आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच तासांच्या प्रयत्नानंतर 'आश्लेषा कंपनी' ची आग आली आटोक्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- एमआयडीसीतील आश्लेषा पॉवर कंट्रोल प्रा. लि. कंपनीमध्ये रविवारी रात्री १.४५ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग पाच तासांच्या प्रयत्नानंतर सकाळी सात वाजता आटोक्यात आली. आग विझविण्यासाठी आलेल्या चार पैकी एका वाहनात तांत्रिक बिघाड झाल्याने ते घटनास्थळावरच बंद पडले. दरम्यान मूर्तिजापूर, बाळापूर व पातूर येथील तीन अग्निशमन बंबाच्या मदतीने आग आटोक्यात आणली. आगीत कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. या कंपनीत एलईडी लाइटचे उत्पादन करण्यात येत होते. 


शहरापासून काही अंतरावरील एमआयडीसीमधील आश्लेषा पॉवर कंट्रोल प्लॉटमध्ये रविवारी रात्री १.४५ वाजता भीषण आग लागली. घटनेची माहिती अकोला अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी पाच तासांच्या प्रयत्नानंतर आगीला सोमवारी सकाळी ७ वाजता पूर्णपणे आटोक्यात आणले. या आगीत कोट्यवधींची सामग्री जळून खाक झाल्याची माहिती आहे. एमआयडीसीतील फेज क्रमांक ३ मध्ये धूत यांची आश्लेषा पॉवर कंट्रोल प्लॉट नावाची कंपनी आहे. या कंपनीमध्ये कच्च्या मालापासून एलईडीचे निर्माण करण्यात येते. त्याचबरोबर कंपनीमध्ये अन्य इलेक्ट्रिकल्स सामग्रीचे निर्माण सुद्धा करण्यात येते. रविवारी रात्री १.४५ वाजताच्या दरम्यान फॅक्टरीतून धुराचे लोळ निघताना दिसून आले. क्षणातच पूर्ण कंपनीला आगीने वेढले. येथील कामगारांनी लगेच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे ठाणेदार किशोर शेळके, कंपनीचे संचालक धूत व मनपाच्या अग्निशमन विभागाला दिली. त्यानंतर अग्निशमन विभागाचे प्रमुख रमेश ठाकरे यांनी दोन बंब घटनास्थळी पाठवले. मात्र आगीने घेतलेले रौद्र रूप पाहता मूर्तिजापूर, अकोट, पातूर येथून अग्निशमन दलाला पाचारण केले. कुंभारी येथील सरपंच रवी पोहनकर यांनी त्यांच्या बोअरवेलचे पाणी उपलब्ध करून दिले. आग विझविण्यासाठी २५ टँकर पाण्याचा वापर या वेळी करण्यात आला. आगीला नियंत्रित करण्यासाठी वाहन चालक बाळू घेगाटे, नीलेश सिरसाट, रमेश वायडोले, कैलास गाडगे, जावेद, शैलेश निकोले फायरमॅन दिनेश ठाकूर, विजय राऊत, विनोद रोकडे, विनोद इंगळे, पवन अग्रवाल, दीपक वासनिक तसेच फायर इन्स्पेक्टर यांनी महत्वाची भूमिका निभावली. 


वाहनांना जाण्यासाठी तोडण्यात आली भिंत 
अतिक्रमणाचा विळखा एमआयडीसीलाही असल्याने कंपनीला लागलेली आग विझवण्यासाठी घटनास्थळावर अग्निशमनच्या वाहन पोहोचणे मुश्कील झाले होते. एका बाजूची भिंत तोडल्यानंतर अखेर वाहनाला जाता आले. आगीसारखी दुर्घटना घडल्यास कंपन्यांनी दक्षता घेणे गरजेचे असताना नियमांचे पालन केले नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


अग्निशमन दलाचेे वाहन दुरुस्त करण्यात गेला वेळ 
अग्निशमन विभाग ही अत्यावश्यक सेवा असल्याने तेथील कर्मचारी तत्पर असणे आणि वाहने रेडी असणे गरजेचे असते. कारण केव्हा कुठे दुर्घटना घडेल, हे सांगता येत नाही. एमआयडीसीत आलेली आग विझवण्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलाचे एक वाहन घटनास्थळावर बंद पडले. वाहन दुरुस्त करण्यासाठी कर्मचाऱ्यांची शक्ती खर्ची झाली.

 
एअर ब्लॉक झाल्यामुळे अग्निशमन गाडी पडली बंद 
 एअर ब्लॉक झाल्यामुळे अग्रिशमन दलाचे वाहन बंद पडले होते. दरम्यान तोपर्यंत दुसऱ्या गाड्या काम करीत होत्या. काही वेळानंतर ही बंद पडलेली गाडी दुरुस्त करण्यात आली. इंजिनामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गाडी बंद पडली होती. एवढी मोठी आग आम्ही पाच तासातच आटोक्यात आणली.
- रमेश ठाकरे, प्रमुख अग्निशमन विभाग महापालिका. 

बातम्या आणखी आहेत...