आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेेस्थानक,गाड्यांत अनधिकृत विक्रेत्यांच्या खाद्यपदार्थांमुळे 'प्रवाशांच्या जीवा'ला धोका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- रेल्वेत अनधिकृतपणे निकृष्ट, तसेच अप्रमाणित खाद्यपदार्थांची विक्री करणारे मोकाट आहेत. प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई होत नाही. त्यांच्याकडून हप्ते घेऊन हा प्रकार सर्रास चालत असल्याचे उघडपणे बोलले जाते. साधे तिकीट काढून रिझर्वेशनच्या डब्यात बसलेल्या प्रवाशाला गुन्हेगारासारखी वागणूक देणारे गाडीतील तिकीट निरीक्षक खाद्य विक्रेत्यांवर मात्र काहीही कारवाई करत नाहीत. तसेच रेल्वे सुरक्षा बलही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. या मागचे गौडबंगाल काय, असा प्रश्न उपस्थित होत असून प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. 


रेल्वेस्थानकावर व धावत्या गाडीत रेल्वे प्रशासन, रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग रेल्वे पोलिस यांच्या आशीर्वादाने अवैध खाद्यपदार्थ विक्री सुरू आहे. रेल्वेगाड्यांमध्ये भुसावळ ते अकोलापर्यंत चालणारा मोठा व्यवसाय आहे. खाद्यपदार्थ तसेच शीतपेय, फळे, सुकामेवा, गुटखा, तंबाखू, सिगारेट, कचोरी, संतरा गोळी, आवळा सुपारी आदी अवैध पदार्थ विक्रीचे मोठे जाळे आहे. कोणताही परवाना नाही; केवळ रेल्वे प्रशासन, रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग रेल्वे पोलिस यांच्याशी मधूर संबंध ठेवले, की कोणीही अनधिकृत पदार्थ विक्रीचा व्यवसाय करू शकतो अशी परिस्थिती आहे. भुसावळपासून ते नागपूरपर्यंत तसेच रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा बलाच्या नागपूर कार्यालयापर्यंत अवैध खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे संबंध आहेत, असे बोलल्या जाते. यातून लाखो रुपयांची उलाढाल होत असून, मूळ किमतीपेक्षा जादा दराने प्रवाशांना वस्तू विक्री केल्या जातात. याबाबत प्रवाशांनी तक्रार अथवा विचारणा केली, तर अरेरावीची भाषा वापरत प्रसंगी मारझोड केली जाते. 


प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या अन्नाची तपासणी होत नाही 
प्रवाशांना देण्यात येणारे अन्न शिळे आहे की ताजे, याची साधी तपासणीदेखील होत नाही. तक्रार केली तरी अशा अवैध खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई होत नाही. कारवाई अथवा तपासणी होण्यापूर्वीच प्रशासनातील काही महाभागांकडून टीप दिली जाते. यामुळे हे अनधिकृत विक्रेते व्यवसायच बंद ठेवतात आणि अधिकारी जाताच पुन्हा धंदे सुरू होतात. 


रेल्वेस्थानक परिसरात पाकीटमार व मोबाइल चोर सक्रिय 
अनधिकृत खाद्यपदार्थाच्या विक्रीतून संबंध निर्माण झाल्यानंतर अशा विक्रेत्यांचा रेल्वेस्थानक परिसरात वावर असतो. त्यातूनच रेल्वेस्थानकावर रात्रीच्या वेळी मोबाइलचोर व पाकीटमार सक्रिय झाल्याचे दिसून येतात. मोबाइल चोरट्यांसाठी रेल्वेस्थानक परिसर आता सुरक्षित असल्याचे दिसून येते. रात्रीच्या वेळी प्रवाशी सुरक्षित राहील, याची कोणतीही हमी नसल्याने लुटमारीच्या घटना वाढल्या आहेत. 


प्रवाशांना होतोय मोठा त्रास 
गाडीमध्ये प्रवाशांना अनधिकृत विक्रेत्यांचा मोठा त्रास आहे. नेहमी गाडीतून वारंवार फेऱ्या मारत असल्याने महिला प्रवाशांना त्यांचा त्रास होतो. त्यांना फिरण्यासाठी जागा दिली नाही तर प्रवाशांवर अरेरावीची भाषा वापरतात. हे सर्व रेल्वे सुरक्षा बलाच्या डोळ्यादेखत सुरु आहे. 


अधिकृत विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम 
या अनधिकृत धंद्यांमुळे जे अधिकृत विक्रेते आहेत, त्यांच्या धंद्यांवर मोठा परिणाम होतो. अवैध धंद्यांची लाखो रुपयांची उलाढाल असल्याने येथे धंदा करण्याची चढाओढ दिसून येते. या अवैध धंद्यातही मोठी स्पर्धा असल्याने अनेकदा टोळ्या तयार झाल्या आहेत. 


हप्तेबाजीचा आरोप चुकीचा, १८२ वर फोन करा, कारवाई करतोच 
रेल्वेस्थानकावर अवैध खाद्यपदार्थ विक्री होत असेल तर कारवाईची जबाबदारी आमची आहे. एका वर्षात सर्वाधिक कारवाया केल्या आहेत. जिथे आरपीएफ नाहीत, तेथील जबाबदारी कमर्शियल विभागावर आहे. विभागातून २८० गाड्या धावतात. त्यापैकी ६० गाड्यातच आरपीएफ कार्यरत आहेत. कमर्शियल विभाग, स्टेशन प्रशासन विभागालाही जबाबदारी दिलीे. कमर्शियल, स्टेशन प्रशासन व आरपीएफ यांचे मिळून कारवायांसाठी जॉइंट कमिटी बनवली आहे. प्रवाशांना जर अवैध खाद्यपदार्थ विक्रेते दिसले तर त्यांनी १८२ या टोलफ्री क्रमांकावर फोन करावा, आरपीएफ कारवाई करेल. हप्तेबाजीचा आरोप चुकीचा आहे. 
- अजय दुबे, वरिष्ठ आयुक्त रेल्वे सुरक्षा बल, भुसावळ 

बातम्या आणखी आहेत...