आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इपीएस पेन्शनधारकांचा ५ जुलै रोजी धडक मोर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- कोशियारी समितीच्या शिफारसी नाकारून देशभरातील निवृत्त कर्मचाऱ्यांचा हिरमोड करणाऱ्या सरकारच्या विरोधात इपीएस पेन्शनधारक पुन्हा आक्रमक झाले असून आगामी ५ जुलै रोजी राज्यभर जिल्हा कचेरीवर मोर्चे काढले जाणार आहेत. सरकारविरोधी मोर्चाचा निर्णय पुण्याच्या श्रमिक भवनात पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. कॉ. उदय भट यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीला विविध संघटनांचे पुढारी उपस्थित होते.

 
बैठकीच्या प्रारंभी श्रममंत्री संतोषकुमार गंगवार यांच्याशी झालेल्या चर्चेची मांडणी केली गेली. 'ऑल इंडिया को-आर्डीनेशन कमिटी आॅफ इपीएस-९५ पेंशनर्स'च्या नेतृत्वात दिल्ली येथे ८ मार्च रोजी काढलेल्या मोर्चाप्रसंगी श्रम मंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा केली. परंतु २९ मार्चला सादर झालेल्या त्या चर्चेच्या लेखी वृत्तांतात मात्र कोशियारी समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी साफ नाकारण्यात आली. शिवाय इतर मागण्यांबाबतही सरकार असमर्थ आहे, असे सांगण्यात आले. त्यामुळे को-आर्डीनेशन कमिटीचे पदाधिकारी नाराज झाले असून ही सरळसरळ फसवणूक आहे, या निष्कर्षाप्रत आले आहेत. त्यामुळेच कोशियारी समितीच्या शिफारशी लागू करण्याची आश्वासनपूर्ती आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयांची अंमलबजावणी यासाठी तिन्ही संघटनांच्या सात-सात पदाधिकारी, राज्य परिवहन सेवानिवृत्त संंघटनेचे ३ सदस्य आणि कॉ. राजू देसले हे विशेष आमंत्रित अशी २४ सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. यापुढील सर्व निर्णय ही समितीच घेणार आहे. 


या समितीत महाराष्ट्र श्रमिक संघ संलग्नित पेन्शनर्स संघर्ष समितीचे कॉ. उदय भट, कॉ. अतुल दिघे, कॉ. एम आर जाधव, कॉ. देवराव पाटील, कॉ. के. डी. उपाडे, कॉ. अनंत मालप व कॉ. आनंदराव वायकर, निवृत्त कर्मचारी १९९५ समन्वय समिती नागपूरचे प्रकाश येंडे, प्रकाश पाठक, भीमराव डोंगरे, सुनील नंदनगुरु, चंद्रशेखर पारसी, सत्यप्रकाश जैस्वाल व पुंडलिक पांडे, महाराष्ट्र राज्य पेंशनर्स संघटनेचे गोरख कापसे, एस. एस. वरफळे, सुभाष कुलकर्णी, ज्ञानदेव आहेर, बाबुराव दळवी, अरुण राऊत व बाळासाहेब चव्हाण आणि राज्य परिवहन सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेचे सदानंद विचारे, रमेश गवळी व सुधाकर गुजराथी यांचा समावेश आहे. याशिवाय सर्व प्रश्नांच्या अभ्यासासाठी राजू देसले यांची निवड करण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...