आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अामीर खानच्या श्रमदानाने पक्का केला अापले गाव पाणीदार करण्याचा संकल्प

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेल्हारा- गावात पाण्याच्या स्त्रोतात वाढ होऊन पाणी पातळी उंचावण्याकरिता पाणी फाऊंडेशन कार्य करत अाहे. याच पाणी फाऊंडेशनचे प्रमुख अभिनेते अमीर खान यांनी साेमवारी तालुक्यातील खंडाळा येथे श्रमदान करून खंडाळ्यातील ग्रामस्थांच्या गाव पााणीदार करण्याच्या संकल्पाला बळ दिले. 


शहरातील बाजार समिती समोरील प्रांगणात २३ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता अभिनेता अमीर खान यांचे आज सपत्नीक आगमन झाले. येथून खासगी वाहनाने संग्रामपूर तालुक्यातील सालवन येथे जाऊन कामाची पाहणी केली. त्यानंतर सुमारे दीड वाजताच्या सुमारास खंडाळा येथे आगमन झाले. खंडाळा येथील दिनेश शेगोकार यांच्या घरी भोजन केले. त्यानंतर गावाला पाणी फाउंडेशनच्या कामासाठी प्रवृत्त करणाऱ्या महेमुनबी यांच्या घरी भेट दिली. भेटी दरम्यान होणाऱ्या चर्चेची शूटिंग करण्याकरिता पूर्वीच येथे व्यवस्था केली होती. या नंतर गावालगत असलेल्या केळीच्या मळ्यात यवतमाळ येथील मुलांसोबत संवादाच्या चित्रफीत तयार करण्याचा कार्यक्रम तब्बल दोन तास चालला. दरम्यान, खंडाळा शिवारातील गावापासून दोन किमी आतमध्ये बाहेर असणाऱ्या नर्मदेश्वर संस्थांच्या शेत सर्व्हे १७६ मध्ये वॉटर कप स्पर्धेसाठी दररोज घाम गाळून श्रमदान करणारे शेकडो ग्रामस्थ, आबालवृद्ध, महिला दुपारी दीड वाजता पासून ४३ डिग्री सेल्सियस तापमानामध्ये अमीर खानची वाट पाहत थांबले होते. या ठिकाणी अमीर खान श्रमदान करून ग्रामस्थांसोबत संवाद साधणार होते. मात्र त्यांच्या व्यस्त दाैऱ्यामुळे त्यांना ते शक्य झाले नाही. 


तहसील व पंचायत समिती कार्यालयात शुकशुकाट 
सकाळी आठ वाजतापासूनच महसूल प्रशासनाचे उपविभागीय अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यांसह अमीर खानच्या देखरेखीसाठी हजर असल्याने तहसील कार्यालयात शुकशुकाट पसरलेला होता. तर पंचायत समितीचे गटविकास अधिकारीसुद्धा आपल्या ताफ्यासह असल्याने पंचायत समिती कार्यालयातही परिस्थिती काही वेगळी नव्हती. 


ग्रामस्थांना मज्जाव करून पोलिसांनी फेडली सेल्फिची हौस 
खंडाळा येथील ग्रामस्थांना अभिनेते अमीर खान यांना पाहण्याचा व त्यांच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा असणाऱ्या नागरिकांना दूर सारून स्वतःच अभिनेत्यासोबत फोटो काढून पोलिस प्रशासनाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपली सेल्फी काढण्याची हौस फेडल्याचे या वेळेस दिसून आले. 


मेहमुनाबीसाठी आजचा दिवस ठरला महत्त्वाचा 
खंडाळा येथील ग्रामपंचायत सदस्य मेहमुनाबी यांच्यासाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा ठरला. अंध पती व चार अपत्यांसह आपला संसार जमादारीच्या व्यवसायातून चालवणाऱ्या मेहमुनाबी या अत्यल्प भूधारक महिलेसाठी आजचा दिवस सोन्याचा ठरला. अभिनेता अमीर खान यांनी पत्नीसह त्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या व त्यांच्या परिवारासोबत सोबत संवाद साधल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. 


सालवण गावातही अभिनेता अामीर खान यांचे श्रमदान 
संग्रामपूर- तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी बहुल सालवण गावात पाणी फाउंडेशनचे ब्रॅन्ड अॅम्बेसेडर अभिनेता आमिर खान यांनी आज २३ एप्रिल रोजी भेट देऊन श्रमदान केले. यावेळी गावाला श्रमदान करण्यास उत्तेजित करणारे शेतमजूर रेमू डावर यांच्या कुटुंबाची सुद्धा खान दाम्पत्याने भेट घेऊन कौतुक केले. 


पाणी फाउंडेशन अंतर्गत वॉटर कप स्पर्धेसाठी संग्रामपूर तालुक्याची निवड झाली आहे. त्यानुसार या गावात मोठ्या प्रमाणात श्रमदान करून जलसंधारणाची कामे केली जात आहे. या स्पर्धेत सालवण या गावाने सहभाग घेतला आहे. सालवण गावात ५१ आदिवासी कुटुंब राहत असून गावाची लोकसंख्या २७४ इतकी आहे. या गावातील शेतमजूर रेमू डावर यांनी जवळपास ७० ग्रामस्थांना एकत्रित करून श्रमदानाला सुरुवात केली. यासाठी लागणारे साहित्य सुद्धा त्यांनी स्वत:च्या मजुरीच्या पैशाने दिले. या ठिकाणी उत्स्फूर्तपणे जलसंधारणाची कामे केली जात असल्याने पाणी फाउंडेशनचे ब्रँड अॅम्बेसेडर अभिनेता अमीर खान यांनी दखल घेतली. सालवण येथे अमीर खान यांनी आज भेट देत जलसंधारणाच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर स्वत: २८ मिनिटे श्रमदान केले. तसेच गावात पोहोचल्यानंतर अमीर खान व त्यांनी पत्नी किरणराव खान यांनी गावासाठी आदर्श ठरलेल्या शेतमजूर रेमू डावर यांच्या कुटुंबाला भेट दिली. यावेळी त्यांनी रेमू डावर यांचे व गावाच्या एकजुटीचे कौतुक केले. यावेळी आदिवासी कुटुंबाकडून अभिनेता खान दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. 

बातम्या आणखी आहेत...