळतील 
सीटीस्कॅनचे रिपोर्ट उशिरा मिळणे ही गंभीर बाब आहे. यापुढे सर्वच रिपोर्ट तत्काळ मिळतील अशा सूचना देतो. सीटीस्कॅन रिपोर्ट रुग्णांना घेऊन जाण्याची आवश्यकता राहणार नाही. यापुढे डॉक्टरांच्या मोबाइलवर रिपोर्ट पाठवण्याची व्यवस्था करण्यात येईल. त्यामुळे मोबाइलद्वारे संबंधित डॉक्टरांना रुग्णाच्या सिटी स्कॅनचा रिपोर्ट कळेल. रुग्णांचे रिपोर्ट तत्काळ मिळण्यासाठी बाहेरील डॉक्टरांची मदतही घेण्यात येईल. नंतरच्या काळात दोन-तीन दिवस रिपोर्टची वाट पाहण्याची रुग्णांवर वेळच येणार नाही. थेट वॉर्डमध्येच रिपोर्ट पाठवण्याची व्यवस्था करण्यात येईल. उद्या एक-दोन दिवस सुटी असल्यामुळे बुधवारपर्यंत ही सर्व यंत्रणा कार्यान्वित होईल. तसेच प्राध्यापक संध्याकाळच्या वेळी महाविद्यालयात येतात. संबंधित डॉक्टरांना रिपोर्ट बघण्यासाठी वॉर्डमध्ये जाण्याच्याही सूचना देण्यात येतील. 
- डॉ.अजय केवलीया, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

बातम्या आणखी आहेत...