आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपात समाविष्ट ८६ कर्मचारी जाणार संपावर; वेतन लागू करण्याच्या मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- महापालिकेत समाविष्ट झालेल्या ग्राम पंचायतीतील ८६ कर्मचाऱ्यांनी महापालिकेचे वेतन लागू करण्याच्या मागणीसाठी २१ मे पासून संपावर जाणार आहेत. या संपावर हद्दवाढ झालेल्या भागातील पाणी पुरवठा विस्कळीत होणार असल्याने यावर प्रशासन काय तोडगा काढतो? याकडे लक्ष लागले आहे. 


महापालिकेची हद्दवाढ ३० ऑगस्ट २०१६ रोजी झाली. या हद्दवाढीमुळे २४ गावातील १४ ग्राम पंचायतीचे कर्मचारीही महापालिकेत समाविष्ट करण्यात आले. यापैकी अनेक कर्मचारी हे ग्राम पंचायतीच्या कायम आस्थापनेवर नाहीत. अनेक कर्मचारी मानसेवी म्हणून कार्यरत होते. या कर्मचाऱ्यांना ग्राम पंचायतीत काम करताना एक हजार ते नऊ हजार रुपयांपर्यंत मानधन दिले जात होते. या कर्मचाऱ्यांना महापालिकेत कार्यरत ठेवताना त्यांना ग्राम पंचायतीत मिळणारे वेतनच देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. हद्दवाढ होवून दोन वर्षाचा कालावधी होत आला आहे. या आधी या कर्मचाऱ्यांनी महापालिकेची वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे ग्राम पंचायतीचे वेतन मिळत असताना कामाचा व्याप मात्र वाढला आहे, असे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.तर प्रशासनाने जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि शासनाचे मार्गदर्शन घेवून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही, त्यामुळे संपावर जाण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष गौतम भगत, प्रशांत देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. 


पाणी पुरवठ्यावर होईल परिणाम 
समाविष्ट झालेल्या गावांपैकी खडकी, मलकापूर, उमरी, शिवणी, शिवर या गावांंवर या संपाचा मोठा परिणाम पडेल. हे सर्व कर्मचारी पाणी पुरवठ्याची कामे करतात. विंधन विहीर सुरु करणे, व्हॉल्व्ह उघडणे, बंद करणे त्याच बरोबर कर विभागातही हे कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे पाणी पुरवठा तसेच कर विभागावर या संपाचा प्रभाव पडणार आहे. 


२१ मे पासून बेमुदत काम बंद आंदोलन 
महापालिका वाढीव हद्दीतील ग्राम पंचायत कर्मचारी कृती समितीने पत्रकार परिषद घेवून २० मे पर्यंत महापालिकेकडून समायोजन व इतर सेवा बाबतच्या प्रस्तावावर चर्चा न झाल्यास २१ मे पासून काम बंद आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे. 

बातम्या आणखी आहेत...