आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार निवारणच्या समुपदेशनातून जुळलीत 118 कुटुंबांची मने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा- महिलांवरीलअत्याचार करणाऱ्या अनेक रूढी परंपरा या समाजात अतिशय खोलवर रूजलेल्या अाहेत. त्यामुळे कुटुंबामध्ये अनेक वादविवाद निर्माण होत असतात. कुटुंबव्यवस्था टिकून राहावी, कुटुंबातील नातेसंबंध दृढ व्हावेत आणि व्यक्तींमधील संवाद वाढावा यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात महिला तक्रार निवारण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. याअंतर्गत जानेवारी २०१७ पासून ते आतापर्यंत ११८ प्रकरणांचा सामंजस्याने समेट घडविण्यात आला आहे. 


राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातही महिलांचा छळ होताना दिसतो. या पीडित महिलांनाा आधार देण्याचे काम महिला तक्रार निवारण कक्ष करत आहे. 


महाराष्ट्र शासनाने महिलांच्या वाढत्या अत्याचारावर प्रतिबंध लागावा अत्याचार पिडीत महिलांना त्वरित न्याय मिळावा, याकरिता जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस स्टेशनला महिला समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या समुपदेशन केंद्राचा जिल्ह्यातील अनेक पीडित महिलांना फायदा होत आहे. 


त्यामुळे महिला समुपदेशन केंद्र महिलांसाठी वरदान ठरत आहेत. दिवसेंदिवस समाज शिक्षित प्रगतिशील होत असला तरी महिलांवरील अत्याचार शोषण वाढतच चालले आहे. सद्य परिस्थिती बदलली आहे. संशय, अनैतिक संबंध, मालमत्ता, विवाहाच्या वेळी होणारी फसवणूक, पत्नीच्या पगाराच्या पैशावर हक्क, जबरदस्ती करणे अशा स्वरूपाच्या समस्या येत आहेत. प्रगत समाजाकडून चांगल्या वर्तनाची अपेक्षा केली जात असली, तरीही कौटुंबिक हिंसाचारामध्ये अशिक्षित कुटुंबापेक्षा शिक्षित कुटुंबाचे प्रमाण वाढत वाढत असून ही चिंतेची बाब आहे. 


शिक्षित महिलांनी कौटुंबिक हिंसाचार सहन करता आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा, अत्याचाराचा विरोध सामंजस्याने करण्यासाठी महिला समुपदेशन केंद्रामध्ये जावून मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. मार्गदर्शन घेऊनच पुढचे पाऊल उचलणे महिलांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. परंतु कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन केंद्रांमार्फत शक्यतो कुटुंब एकत्र टिकविण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले जात अाहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या महिला तक्रार निवारण कक्षामार्फत अनेक परिवारांचा समेट घडविण्यात येत आहे. 


यावर्षी ६१५ तक्रारी प्राप्त 
यावर्षीजानेवारीपासून ते आतापर्यंत या कार्यालयाला ६१५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये ४७९ तक्रारींचा निपटारा करण्यात आला असून ११८ तक्रारींची आपसात समेट घडवून आणली आहे. तर १३१ प्रकरणामध्ये तक्रारदारच गैरहजर राहिल्याचे दिसून आले आहे. तसेच ४१ प्रकरणे ४९८ प्रमाणे पोलिस स्टेशन दाखल करण्यात अाली आहे. 

बातम्या आणखी आहेत...