आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ कारंजात मूकमोर्चा; मोर्चाला १७ सामाजिक संघटनांचा पाठिंबा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कारंजा (लाड)- देशात अल्पवयीन मुली व महिलांवर सातत्याने शारीरिक अत्याचार होत आहेत.या घटनांना पायबंद घालावा या मागणीसाठी सोमवारी कारंजात भारिप बहुजन महासंघाचे प्रदेश महासचिव तथा वाशिम जिल्हाध्यक्ष मो.युसूफ पुंजानी यांच्या नेतृत्वात विविध सामाजिक संघटनांच्या वतीने भव्य मूक मोर्चा व कँडल मार्च काढण्यात आला होता.वाढत्या अमानवी घटनांमुळे देशाची एकता व अखंडता आणि भारतीय संस्कृतीला गालबोट लागत असून, या घटनांमध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्व गुन्हेगारांना कठोर शासन करावे अशी मागणी त्यांनी राष्ट्रपतींकडे तहसीलदारांना निवेदन देवून केली आहे. 


कठुआ येथील ८ वर्षीय आसिफावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. उन्नाव येथील एका अल्पवयीन मुलीवर सत्ताधारी पक्षाचा आमदार व त्याच्या भावासह इतर साथीदारांनी सामुहिक अत्याचार केली. या घटनेची प्रशासनाने दखल न घेता पीडित मुलीच्या वडिलालाच अवैध शस्त्रसाठा प्रकरणात गोवण्यात आले.न्यायालयाने आमदार व इतरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देवूनही गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करण्यात आली नाही. याशिवाय नाशिक, वर्धा, मुकुंदवाडी येथील महिला व मुलींवर आणि गुजरात राज्यातील व नांदेड जिल्ह्यातील अनु्रकमे ११ व १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली असून या घटनेतील आरोपी फरारी आहे. या घटनेचा भारिप बहुजन महासंघ व विविध सामाजिक संंघटनांनी निषेध करून दोषींना कडक शासन करावे अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी सोमवारी शहरातून भव्य मूक मोर्चा काढण्यात आला व राष्ट्रपतींच्या नावे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.तसेच सायंकाळच्या सुमारास शहरातून कँडल मार्चही काढण्यात आला होता. 


या आंदोलनात भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष युसुफ पुंजानी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच जमाते उलमा-ए- हिंद सामाजिक समता प्रबोधन मंच, प्रबुद्ध भारत समिती,अखिल भारतीय मुस्लिम गवळी समाज संघटना, दिगंबर जैन नेवी समाज संघटना, अखिल भारतीय बंजारा समाज कर्मचारी संघटना, डॉ.महेश चव्हाण आरोग्य मित्र मंडळ, अखिल भारतीय विकास परिषद, संभाजी ब्रिगेड, गोपाळ समाज क्रांतीकारी परिषद, बिरसा क्रांती दल, बहुजन शिक्षक महासंघ,महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना, मानवसेवा हेल्पलाईन, नवयुवक सम्यक मित्र मंडळ तसेच महिला संघटना सहभागी झाल्या होत्या. 

बातम्या आणखी आहेत...