आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत गजानन महाराजांच्या पालखीचे भाविकांनी घेतले दर्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा- श्रीसंत गजानन महाराजांचे नामस्मरण, गण गण गणात बोतेचा जयघोष आणि टाळ-मृदंगाच्या गजरात मोठ्या भक्तीभावात श्रद्धाभूमी ते प्रकटभूमी पायी दिंडी पालखी सोहळ्याचे शहरात आगमन झाले. सजवलेल्या रथात ठेवण्यात आलेल्या संत श्री गजानन महाराज यांच्या पादुकांच्या दर्शनासाठी भक्तांची रीघ लागली होती. धाड नाक्यावर सायंकाळी सहा वाजता पालखीचे आगमन झाले. शोभायात्रेच्या मार्गावर भाविकांनी फुलांचा सडा टाकला होता. पालखीवर भाविकांनी पुष्पवृष्टी केली. सद्गुरू श्री गजानन महाराज पायी दिंडी पालखी सोहळ्यात औरंगाबाद येथील मंदिराचे विश्वस्त मंडळाचे प्रा. श्रीधर वक्ते सहभागी होते. नाक्यावर प्रा. जगदेवराव बाहेकर, रूपराव उबाळे यांच्यासह असंख्य भाविकांनी पूजन केले. 


हातामध्ये भगव्या पताका घेतलेले वारकरी, मुखाने श्री गजानन महाराजांचे नामस्मरण करत, तर विविध भजनी मंडळे टाळ-मृदंगांच्या तालात भजने म्हणत शोभायात्रेत सहभागी झाली. सजवलेले अश्व, त्यांच्या पाठीमागे भजनी मंडळ आणि हाती पताका घेतलेले गजाननभक्त शिस्तीने चालत होते. मुखाने सद्गुरूंचे नामस्मरण करत गजाननभक्त भक्तिभावात तल्लीन होऊन गेले होते. शोभायात्रेच्या मार्गावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. चौक फुलांनी सजवण्यात आले होते. जागोजागी श्रींच्या पालखीचे भक्तांनी पूजन करून दर्शन घेतले. येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात पालखीचा मुक्काम होता. 

बातम्या आणखी आहेत...