आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक: राजकीय प्रतिष्ठेचा कस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार २८ मे रोजी मतदान तर ३१ मे रोजी मतमोजणी होणार आहे. भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे पालघर, तर नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे भंडारा-गोंदियाची जागा रिक्त झाली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या निधनाने रिक्त झालेल्या सांगली जिल्ह्यातील पलुस मध्येही याच दिवशी मतदान होणार आहे.  


शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून केंद्र सरकारसह राज्यातील फडणवीस सरकारविरोधात भूमिका घेत भाजपचे खासदार नाना पटोले यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आणि खासदारकीचा राजीनामा दिला. राज्यातील तसेच केंद्रातही हेवीवेट असलेल्या प्रफुल्ल पटेल यांचा पराभव करत भाजपच्या लाटेत पटोलेंनी ही खासदारकी मिळवली होती. तेथील पोटनिवडणूक हा राज्यभरासाठी उत्सुकतेचा विषय राहणार अाहे. सत्ताधारी भाजपला पुन्हा आपला उमेदवार निवडून आणत पटोलेंना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.  मुळात या पोटनिवडणुकीत निवडून येणाऱ्या उमेदवाराला अवघ्या काही महिन्यांचा कमी वेळ मिळणार आहे. नव्या खासदाराच्या निवडीसाठी सुमारे १४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तो योग्य नाही त्यामुळे येथे पोटनिवडणूक घेऊ नये, अशी याचिकाही नागपूर खंडपीठात दाखल झाली होती. पण नवीन खासदाराला पुरेसा वेळ मिळेल तसेच कोणत्याही क्षेत्राला जनतेच्या प्रतिनिधीशिवाय ठेवता येत नाही ही दोन कारणे देत न्यायालयाने निवडणूक न घेण्यासंदर्भातील याचिका निकाली काढली. 


नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतर लगेच या निवडणुकीच्या दृष्टीने मोठ्या हालचाली आधीच सुरू झाल्या आहेत. पटोले काँग्रेसमध्ये दाखल झाले. तसेही २००८ पर्यंत ते काँग्रेसमध्येच होते. आपल्याविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा प्रफुल्ल पटेल हे निवडणूक लढवणार असतील तरच मैदानात उतरू, असे त्यांनी जाहीर करून टाकले आहे. काँग्रेस अथवा भाजपनेही या निवडणुकीबाबत आपली भूमिका जाहीरपणे स्पष्ट केलेली नाही. हा मतदारसंघ सुरुवातीपासून राष्ट्रवादीकडे आहे. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचे मतदारसंघावर चांगले वर्चस्व आहे. त्यांनी ४ वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. त्यामुळे हक्काचा मतदारसंघ राष्ट्रवादीकडून काँग्रेसला दिला जाईल, अशी शक्यता फार धूसर आहे.

 

त्यामुळे काँग्रेसकडून पुन्हा  पटोलेंना या ठिकाणी निवडणूक लढवण्याची संधी कशी मिळणार, हा प्रश्न आहेच. उलट जर मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच राहिला आणि पटेल निवडणुकीला उभे राहिले तर आघाडीचा धर्म म्हणून पटोले यांना गत निवडणुकीचे प्रतिस्पर्धी असलेल्या पटेलांचा प्रचार करावा लागणार आहे. ही सगळी परिस्थिती पाहता त्यांनी विधानसभेची तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. १० वर्षांपूर्वी त्यांनी काँग्रेस सोडल्यावर तेथील स्थानिक काँग्रेस नेत्यांनी पक्षवाढीसाठी चांगली मेहनत घेतली. याच पटोलेंनी जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपमध्ये आल्यावर चांगले यश मिळवून दिले होते.

 

काँग्रेसने या घडामोडींवर मात करत स्थानिक स्वराज संस्थांत पुन्हा आपले अस्तित्व दाखवून दिले. ही सगळी स्थानिक मंडळी आता नाना पटोलेंना कसे स्वीकारणार, यातूनच पटोलेंच्या  काँग्रेस प्रवेशानंतर स्थानिक नेत्यांमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर काँग्रेसच्या प्रस्थापितांचे छुपे आव्हान उभे राहिलेले आहे. ते ज्या विधानसभा क्षेत्रामध्ये कामाला लागलेले आहेत त्या क्षेत्रातील काँग्रेसच्या नेत्यांसोबतचा वर्चस्वावरून पटोलेंचा संघर्ष नवीन नाही. पण ते नेते पक्षाशी प्रामाणिक राहिल्याने त्यांचे वर्चस्व सिद्ध झालेले आहे. तिथली वाटचालही पटोलेंसाठी तितकी सुकर नाही. 


पण त्यांच्यामुळे रिक्त जागेवर आता काय हाेणार, हा प्रश्न आहेच. या मतदारसंघावर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे हेवीवेट माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचे वर्चस्व आहे. केवळ भाजपच्या लाटेमुळे पटोले त्यांना मात देऊ शकले होते. त्यामुळे ते जर पुन्हा उभे राहिले तर सत्ताधारी भाजपला  केवळ पटोलेच नव्हे तर पटेल यांचेही आव्हान राहणार आहे.  स्थानिक स्वराज्य संस्थेत आधी असलेला दबदबा कमी झाला आहे.  पटोले आपला हक्काचा काही मतदार किमान भाजपकडे जाण्यापासून रोखण्यासाठी सगळी शक्ती पणाला लावणार हे नक्की. अशा अवस्थेत ही जागा आता काँग्रेस आपल्याकडे घेत पुन्हा पटोलेंना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार का? राष्ट्रवादी पुन्हा आपला मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी पुढाकार घेणार, भाजपच्या उमेदवाराला शिवसेना किती साथ देणार आणि या सगळ्या परिस्थितीत आम्हीच नंबर ‘वन’ हे पूर्ण शक्ती पणाला लावून भाजप सिद्ध करणार हे पाहणे हेच या निवडणुकीतील आैत्सुक्य आहे.
 

 कार्यकारी संपादक, अकाेला.

बातम्या आणखी आहेत...