आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात १११६ प्रकरणांतील शेतीची मोजणी करण्याचे काम संथगतीने

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - एकेकाळी महसूल मिळवून देण्यात सिंहाचा वाटा असलेल्या भूमी अभिलेख विभागातील २० पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. परिणामी जिल्ह्यातील १,११६ प्रकरणांमध्ये जमिनीची (शेतीची) मोजणी करण्याचे काम संथगतीने सुरू आहे. विशेष म्हणजे जमिनीच्या मोजणीचे काम उन्हाळ्यात अधिक प्रमाणात केले जाते. आता पावसाळा सुरू होण्यास एक ते दीड महिना राहिला असताना एवढ्या प्रकरणांची मोजणी कशी करावी? असा यक्ष प्रश्न भूमी अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे जमिनीची मोजणी सुकर करण्यास अत्यंत महत्त्वाचे असलेल्या ईटीएस या उपकरणांचाही तुटवडा आहे. 


अर्थ व्यवस्था ही महसूलावर चालते. प्रत्येक देश, राज्य, गावाच्या सीमा निश्चित केल्या जातात. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या खासगी जमिनीच्याही सीमा निश्चित कराव्या लागतात. या अनुषंगानेच ब्रिटिशांनी १८३० मध्ये मोजणीचे काम सुरू केले. यासाठी भूमी अभिलेख विभागाची स्थापना करण्यात आली. यातूनच भूकर व नगर भूमापन व्यवस्था आली. महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात, तालुकास्तरावर भूमी अभिलेख विभाग स्थापन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर १९५१ च्या जिल्ह्याच्या लोकसंख्येनुसार अकोला जिल्ह्याच्या भूमी अभिलेखा विभागाची आस्थापना निश्चित करण्यात आली. जमिनीच्या मोजणीचे काम कधीही संपुष्टात न येणारे असल्याने लोकसंख्या वाढी बरोबर भूमी अभिलेख विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे गरजेचे होते. मात्र, याकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केले. 


विशेष म्हणजे शेतीची मोजणी मोठ्या प्रमाणात केली जाते. शेतीची मोजणी पावसाळ्यात तसेच पिके अस्तित्वात असताना करणे शेतकरी टाळतात. त्यामुळेच शेतीच्या मोजणीची मागणी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे शेतीचे तुकडे होत आहेत, त्यानुसार मोजणीचे प्रमाण वाढले आहे. त्याच बरोबर शेती खरेदी विक्री करतानाही मोजणी केली जाते. अकोला जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात भूमी अभिलेख कार्यालय आहे. मात्र, या कार्यालयात कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. 


भूमापनाची ईटीएस मशीन 
तीन कोटी रुपयांचा महसूल 

मागील आर्थिक वर्षात भूमी अभिलेखा विभागाने जवळपास ३ कोटी रुपयांचा महसूल शासनाला प्राप्त करून दिला. मात्र, शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळवून देणाऱ्या या महत्त्वाच्या विभागाकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. 


ईटीएस उपकरणांची कमतरता : भूमापन सुलभरित्या व कमी वेळेत व्हावे, यासाठी ईटीएस सह विविध उपकरांचा वापर केला जातो. भूमी अभिलेख विभागात जवळपास १४ ईटीएस मशिन आहेत. यापैकी काही मशिन बंद आहेत. विभागात २५ सर्वेअर असल्याने किमान २५ ईटीएस उपकरणांची गरज आहे. 


लोकसंख्येत वाढ : १९५१ च्या तुलनेने आज लोकसंख्येत तीन ते चारपट वाढ झाली आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे शेतीची विभागणीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. परिणामी मोजणीचे कामही वाढले आहे. परंतु लोकसंख्या वाढीच्या तुलनेने कर्मचाऱ्यांची संख्या मात्र अत्यंत तोकडी आहे. 


काम तांत्रिक अन् वेतनश्रेणी बाबुची 
भूमी अभिलेख विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना भूमापनाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना खऱ्या अर्थाने तांत्रिक काम करावे लागते.मात्र काम तांत्रिक तर वेतनश्रेणी मात्र बाबु (क्लर्क)ची दिली जात असल्याने कमी वेतनात जबाबदारीचे काम या कर्मचाऱ्यांना करावे लागते.तर दुसरीकडे बीई, एमटेक झालेल्या कर्मचाऱ्यांना अत्यंत कमी वेतनात काम करावे लागते. 

बातम्या आणखी आहेत...