आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान फेलो असलेला माझा मुलगा नक्षलवादी कसा? महेश राऊतच्या आईचा सवाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गडचिरोली - कोरेगाव-भीमा  दंगल भडकवणाऱ्या एल्गार परिषदेचा दाखला देऊन पुणे पोलिसांनी शहरी नक्षलवादी म्हणून अटक केलेल्या पाच जणांमधील महेश राऊत हा युवक केंद्रीय ग्रामीण मंत्रालयाच्या पंतप्रधान फेलोशिप कार्यक्रमातील फेलो आहे. २०१० ते २०१३ या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांसोबत तो काम करीत होता. त्यावेळीही २०११ मध्ये त्याला ‘नक्षल’ समर्थक म्हणून पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. अखेर केंद्रीय ग्रामीण मंत्र्यालयाच्या हस्तक्षेपानंतर त्याला सोडण्यात आल्याची माहिती महेशच्या आई सुनीता राऊत यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.


गडचिरोलीपासून ५८ किलोमीटरवरील वडसा-देसाईगंज येथील गांधी वॉर्डमध्ये महेशचे १५ जणांचे एकत्र कुटुंब आहे. वडील लहानपणी वारल्यानंतर महेशने केंद्रीय विद्यालयातून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. उच्च शिक्षणासाठी आर्थिक परिस्थिती पूरक नसल्याने डी. एड. करून केंद्रीय विद्यालयातच शिक्षक म्हणून नोकरी करीत त्याने पदवी घेतली. पुढे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधून पुढील शिक्षण पूर्ण केल्यावर २०१० मध्ये केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाच्या पंतप्रधान फेलोशिप  कार्यक्रमासाठी त्याची निवड झाली होती.
सन २०१० ते २०१३ दरम्यान, तत्कालीन जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांच्या मार्गदर्शनात महेशकडे भामरागड आणि अहेरी तालुक्यांमधील कामाचा पदभार होता. त्यावेळी आदिवासींच्या प्रश्नांसाठी त्याने सरकारच्या वतीने काम केले. २०१४-१५ मध्ये आदिवासी क्षेत्रासाठी स्वशासनाचा पेसा कायदा लागू झाल्यावर त्याने यावर ग्रामसभांना सक्षम करण्यासाठी स्वतंत्रपणे काम करण्याचे ठरवल्याचे त्याचे परिचित आणि कुटुंबीयांचे म्हणणे आहे. तेव्हापासून तो गडचिरोली जिल्ह्यात ग्रामसभा सक्षमीकरणासाठी काम करत आहे. ग्रामसभांना पेसा कायदा, त्यातील नियम, त्यानुसार आदिवासींचे जल, जंगल, जमिनीवरील हक्क याचे मार्गदर्शन तो करीत होता. मग हे सरकारविरोधी आणि नक्षलवादी काम कसे? असा प्रश्न त्याची बहीण सोनाली राऊत हिने ‘दिव्य मराठी’ शी बोलताना उपस्थित केला. 


२०१३ मध्येही सरकारसोबत काम करत असताना त्याला नक्षल समर्थक 
असल्याच्या संशयावरून गडचिरोली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तेव्हा तत्कालीन केंद्रीय ग्रामविकासमंत्री जयराम रमेश यांच्या कार्यालयातील संदर्भानंतर त्याला सोडून देण्यात आले. आता तर एल्गार परिषद आणि भीमा-कोरेगाव या दोन्ही घटनांशी त्याचा काही संबंध नसताना त्याला विनाकारण गोवण्यात आल्याचे महेशच्या आईचे म्हणणे आहे.

 

काय झाले ६ जूनला

- ६ जूनला सकाळी ६.३० वा. साध्या वेशातील ३० पोलिसांचा ताफा वडस्यातील महेशच्या घरी आला.

- घराच्या झडतीचे वॉरंट दाखवून त्यांनी सगळ्यांचे मोबाइल ताब्यात घेतले
- त्याचवेळी नागपुरात महेशला अटक केल्याचा पोलिसांचा फोन सासरी असलेल्या त्याच्या बहिणीला आला.
- पोलिसांनी आणलेल्या यादीतील व्यक्तींची नावे वाचून त्यांच्या आणि महेशच्या संबंधांबद्दल चौकशी करण्यात आली
- झडती सुरू असतानाच टीव्हीवरील बातम्यांमधून भीमा-कोरेगावप्रकरणी महेशला अटक झाल्याचे त्यांना कळले.
- दुपारी १ वाजेपर्यंत घराची झडती घेऊन पोलिस पथक रवाना झाले.
 
विनाकारण अडकवण्यात आले
माझा मुलगा कोणतेही चुकीचे काम करणारा नाही. तो आदिवासींच्या हितासाठी काम करत आहे. त्याला यात विनाकारण अडकवण्यात आले आहे. जो कायदा सरकारने मंजूर केला त्यासाठी तो काम करतो. भीमा-कोरेगाव आणि एल्गार परिषदेचा आणि त्याचा काहीही संबंधच नाही.  - सुनीता राऊत, महेशची आई
 
अटकेने धक्का बसला
मी महेशला गेल्या पाच-सहा वर्षांपासून ओळखतो. त्याच्या अटकेने आम्हाला धक्का बसला. येथील जल, जंगल, जमिनीच्या मुद्द्यांवर तो आदिवासींमध्ये जनजागृतीचे काम करतो म्हणून त्याला यात अडकवण्यात आले आहे. 
- डॉ महेश कोपुलवर, आरमेरी
 
सरकारची दमनशाही
पेसा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी काम करणाऱ्या महेशचे विचार नक्षलवादी कसे? भामरागड तालुक्यातील बेकायदेशीर मायनिंगविरोधात आमच्या सुरू असलेल्या लढ्यात तो आमच्यासोबत आहे म्हणून त्याला नक्षली ठरवणे ही सरकारची दमनशाही आहे. 
- अड् लालसू नारोटी, सदस्य, जिल्हा परिषद
 
महेशचा काहीही संबंध नाही
मुळात ३१ तारखेच्या एल्गार परिषदेसाठी ही अटक झाली असून त्याचा आणि महेशचा काहीही संबंध नाही. तो त्या वेळी कोलकात्यात त्याच्या मित्रांकडे होता. ते सर्व पुरावे आम्ही कोर्टात देणार आहोत. त्याला कोर्टात आणण्यात आले तेव्हा पोलिसांनी आम्हाला त्याच्याशी बोलूही दिले नाही आणि कोर्टरूममधून बाहेर काढले. 
- मोनाली राऊत, महेशची बहीण
 
 

  हे हि वाचा, पाेलिसांच्या दाव्यानुसार महेशचा पीएम फेलाे ते माअाेवादी कार्यकर्ता प्रवास

बातम्या आणखी आहेत...