आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयडीसीमध्ये अग्नितांडव; कापसाच्या गठाणी, सोयाबीन, तूर जळून खाक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- औद्योगिक वसाहतीतील बाभुळगाव कुंभारी रोड वर असलेल्या धान्य गोडाऊनला गुरुवारी सकाळी ११ वाजता भीषण आग लागली. या आगीमध्ये कापसाच्या गठाणी, सोयाबीन व तुरीचा हजारो क्विंटल साठा जळून खाक झाला. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याव्यतिरिक्त शहरात अाज आणखी दोन ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. तिन्ही घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.


अकोला एमआयडीसीत हेडा यांचे वेअरहाऊस आहे. आज २६ एप्रिल रोजी सकाळी शेजारी गवताला लागलेल्या आगीची झळ गोडाऊनला बसली. सुमारे ११ वाजताच्या सुमारास गोडाऊनला आग लागली. आगीने रौद्र रुप धारण केल्यानंतर तत्काळ अग्निशमन विभागाला ११.१५ वाजता माहिती देण्यात आली. माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन विभागाचे प्रमुख रमेश ठाकरे यांनी अग्निशमन दलाचे एक बंब जवानासह रवाना केले. मात्र आग आटोक्यात येत नसल्याचे लक्षात येताच दुसरे आणि तिसरे बंब आग आटोक्यात आणण्यासाठी पाठवण्यात आले. अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने ही आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र संध्याकाळपर्यंत धान्यातून आगीचा धूर येत होता. या आगीमध्ये गोडाऊनमधील कापसाच्या गठाणी, सोयाबीनचे पोते व तुरीचे पोते जळून खाक झाले. संपूर्ण गोडावूनच आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने गोडावूनमध्ये ठेवण्यात आलेला हजारो क्विंटल माल भस्मसात झाला. 


शरीफनगर व भगीरथवाडीत आगीच्या घटना
शहरातील शरीफनगरात दुपारी तीन वाजताच्या सुमारास गादी बनवण्याच्या दुकानाला आग लागली. त्यात रुई जळून खाक झाली. तर दुसरी घटना वाशीम बायपासजवळील भगिरथवाडीत घडली. दोन्ही घटना लोकवस्तीत लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. 


दरम्यान, गुरुवारी संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास शेगाव रोडवरील गायगाव ते निमकर्दा दरम्यान डिझेलचे टँकर पलटी झाले. त्यामुळे अग्निशमन दलाचे बंब दाखल तत्काळ झाल्याने तेथील पुढील अनर्थ टळला. 

 

एमआयडीसीत गवतामुळे लागली आग 
अकोला एमआयडीसी परिसरातील हेडा गोडाऊनला लागलेली आग ही परिसरातील गवताने पेट घेतल्याने लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला. पोलिसांमध्येही संध्याकाळपर्यंत नुकसानीसंदर्भात कोणतीही तक्रार करण्यात आली नव्हती. 


संध्याकाळपर्यंत पोलिसांत तक्रारच नाही? 
आगीतील नुकसानीबाबत निश्चित आकडासमोर आला नाही. वेअरहाऊसमध्ये किती क्विंटल तूर होती, किती क्विंटल सोयाबीन होते व कापसाच्या किती गठाणी होत्या, याबाबत निश्चित आकडा गोडावून मालकाकडून समोर आला नाही. मात्र अशा घटनांमध्ये नंतर इन्शुरन्ससाठी झालेल्या नुकसानीचे आकडे वाढवून सांगत पोलिस स्टेशनला उशिरा तक्रारी करण्यात येतात. आणि पोलिसांतील तक्रारीच्या आधारेच इन्शुरन्सची रक्कम ठरत असल्यामुळेे, पोलिस तक्रारीच्या नोंदीची आवश्यकता लागते. मात्र संध्याकाळपर्यंत याबाबत पोलिसांत तक्रार आली नसल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे ठाणेदार किशोर शेळके यांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...