आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेगावकडे जाणाऱ्या चार वारकऱ्यांना ट्रकने चिरडले; अॅपेला धडक देऊन ट्रक उलटला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला / बाळापूर- श्रीक्षेत्र शेगाव येथे गजानन महाराज यांच्या प्रकट दिन महोत्सवात सहभागी होण्यासाठी पायी दिंडीने जात असलेले वाशीम जिल्ह्यातील उमरा-कापसे येथील भाविक विसावा घेण्यासाठी थांबले. इतक्यात दिंडीसाेबत असलेल्या अॅपेला धडक देऊन भरधाव ट्रक वारकऱ्यांच्या अंगावर उलटला. त्याखाली चार भाविक जागीच ठार झाले, तर पाच भाविक गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास पातूर-बाळापूर मार्गावरील बाघ फाट्याजवळ घडली.     


वाशीम जिल्ह्यातील उमरा कापसे येथील २०० भाविकांसह शेजारच्या गावांतील ५०० भाविक शेगाव जाण्यासाठी पायदळ वारीने १ फेब्रुवारी रोजी मार्गस्थ झाले होते. पातूर येथून साेमवारी दुपारी पायदळ दिंडी बाळापूर येथील विलास खोडके यांच्याकडे मुक्कामासाठी निघाली होती. वाडेगाव वघाडी नाल्याच्या पुलाजवळील वळण मार्गावर दमलेले वारकरी विसावा घेण्यासाठी थांबले. याच वेळी एका भरधाव ट्रकने वारकऱ्यांच्या अॅपेला धडक दिली. धडकेने अॅपे रस्त्याच्या कडेला गेली, तर ट्रक भाविकांच्या अंगावर उलटला. ट्रकमधील सरकीच्या पोत्याखाली दबल्याने चौघे भाविक जागीच ठार झाले. मृतांत रमेश धर्माजी कापसे (३२), लीलाबाई बळीराम कापसे (५८), काशीनाथ चंद्रभान कापसे (५५, सर्व रा. उमरा कापसे) व रामजी काकडे (५८, रा. कुंभार जवळा) यांचा समावेश आहे.     

 

पायदळ वारीला २१ वर्षांचा इतिहास     
२१ वर्षांपासून उमरा कापसे येथील भाविक गजानन महाराजांच्या दर्शनासाठी पायदळ वारी करतात. दरवर्षी सुमारे १५० ते २०० भाविक या वारीमध्ये सहभागी असतात. शेजारील गावांतील ४०० ते ५०० नागरिकांची भव्य पायदळ वारी शेगावसाठी मार्गस्थ होत असतात.     

 

रमेश यांचे कुटुंब उघड्यावर आले 
मृत रमेश कापसे हे कुटुंबातील एकमेव कमावते होते. त्यांच्या पश्चात आईवडील, एक भाऊ, दोन बहिणी असून त्यांना पत्नी, एक मुलगा व मुलगी आहे. रमेश यांच्याकडे दोन एकर शेती असून उदरनिर्वाहासाठी त्यांनी नुकताच अॅपे घेतला होता. धार्मिक कार्यक्रमासाठी ते अॅपे माेफत देत असत.

 

 

पुढील स्लाईडवर फोटो आणि माहिती...

बातम्या आणखी आहेत...