आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलडाणा जिल्ह्यात 506 ठिकाणी वीज चोरांवर कारवाई, महावितरणच्या 3 दिवस आकस्मिक धाडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा - वीजचोरी व अनधिकृत वापराविरोधात महावितरणने ठोस पाउले उचलत जिल्ह्यात १८, १९ व २० जानेवारी असे तीन दिवस एकाचवेळी आकस्मिक कारवाई केली. यामध्ये एकूण ५०६ ठिकाणी कारवाई करण्यात आली. यामध्ये ४ लाख ४ हजार वीज युनिटची म्हणजे जवळपास ३८ लाख ३२ हजार रुपयांची वीज चोरी झाल्याचे निदर्शनास आले. वीजचोरी व अनियमितता आढळून आल्यामुळे भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ व १२६ नुसार कारवाई करण्यात आली.

 

जिल्ह्यातील बुलडाणा, चिखली, धाड, सिंदखेडराजा, देऊळगावराजा, संग्रामपूर, लोणार, मोताळा, जळगाव जामोद, खामगाव, शेगाव, मेहकर, मलकापूर व नांदुरा या उपविभागामध्ये दर्जेदार व सर्वोत्तम वीज सेवा देण्यासाठी विविध कामे सुरु असून यासोबतच वीज हानी, गळती व वीजचोरी कमी करण्यासाठी महावितरण सातत्याने प्रयत्नशील आहे. वीज चोरीला अटकाव घालण्यासाठी प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत व मुख्य अभियंता अरविंद भादिकर यांच्या निर्देशानुसार अधीक्षक अभियंता गुलाबराव कडाळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंते काकाजी रामटेके, बद्रीनाथ जायभाये,पांडुरंग पवार यांचेसह अभियंते, अधिकारी व जनमित्र मिळून ५९ पथकामध्ये अभियंते, अधिकारी, जनमित्र यांचा केलेल्या कारवाईच्या मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग होता.

 

वीज मीटर मध्ये हस्तक्षेप करून थेट वीजचोरी केली जात होती, यामध्ये २८७ ग्राहकांनी वीज मीटर मध्ये हस्तक्षेप करून तीन लाख ९ हजार युनिटची म्हणजे जवळपास २९ लाख ३४ हजार रुपयांची चोरी केली. १८३ जण वीज तारेवर हुक टाकून थेट वीज चोरी करताना आढळले. त्यांनी ९५ हजार युनिटची म्हणजे रुपये ८ लाख ९८ हजारांची चोरी केली.अशी एकूण ४७० जणांनी ४ लाख ४ हजार युनिटची म्हणजे रुपये ३८ लाख ३२ हजारांची चोरी केली. त्यामुळे त्यांचेविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ नुसार कारवाई करण्यात आली. तर विजेचा गैरवापर व घेतलेल्या कारणाशिवाय दुसऱ्या कारणासाठी वापर करीत असल्याचे आढळलेल्या ३६ ग्राहकांविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १२६ नुसार कारवाई करण्यात आली. संबंधितावर कायद्यानुसार पोलीस कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वी जिल्ह्यात नुकत्याच वीजचोरी विरुद्ध झालेल्या कारवायांमध्ये अनेक जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली होती. वीजचोरी व गैरप्रकार याविरोधात महावितरण गंभीर असून जिल्ह्यातील व शहरातील जास्त प्रमाण असणारी वीज चोरीची ठिकाणे निश्चित असून यापुढे सुद्धा अशाप्रकारे गोपनीय पद्धतीने,सामूहिकरीत्या आणि सातत्याने आकस्मिक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच वीज मीटरमध्ये हस्तक्षेप करून देणारे तांत्रिक सूत्रधार सुद्धा महावितरणच्या रडारवर आहेत. यापुढेही वीज चोरांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे अधीक्षक अभियंता कडाळे यांनी कळवले आहे.

 

महावितरणला सहकार्य करावे
वीज हानी, गळती व वीजचोरी कमी करण्यासाठी महावितरण सातत्याने प्रयत्नशील आहे. तेव्हा ग्राहकांनी वीज चोरी, अनधिकृत वापर व गैरवापर टाळून अधिकृत वीज जोडणी घेऊन महावितरणला सहकार्य करावे.
- गुलाबराव कडाळे, अधीक्षक अभियंता, बुलडाणा मंडळ.

बातम्या आणखी आहेत...