आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज उपकेंद्राला आमदार बोंद्रेसह शेतकऱ्यांनी लावली आग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिखली- कृषी पंपाचा खंडित केलेला वीज पुरवठा सुरू करण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बोंद्रे यांच्या नेतृत्वात असंख्य शेतकऱ्यांनी केळवद येथील वीज कंपनीच्या उपकेंद्रावर धावा बोलून कार्यालयाला आग लावली. ही घटना आज २६ डिसेंबर रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे वीज कर्मचाऱ्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेनंतर खंडित केलेला कृषी पंपाचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. 


चिखली तालुक्यातील केळवद, शिरपूर, किन्होळा, वाडी, ब्रम्हपुरी, गिरोला हातणी येथील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा वीज पुरवठा कुठलीही पूर्वसूचना देता वीज कंपनीने खंडित केला होता. पाच दिवसांपासून वीज पुरवठा बंद असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची रब्बी पिके धोक्यात सापडली होती. विशेष म्हणजे, वीज कंपनीने अनेक शेतकऱ्यांना वीज बिले देण्यात आली नाहीत. तर काही शेतकऱ्यांनी वीज भरल्यानंतरही त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. दरम्यान आज या घटनेची माहिती काही शेतकऱ्यांनी आमदार राहुल बोंद्रे यांना दिली. माहिती मिळताच त्यांनी केळवद येथे धाव घेतली. यावेळी आमदार बोंद्रेसह शेतकरी वीज कार्यालयात गेले असता त्या ठिकाणी एकही कर्मचारी किंवा अधिकारी हजर नव्हता. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. 


दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच बुलडाण्याचे कार्यकारी अभियंता रामटेके हे केळवद येथे उपस्थित झाले. यावेळी आमदारांसह शेतकऱ्यांनी त्यांच्यावर प्रश्नाचा भडिमार केला. परंतु बिल भरल्याशिवाय वीज पुरवठा सुरू करता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी वीज कार्यालयाला आग लावली. यावेळी आमदार बोंद्रे यांनी आक्रमक होत जोपर्यंत वीज पुरवठा सुरू होत नाही, तोपर्यंत एकाही अधिकाऱ्याला जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यावर अभियंता रामटेके यांनी दहा मिनिटाच्या आत खंडित केलेला वीज पुरवठा सुरू करण्याचे कर्मचाऱ्यांना सांगितले. 


या आंदोलनात माजी सभापती संजय पांढरे, धाडचे सरपंच रिझवान सौदागर, पंचायत समिती सदस्य प्रभाकर वाघ, रमेश सुरडकर, सरपंच निंबाजी सवडे, संजय गिरी, पिंटू गायकवाड, बाळू साळोख, रामभाऊ जाधव, समाधान शेळके, नामदेव सदार, दीपक जाधव, दिलीप सुसर, अरुण शेळके, अशोक वानखेडे, संजय बाहेकर, भगवान राजपूत, अन्सार भाई, गणेश पांढरे, अशोक पाटील, सुनील पाटील, समाधान पाटील, अमोल कालेकर, सुभाष भोसले यांच्यासह केळवद, शिरपूर, किन्होळा, वाडी ब्रह्मपुरी, गिरोला, कोलारी हातणी येथील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. 

बातम्या आणखी आहेत...