आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भ: बाेंडअळीने खरीप ‘खाल्ला’, अाता गारपीट, पावसाने रब्बीला झाेपवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला/ अमरावती- मराठवाड्याप्रमाणेच पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यातही रविवारी अवकाळी पाऊस व गारपिटीचा माेठा तडाखा बसला.  बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात गारपिटीच्या माऱ्यामुळे चार शेतकरी तर  अकोला जिल्ह्यात एक महिला जखमी झाल्याची माहिती आहे. वीज पडून अकाेला जिल्ह्यात दाेन मेंढरे दगावली, तर अमरावती जिल्ह्यात ७ जनावरांचा मृत्यू झाला. दरम्यान, सोमवारीदेखील अवकाळी पाऊस व गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.  विदर्भ व मराठवाड्यात खरीप पिकातील सर्वात महत्त्वाचे मानले जाणारे नगदी पीक कापसावर गुलाबी बाेंड अळीचा प्रादुर्भाव झाला, त्यामुळे हे पीक पूर्ण उद‌्ध्वस्त झाले अाता. रब्बीच्या हाती अालेल्या पिकांवरही गारपीटीने ‘वरवंटा’ फिरवल्यामुळे या भागातील शेतकरी पुन्हा उद‌्ध्वस्त झाला अाहे.


अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार, अचलपूर, दर्यापूर, मोर्शी, धारणी, अंजनगाव सुर्जी तालुक्यांसह अन्य ठिकाणी  संत्रा, गहू, कांदा यासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले. दर्यापूर तालुक्यातील नायगाव येथे गंगाधर आत्मारामजी कोकाटे (७४) या शेतकऱ्याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. तर वरुड तालुक्यातील वाई खुर्द येथे वीज पडल्याने ७ जनावरे दगावली.   बोर व लिंबाच्या आकाराएवढ्या पडलेल्या गारांमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील गहू आडवा झाला असून झाडांची संत्री गळून पडली.    अकाेला जिल्ह्यातील अकाेट व तेल्हारा तालुक्यातील पिकांना सर्वाधिक फटका बसला. बार्शीटाकळी, अकाेट, तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूर तालुक्यात अवकाळी पावसाचे आगमन झाले. अकाेट, तेल्हारा अाणि बाळापूर तालुक्यातील काही गावांमध्ये गारपीट झाली. त्यामुळे गहू, हरभरा, कांदा, केळी पिकांचे नुकसान झाले. बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या गारपिटीमुळे पानमळे, गहू, हरभरा, मिरची, टोमॅटो, कांदा, संत्रा, द्राक्षांसह इतर फळांचे मोठे नुकसान झाले. 


गारपीटग्रस्तांना अधिवेशनापूर्वी सरकारने मदत द्यावी : विखे पाटील
राज्याच्या अनेक भागात वादळ आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याअगोदर सरकारने भरपाई द्यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. विखे पाटील म्हणाले की, विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशात अनेक ठिकाणी वादळ आणि गारपिटीने प्रचंड थैमान घातल्याच्या तक्रारी अनेक जिल्ह्यांमधून आल्या आहेत. तिघांचा बळी गेला असून, कांदा, हरभरा, गहू आदी रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी उभी पिके बाधित झाली असून, कापणी केलेल्या पिकांचेही प्रचंड नुकसान झाल्याचे दिसून येत असल्याचे विखे म्हणाले.


उन्हाळा लांबणार  
पूर्व विदर्भात मात्र नागपूरसह तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाला. या पावसामुळे तापमानात घसरण झाल्याने हवेतील गारठा वाढून थंडी परतली. सोमवारी  विदर्भात गारांसह पाऊस पडेल, अशी माहिती प्रादेशिक हवामान केंद्राचे संचालक अविनाश ताठे यांनी दिली. पावसामुळे उन्हाळा लांबणार असून, तापमानात किमान २ ते ४ अंशांनी घसरण होणार असल्याने थंडी वाढेल, असे ताठे यांनी सांगितले.  

बातम्या आणखी आहेत...