आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाचेसाठी 'त्या' आरोपीला ठेवत होते अर्ध्या वस्त्रांवर; मूर्तिजापूर पोलिसांचे किस्से

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- 'लाचेची रक्कम द्यावी म्हणून पोलिस कोठडी दरम्यान मुलाला हाफ पॅन्टवर ठेवले, पांघरायला कांबळ दिली नाही. आमच्या समोर अपमानास्पद वागणूक देेऊ लागले,' असा आरोप आरोपीच्या वडिलांनी मूर्तिजापूर पोलिसांवर केला,' असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणातून सुटलेले पोलिस निरीक्षक व दोन पोलिसांवर कोणतीच कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

 
आरोपीला पोलिस कोठडीत चांगली वागणूक देणे, पुन्हा पोलिस कोठडी न मागता न्यायालयीन कोठडी मिळवून देण्याच्या बदल्यात मूर्तिजापूरचे ठाणेदार देशमुख, पोलिस उप निरीक्षक गणेश कोथळकर, पोलिस उपनिरीक्षक अश्विनी गायकवाड व त्यांच्यात मध्यस्थी करणारा वकील सचिन वानखडे यांनी १ लाख २० हजारांची मागणी केली, अशी तक्रार आरोपीच्या वडिलांनी एसीबीकडे दिली होती. त्यावरून एसीबीने पडताळणी केली. पडताळणीत ठाणेदारांचा उल्लेख न आल्याने ते कारवाईतून सुटले तर पीएसआय कोथळकर, पीएसआय अश्विनी गायकवाड, विधी तज्ज्ञ सचिन वानखडेंची लाच स्वीकारण्याची भूमिका असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. मात्र तक्रारीत कर्मचारी दीपक तायडे व नितीन मगर यांच्याही नावाचा उल्लेख असल्याने आरोपीला अटक करण्यावरून त्यांचे आरोपीच्या काकांशी पैशाचे बोलणे झाले होते. असे असताना प्रशासनाने त्यांच्यावर काय कारवाई केली, की त्यांना क्लीनचिट दिली, यावरून तर्कवितर्क लावले जात आहेत. 


२० लाखांची मागणी, तडजोड १ लाख २० हजारांवर
आरोपी सधन असल्याने पोलिसांनी २५ जाने.ला २० लाखांची मागणी आरोपींच्या काकाकडे केली होती. काका, वानखडेंनी ही रक्कम देण्यास असमर्थता दर्शवली, रक्कम कमी करण्याची विनंती केली, त्यावर कोथळकरांनी पाच लाख, त्यानंतर अडीच, शेवटी एक ते सव्वा लाख आरोपीला सहकार्य, सुविधेसाठी मागितल्याचा उल्लेख तक्रारीत होता. 


...तर ही वेळ आलीच नसती 
लाचेची रक्कम देण्यासाठी आरोपीचे काका ठाण्यात गेल्यावर त्यांना उद्देशून वानखडे यांना पीएसआय गायकवाड म्हणाल्या की, वकील साहेब, आधीच दिले असते तर चालले असते, ही वेळ आलीच नसती, असे म्हणून त्यांनी पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ केली. 


प्रशासकीय कारवाई होईल काय? 
लाच प्रकरणात पोलिस कॉन्स्टेबल दीपक तायडे व नितीन मगर व ठाणेदारांवरही तक्रारदाराने आक्षेप नोंदवल्याने तशी नोंद एसीबीने ठाण्यात दिलेल्या तक्रारीत आली आहे. त्यामुळे या तिघांवर पोलिस अधीक्षक प्रशासकीय कारवाई करणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

बातम्या आणखी आहेत...