आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जावयाच्या मृत्यूप्रकरणी अखेर खुनाचा गुन्हा दाखल; डोक्यात दारूची बॉटल फोडली, मारहाण केली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- बहिणीला त्रास देणाऱ्या जावयाचा खून करणाऱ्या आरोपी मेव्हण्याविरुद्ध अखेर रविवारी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 


शामराव हरिश्चंद्र चव्हाण (४० रा. तिवसा, ता. बार्शीटाकळी) व पत्नीमध्ये वाद असल्याने पत्नी दोन महिन्यापूर्वीच मुलांना घेऊन रागात माहेरी निघून आली होती. शामराव शनिवारी सकाळी नाशिकहून सासुरवाडी असलेल्या कृषी नगरात पोहोचले. तेथे पतीपत्नीतील भांडण आपसात मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही वेळाने शामराव व मेव्हणा नागेश राठोड दोघे रेल्वे पटरी ओलांडून पीकेव्हीच्या परिसरात गेले. तेथे नागेश आणि जावई शामराव यांनी मद्यप्राशन केले. त्यानंतर माझ्या बहिणीला त्रास देऊ नका, असे नागेश जावयाला समजावून सांगू लागला. मात्र जावई ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर नागेश याने रागाच्या भरात दारूची बाटली जावयाच्या डोक्यात मारली. वाद वाढतच गेल्याने नागेशने शेजारी झाडाची फांदी तोडली आणि तिने जावयाला बेदम मारहाण केली. त्यानंतर तो त्यांना घरी घेऊन आला. त्यानंतर नागेश व त्याचा भाऊ राधेश्याम यांनी जावयाला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. तेथे जावयाचा मृत्यू झाला. 


प्रकरण अंगलट येईल म्हणून नागेशने जावयाचा मृत्यू अपघातात झाल्याचा बनाव करून तीन बंगल्यामागे मृतदेह दिसून आल्याचे नातेवाइकांना सांगितले होते. खदान पोलिसांनी तपास केल्यानंतर खुनाचा गुन्हा उघडकीस आला. त्यानंतर खदान पोलिसांनी घटनास्थळ एमआयडीसीत आहे. म्हणून प्रकरण एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग केले. एमआयडीसी पोलिसांनी तपास केला तर घटनास्थळ सिव्हिल लाइन्स पोलिसांच्या हद्दीत असल्याचे सांगून सिव्हिल लाइन्स कडे वर्ग केले. अखेर सिव्हिल लाइन्स पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. सोमवारी आरोपी नागेश याला पोलिस न्यायालयात हजर करतील. 

बातम्या आणखी आहेत...