आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थायी समितीची सभा ठरली टाय-टाय फिस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- स्थायी समितीने तत्कालीन आयुक्तांनी महापालिका अधिनियमातील कलम ६७ (३)(क)चा वापर करुन जवळपास चार कोटी रुपयाच्या कामांना दिलेल्या मान्यतेबाबत सभेनेच पुढाकार घेवून मंगळवारी आयोजित केलेली सभा टिप्पणी न मिळाल्याचे कारण पुढे करुन स्थगित केली. स्वत: सभा बोलावून सभा स्थगित करण्याच्या या निर्णयामुळे स्थायी समितीने स्वत:चे हसु करुन घेतल्याची चर्चा या निमित्ताने महापालिकेत सुरु आहे.

 
स्थायी समितीला अधिनियमान्वये आर्थिक अधिकार मिळाले आहेत. त्यामुळेच आर्थिक विषया संबंधिचे विषय मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठवले जातात. याच सोबत इतर विषयही स्थायी समितीकडे पाठवले जातात. हे सर्व विषय प्रशासनाकडून स्थायी समितीकडे पाठवले जातात. त्यामुळे संबंधित विषय नेमका काय आहे? मान्यता कशाला हवी आहे? याबाबतची माहिती या टिप्पणीत दिलेली असते. 


मात्र मंगळवारी बोलावलेली सभा ही प्रशासनाने दिलेल्या अथवा पाठवलेल्या विषयांवर बोलावलेली नव्हती. त्यामुळे विषय टिपणीतील विषयाबाबतची टिप्पणी प्रशासनाकडून येणे अपेक्षित नव्हते. कारण सभेतील विषयात तत्कालीन आयुक्तांनी ६७ (३)(क) चा वापर करुन विद्युत, सार्वजनिक बांधकाम आणि पाणी पुरवठा विभागातील चार कोटी रुपयांच्या कामांना दिलेल्या मंजुरी बाबत विषयांचा समावेश होता. परिणामी या अंतर्गत कोण कोणत्या कामांना मंजुरी देण्यात आली याची माहिती या तिन्ही विभागाकडून समितीला पाठवण्यात आली होती. केवळ विद्युत विभागातील काही कामांचा यात समावेश नव्हता. त्यामुळेच मंगळवारी बोलावलेली सभा नेमकी स्थगित करण्या मागचे कारण काय? याबाबत उलट-सुलट चर्चा सुरु आहे.

 
शिवसेना सदस्यांसाठी सभा केली स्थगित ? 
विश्वसनिय सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेने विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याने शिवसेनेचे सदस्य या सभेला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळेच ही सभा स्थगित करण्यात आली. आता ही सभा ३० जानेवारीला घेतली जाणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...