आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोला- १० दिवसांपासून पोलिसांसमोर आव्हान असलेल्या जळालेल्या महिलेच्या मृत्यूमागचे कारण शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. महिलेची ओळख बुधवारी पटली. त्यानंतर सात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींनी यवतमाळात महिलेचा खून करून अकोल्यात पोत्यात बांधून आणला मोर्णा नदीत जाळल्याची कबुली दिली आहे. प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्याने प्रेयसीने प्रियकराच्या आईच्या खूनाचा कट रचल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
१८ डिसेंबर रोजी बेपत्ता सुमन नक्षणे यांचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत दगडी पुलाखाली मोर्णा नदीत आढळून आला होता. यवतमाळातील संकटमोचन परिसरात राहणारे रघुनाथ नक्षणे यांनी १८ डिसेंबर रोजी वडगावरोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यात त्यांची आई सुमन रामभाऊ नक्षणे वय ६५ वर्षे या १७ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजतापासून घरुन बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. या तक्रारीवरुन पोलिसांनी सुमन यांचा शोध घेण्यासाठी सर्वत्र माहिती दिली. दरम्यान २७ डिसेंबर रोजी यवतमाळ पोलिसांना अकोला येथे असलेल्या रामदास पेठ पोलिस ठाण्यातील शोधपत्रिका प्राप्त झाली. शोधपत्रिकेतील वर्णन बेपत्ता सुमन यांच्याशी जुळत असल्याने यवतमाळ पोलिसांनी त्यांचा मुलगा रघुनाथ नक्षणे याला सोबत घेऊन बुधवारी रामदास पेठ पोलिस ठाणे गाठले. त्या ठिकाणी मृतदेहाजवळ मिळून आलेले साहित्य आणि साडीच्या कापडाचा तुकडा यावरुन त्या सुमन नक्षणे असल्याचे त्यांच्या मुलाने ओळखले. त्यानंतर रामदास पेठ पोलिस ठाण्यात रघुनाथ नक्षणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अनोळखी व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी प्रकरणाच्या तपासाची चक्रे फिरवताच हा खून रघुनाथ नक्षणे यांच्या संकटमोचन येथील घरी राहणाऱ्या अय्याज उर्फ बबलु खान पठाण यांच्या संकटमोचन येथील घरी नक्षणे यांच्याच घरी राहणाऱ्या प्रियंका धर्मेश पटेल, आशा उर्फ विद्या अढाव ह. मु. राजगुरू अपार्टमेंट वाघापूर हिच्या सांगण्यावरुन केला असल्याची गोपनीय माहिती त्यांच्या हाती आली होती. त्यावरुन या पथकाने या तिघांनाही तातडीने ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्या तिघांनी सुमन नक्षणे यांचा खून केल्याची कबुली दिली. त्यात आशा उर्फ विद्या हिचे रघुनाथ सोबत प्रेम संबंध होते. या कारणावरुन सुमन आणि आशा यांच्यात वाद होत होता. याच वादातून विद्याने सुमन यांचा खून करण्याचा डाव आखला.
सुमन यांचा खून केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी बबलु आणि प्रियंका यांनी संतोष मधुकर गद्रे वय ३७ वर्षे रा. माळीपुरा अकोला, ह. मु. दत्त चौक, यवतमाळ, लखन उर्फ बंडु गोलु जेदे वय २७ वर्षे , सोनु चमन चिग्गारे, वय ३५ वर्षे आणि मनोज उर्फ मनिष अजित तेजस्वी वय २५ वर्षे चौघेही यवतमाळ यांची मदत घेतल्याचे तपासादरम्यान पोलिसांपुढे कबुल केले. त्या चौघांनाही पोलिसांनी अटक केली. त्यांची झडती घेतली असता मृत सुमन यांचे मंगळसूत्र त्यापैकी एकाच्या जवळुन जप्त करण्यात आले. यवतमाळ पोलिसांनी अटक केलेले पुरूष आणि महिला असे सर्व आरोपी गुरूवारी सायंकाळी रामदासपेठचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कांबळे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.