आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतसंस्थेत 6 काेटींचा घोटाळा; माजी आमदार खतीब फरार; दस्तएेवज ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- देशात राष्ट्रीयीकृत बँकांमधील काेट्यवधी रुपयांचा घोटाळा गाजत असतानाच अकाेला जिल्ह्यातील बाळापूर नागरी सहकारी पतसंस्थेतील कोट्यवधी रुपयांचा घोटाळाही उघड झाला अाहे. या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पतसंस्थेचे अध्यक्ष, माजी आमदार अॅड. सय्यद नातिकोद्दीन खतीब यांच्यासह १३ संचालक फरार झाले आहेत. दरम्यान, बुधवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सर्व दस्तऐवज ताब्यात घेतले अाहेत. या पतसंस्थेत सुमारे ७०० ठेवीदारांचे पैसे अडकले अाहेत. पाेलिसांच्या तपासानुसार हा सहा काेटींचा घाेटाळा असल्याची प्राथमिक माहिती अाहे.  


माजी आमदार खतीब हे या पतसंस्थेचे अध्यक्ष आहेत. अाकर्षक व्याजदराचे अामिष दाखवून या पतसंस्थेने जिल्ह्यातील अनेक ठेवीदारांकडून पैसे जमा करून घेतले. मात्र अध्यक्षांसह संचालकांनी ठेवीदारांच्या या पैशातून दुसऱ्याच्या नावाने परस्पर कर्ज दाखवून ठेवींचा गैरव्यवहार केल्याची तक्रार रामदास श्रीराम पराते यांनी केली हाेती. त्यांच्याही  लाखो रुपयांच्या ठेवी या पतसंस्थेत अडकलेल्या आहेत. मात्र ठेवींवर पतसंस्थेने कोणतेही व्याज दिले नाही तसेच बचत खात्यातही व्याजाची रक्कम जमा केली नाही. मात्र व्याज दिल्याच्या खोट्या नोंदी करण्यात आल्या आहेत. ठेवीदार पैसे व्याजासह परत मागण्यासाठी गेले असता त्यांना पतसंस्थेत पैसे नाही, कर्जवसुलीनंतर देऊ, असे सांगून परत पाठवले जाते. गुंतवणूकदारांची कुठलीही पूर्वपरवानगी न घेता त्यांच्या मुदत ठेवीच्या प्रमाणपत्रावर वेळोवेळी मुदत वाढवून देण्यात आली, असेही पराते यांनी तक्रारीत नमूद केले हाेते.  


या प्रकरणी १६ फेब्रुवारी रोजी बाळापूर पोलिसांनी पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. सै. नातिकोद्दीन सै. हुसामोमद्दीन खतीब यांच्यासह संचालक शाम सखाराम शेगोकार, रजीया बेगम सै. नातिकोद्दीन खतीब, सै. हमिद्दोनी सै. जमिदोद्दीन, नंदकिशोर दामोदर पंचभाई, मो. हनीफ अब्दुल मुनाफ, निजामोद्दीन शफिद्दीन , गफारली रेहमानजी रंगारी, सै. मुजीबुर रहेमान सै. हबीब, निर्मलाताई श्रीकृष्ण उमाळे, शे. महेमूद शे. हसन, शे. मुनीर शेख व शेख वजीर, शेख इब्राहिम या संचालकांवर गुन्हे दाखल केले. आर्थिक गुन्हे शाखा तपास करीत आहे.    

 

तक्रारदाराची १.९० लाखांची फसवणूक  

 

तक्रारदार पराते यांनी सुमारे १ लाख ९० हजार रुपयांच्या ठेवी वेगवेगळ्या स्वरूपात बाळापूर नागरी सहकारी पतसंस्थेत ठेवल्या हाेत्या. या गुंतवणुकीवर मासिक व्याज देण्याचे पतसंस्थेने कबूल केले हाेते. त्यानुसार एप्रिल २०१६ पर्यंत नियमितपणे त्यांच्या बचत खात्यात व्याज जमा झाले, परंतु १० हजार रुपये ठेव पावतीवरील पतसंस्थेचे व्याज खात्यात जमा केले नाही. एका पावतीवर पतसंस्थेचे कर्मचाऱ्याने व्याज दिल्याची खोटी नोंद केली. एप्रिल २०१६ नंतर पतसंस्थेमध्ये व्याज का मिळत नाही म्हणून चौकशी केली असता पतसंस्थेचे कार्यालयाला कुलूप दिसून आले. त्यानंतर पतसंस्थेने आजपर्यंत कुलूप उघडलेले नाही, अशी पराते यांची तक्रार अाहे.   

 

 

आकर्षक व्याजदराचे दिले होते आमिष  
३० दिवस ते ९० दिवस ठेवी ठेवल्यास ११%, ९१ दिवस ते १२ महिने ठेवी ठेवल्यास १२% व १३ महिन्यांसाठी ठेव ठेवल्यास १३ टक्के व्याजदर देण्याचे पतसंस्थेने जाहीर केले हाेते. तसेच  ७८ महिने ठेवी (धनवर्षा मुदती ठेव ) ठेवल्यास दाम दुप्पट रक्कम होईल. असे आमिष देण्यात आले होते.  

 

लवकरच अटक करू  
बुधवारी पतसंस्थेची झाडाझडती घेतली. महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. सहा कोटींच्या वर ठेवीदारांच्या ठेवी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. फरार असलेल्या पतसंस्थेचे अध्यक्ष व संचालकांचा शोध घेण्यात येत असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल.    
- गणेश अणे, पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, अकोला.  

 

शिवीगाळ करून हाकलले

पराते यांनी खतीब यांच्याकडे जाऊन पैशांची मागणी केली असता त्यांना शिवीगाळ करून हाकलून देण्यात आले. त्यांची अंध बहिणीने ठेवलेले ३२,५०० रुपये परत केले नाहीत. तसेच तिची पूर्वसंमती न घेता वेळोवेळी मुदत दिली.

बातम्या आणखी आहेत...