आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला महापालिकेतील ८० पैकी १६ नगरसेवक मौनीबाबा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- नगरसेवक म्हणजे संबंधित प्रभागातील नागरिकांचे प्रतिनिधित्व करणारा. २५ ते २८ हजार मतदारांनी नगरसेवकाला महापालिकेत निवडून दिले आहे. प्रभागातील समस्यांसह शहराचा विकास करण्याची जबाबदारी ही नगरसेवकांची आहे. त्यामुळेच महापालिकेत होणाऱ्या विविध सभेत प्रत्येक पक्षाच्या नगरसेवकांनी आपले मत व्यक्त करणे गरजेचे ठरते. मात्र महापालिकेची निवडणूक झाल्या नंतर ९ मार्च २०१७ ला महापौरांची निवड झाली. त्यानंतर ३० एप्रिल २०८ पर्यंत महापालिकेच्या १३ सर्व साधारण सभा झाल्या. आता पर्यंत या सभेत ८० पैकी ६४ नगरसेवकांनी या ना त्या विषयावर आपले मत व्यक्त केले. मात्र १६ नगरसेवक मौनीबाबा ठरले. यात सर्वच पक्षातील नगरसेवकांचा समावेश आहे. 


लोकसभा, विधानसभा असो अथवा स्थानिक स्वराज्य संस्था. यामध्ये लोकशाही पद्धतीने कारभार चालतो. नागरिकांचे प्रतिनिधित्व करणारे, नागरिकांच्या वतीने त्यांचा आवाज सभागृहात पोहोचवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी ही या लोकप्रतिनिधींची असते. अनेक लोकप्रतिनिधी हे कर्तव्य इमाने इतबारे पार पाडतात. मात्र काही यास अपवाद ठरतात. अकोला महापालिकेत नगरसेवकांची संख्या ८० आहे. तर पाच सदस्य मनोनीत सदस्य आहेत. यापैकी ४ मनोनीत नगरसेवकांची नियुक्ती झाली आहे. 


८० पैकी सर्वाधिक नगरसेवक हे भाजप आघाडीचे आहे. त्यांची संख्या ४९ आहे. महापौर आणि उपमहापौरही भाजपचे आहेत. गेल्या एक वर्षापासून महापालिकेला विकासासाठी केंद्र तसेच राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे. यात अमृत योजने अंतर्गत पाणी पुरवठा सबलीकरण, भूमिगत गटार योजना, कापशी तलाव सौंदर्यीकरण योजना, रस्ते विकास, पंतप्रधान आवास योजना या महत्त्वपूर्ण योजनांसह नगरोत्थान, दलित वस्ती सुधार योजना, दलितेतर वस्ती सुधार योजना आदी विविध योजनांमधून महापालिकेला कोट्यवधी रुपयाचा निधी प्राप्त होतो. यातून विकास कामे केली जातात. ही विकास कामे करण्यापूर्वी महापालिकेच्या सभागृहात चर्चा केली जाते. त्यामुळे अशा महत्त्वपूर्ण विषयावर सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी आपापली मते व्यक्त करणे अत्यावश्यक ठरते. परंतु दुर्देवाने काही नगरसेवक आपले मत व्यक्त करीत नाहीत. विशेष म्हणजे आपल्या प्रभागातील समस्यांबाबतही महासभेत आवाज उठवत नाहीत. त्यामुळे हे मौनीबाबा नगरसेवक खरेच लोकप्रतिनिधित्व करतात का? असा प्रश्न निर्माण होतो. 

 

हे कसले लोकप्रतिनिधी 
या वेळी एका प्रभागातून ४ नगरसेवक निवडून आले. २५ ते २८ हजार मतदारांचे हे नगरसेवक प्रतिनिधित्व करतात. एका वेळी इतक्या नागरिकांना मते मांडता येत नाही, त्यामुळेच नगरसेवक निवडले जातात. परंतु लोकांचे प्रतिनिधित्व करणारेच मौनी बाबा असतील तर यांना लोकप्रतिनिधी म्हणावे काय? असा प्रश्न आहे. 

 

३३ रिपीट
८० नगरसेवकांपैकी ३३ नगरसेवक पुन्हा निवडून आले आहेत. मौनीबाबा नगरसेवकांमध्ये दुर्देवाने रिपीट झालेल्या काही नगरसेवकांचा समावेश आहे. 

 

भाजपचे सर्वाधिक मौनीबाबा नगरसेवक 
१६ मौनीबाबा नगरसेवकांत सर्वाधिक मौनीबाबा नगरसेवक हे सत्ताधारी भाजपचे आहेत. सत्ताधारी गटाची संख्या अधिक असल्याने मौनीबाबा नगरसेवकांची संख्याही त्याचीच असावी, असा नियम नाही. उलट ज्या पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले. त्या पक्षाच्या सर्वच नगरसेवकांची जबाबदारी वाढते. 

बातम्या आणखी आहेत...