आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडीओ म्हणाले, तुमच्या संस्थेला काम हवे असेल तर, मैत्रिणीसोबत या!; विनयभंगाचा गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- 'माझे क्वॉर्टरवर मी एकटाच असतो, तुमच्या मैत्रिणीसोबत या, असे म्हणून व्हॉटस्अपवर अश्लील छायाचित्र व व्हिडिओ पाठवल्याप्रकरणी बाळापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (बीडीओ) तथा विस्तार अधिकाऱ्याविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा सोमवारी दाखल केला आहे. एका माजी सामाजिक कार्यकर्ता महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. 


युवराज शिंदे (बीडीओ) व पुंडलिक दुधे (विस्तार अधिकारी) असे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडित महिलेने सिव्हिल लाइन्स पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले की, माझ्या शैक्षणिक संस्था व जिल्हाभर बचत गट आहेत. संस्थेला बाळापूर तालुक्यातील शौचालयाचे काम मिळावे म्हणून आपण बाळापूर पंचायत समिती बीडीओ युवराज शिंदे यांची भेट घेतली. असे काम देता येत नसल्याचे सांगून कंत्राट देऊ शकतो, असे म्हणून बीडीओने विस्तार अधिकारी पुंडलिक दुधे याच्यासोबत ओळख करून दिली. त्यानंतर ओळख वाढत गेली. एका दिवशी बीडीओने व्हॉटस्अपवर अश्लील मॅसेज व व्हिडिओ पाठवले व फोन करून एखाद्या मैत्रिणीला घेऊन माझ्या क्वॉर्टरला या, मी एकटाच राहतो, असे म्हटले. हा प्रकार आपण विस्तार अधिकारी दुभे यांच्या कानावर टाकला असता मॅडम हे चालतच असते असे म्हटले. अशा तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी बीडीओ युवराज शिंदे व विस्तार अधिकारी पुंडलिक दुधे यांच्या विरूद्ध विनयभंगाचे गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक अन्वर एम. शेख करीत आहेत.


व्हिडिओचे स्क्रीनशॉट केले पोलिसांना सादर 
बीडीओ शिंदे यांनी पीडित महिलेला व्हॉटस्अपवर पाठवलेले व्हिडिओ व व फोटोचे स्क्रीनशॉट पीडित महिलेने पोलिसांना सादर केले आहेत. तसेच आलेल्या मोबाइल फोनचे डिटेलही पोलिसांना दिले आहेत. पोलिसांची खात्री झाल्यावर पोलिसांनी बीडिओविरुद्ध गुन्हा दाखल केला तर विस्तार अधिकाऱ्याने त्यास समर्थन दिले म्हणून त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...