आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भात चार कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या; नापिकी, कर्जामुळे साेलापूर, नाशकातही ‘बळी’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- कर्ज व नापिकीमुळे हतबल चार  शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना शुक्रवारी पश्चिम विदर्भात घडल्या. अकोला जिल्ह्यातील व्याळा (ता. बाळापूर) येथे २४ वर्षीय शेतकरी पुत्राने,  अमरावती जिल्ह्यातील बोर्डी येथे युवा संत्रा उत्पादक शेतकऱ्याने तर सततची नापिकी, डोक्यावर कर्जाचा डोंगर, आजारपणामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या एका ५२ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.कुंभा (जि. यवतमाळ) शिवारातील टाकळीतील शेतकऱ्यानेही विष घेतले. 


बाळापूर  तालुक्यातील व्याळा येथील गणेश वसंत राऊत या २४ वर्षीय शेतकरी पुत्राने गळफास लावून अात्महत्या केली. वडिलांवर असलेले कर्ज व सततच्या नापिकीमुळे हतबल झाल्याने शेतकरी पुत्राने आत्महत्या केल्याची शक्यता आहे.  


युवा संत्रा उत्पादकाने घेतला गळफास

संत्रा उत्पादनातून बसत असलेला फटका, नोटाबंदीमुळे लाखो रुपयांचा संत्रा मातीमोल भावाने विकावा लागला, तर या वर्षी संत्र्याला लागलेली गळती, बँकेचे कर्ज, बहिणीच्या लग्नाची चिंता यातूनच बोर्डी येथील किशोर विश्वनाथ तट्टे (३१) या युवा शेतकऱ्याने परतवाडा येथे आत्महत्या केली. संत्रा बाग उभी करण्याकरिता त्याने कर्ज काढले होते. या वर्षी त्याच्या बागेतील संत्र्याचा १६ लाखांमध्ये सौदा झाला. मात्र संत्र्याला गळती लागल्याने तो केवळ ३ लाखांमध्ये विकावा लागला. त्यामुळे तो तणावाखाली होता. त्यातूनच त्याने आत्महत्या केल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली.  
आसलगावात आत्महत्या  


जळगाव जामाेद-  सततची नापिकी, डोक्यावर कर्जाचा डोंगर, आजारपणासह इतर कारणामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या रवींद्र जगन्नाथ ठोंबरे यांनी आत्महत्या केली. त्यांच्याकडे पोटापुरती शेती आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी या शेतीवर स्टेट बँक कृषी शाखेचे कर्ज काढले होते.  नापिकीमुळे डोक्यावरील कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न त्यांना सतावत होता.  आजार बरा होण्यासाठी त्यांनी बराच खर्च केला. त्यामुळे कर्ज, मुलांचे शिक्षण, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न त्यांना पडला होता. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत.   


तरुण शेतकऱ्याने घेतले विष

- मारेगाव (जि. यवतमाळ) : कुंभा शिवारातील टाकळी गावातील रवींद्र गौतम पोंगळे (४० ) यांनी ७ डिसेंबरला आत्महत्या केली. बोंडअळीमुळे शेतीमध्ये उत्पन्न न झाल्यामुळे ते त्रस्त झाले होते. त्यांच्यावर खासगी कर्ज आहे. आणि यामुळे त्यांनी विष घेतले. रवींद्र यांच्यामागे पत्नी,   मुलगा व वर्षांची मुलगी असा परिवार आहे.


नाशकातही विष घेतले

नाशिक जिल्ह्यातील अस्ताने (ता. मालेगाव) येथील प्रल्हाद नथू आहिरे (६०) या शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून विषारी औषध घेऊन अात्महत्या केली. कुटुंबातील सदस्य शेतात गेल्यानंतर  शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. आहिरे यांची ४ एकर काेरडवाहू जमीन  असून त्यावर स्थानिक सहकारी सेवा साेसायटीचे ७० हजार रुपयांचे कर्ज अाहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुले, सून असा परिवार अाहे.

 

पुढील स्‍लाइडवा वाचा, साेलापूर, नाशकातही शेतकऱ्याची आत्महत्या...

बातम्या आणखी आहेत...