आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 वर्षांनंतर शहरात शहरात 'जाणता राजा' या महानाट्याचे आगमन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- १५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर शहरात 'जाणता राजा' या महानाट्याचे आगमन होत आहे. आशिया खंडातील प्रथम क्रमांकाचे ऐतिहासिक व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राचे दर्शन घडवणाऱ्या या महानाट्याचे आयोजन ७ ते १४ मार्च दरम्यान लाल बहादूर शास्त्री स्टेडियम येथे करण्यात आले आहे. विद्यार्थी विकास प्रतिष्ठान या संस्थेद्वारे विद्यार्थी विकास केंद्राच्या मदतीसाठी तसेच शिवचरित्र नुसते आजच्या युवा पिढीच्याच मनात नाही तर प्रत्येकाच्या मनात रुजवण्यासाठी हे महानाट्य आयोजित केल्याची माहिती संतोष नेहरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. 


जाणता राजा हे महानाट्य ५५ फुट उंच रंगमंचावर ३०० कलाकार साकारणार असून,यात हत्ती, घोडे, बैलगाड्या, उंट, पालखींचे सादरीकरण होणार आहे. यात १५० स्थानिक कलावंतांचाही सहभाग राहणार असून, त्यांची तालिम शनिवार पासून सुरू होणार आहे. दहा हजार प्रेक्षकांसमक्ष सादर होणारे हे महानाट्य तीन तासांचे असून, या दरम्यान आतषबाजीचाही आनंद प्रेक्षकांना मिळणार आहे. 


महानाट्याच्या आदल्या दिवशी, ६ मार्च रोजी सर्व कलावंतांसोबत शहरातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. महानाट्याच्या देणगी प्रवेशिका २४ फेब्रुवारीपासून शहरात १५ ते २० ठिकाणी उपलब्ध होणार असल्याचे नेहरे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला विद्यार्थी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत जोशी, आयोजक समिती सदस्य अनिल देशमुख, विशाल जैन, अभिजीत चिने, अमोल राहुलकर, श्रीकांत ढगेकर, विवेक देवकते, अमोल सावंत, जीवन पाटील, संदीप जोशी यांच्यासह पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते. 

 

विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क स्पर्धा 
या महानाट्यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी मोफत आंतर शालेय सांघिक किल्ले बांधा स्पर्धा व जाणता राजा रंगभरण स्पर्धा घेतली जाणार आहे. किल्ले तज्ज्ञ अतुल गुरू हे २४ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता प्रमिलाताई ओक सभागृहात किल्ले बांधा कार्यशाळा घेतील. २५ फेब्रुवारी रोजी लाल बहादूर शास्त्री स्टेडियम येथे ही स्पर्धा होईल. तसेच प्रत्येक शाळेत चार गटात जाणता राजा रंगभरण स्पर्धा घेण्यात येईल. नर्सरी ते सिनीअर केजी, पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते बारावी अशा चार गटात ही स्पर्धा होईल. या स्पर्धा निःशुल्क असून प्रथम, द्वितीय आणि तृतीय व दोन उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते महानाट्याच्या मंचावर प्रदान केले जातील.

बातम्या आणखी आहेत...