आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम ब्रँच गुन्हेगारांचा कर्दनकाळ; १२० दिवसांत २३२ गुन्हेगार गजाआड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- क्राईम ब्रँच (स्थानिक गुन्हे शाखा)दररोज एक गंभीर गुन्हा उघडकीस आणत असून, दररोज सरासरी दोन अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत आहे. जानेवारी ते एप्रिल या १२० दिवसांत १२८ गुन्हे उघडकीस आणले असून, २३२ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आजपर्यंतची रेकॉर्डब्रेक कारवाई या शाखेने केल्याचे पोलिस रेकॉर्डवरून समोर आले आहे. 


गंभीर गुन्ह्याचा तपास करणारी क्राईम ब्रँच म्हणजेच एलसीबी गुन्हे उघडकीस आणण्याच्या बाबतीत गंभीर असल्याचे दिसून येत आहे. अगदी पोलिस ठाण्याच्या तुलनेत नगण्य मनुष्यबळ असलेल्या या शाखेने दोन वर्षापासून कारवायांचा धडका लावला आहे. जानेवारी ते एप्रिल २०१८ दरम्यानच्या चार महिन्यांच्या आकडेवारीवरून कारवायांचा वाढता आलेख दिसून येत आहे. या दरम्यान क्राईम ब्रॅन्चचे प्रमुख तथा पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या टीमने १२८ गंभीर गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यात त्यांनी २३२ आरोपींना अटक केली आहे. 


या आरोपींकडून ७० लाख ७५ हजार ६९६ रुपयांचा मुद्दे मालही जप्त केला आहे. पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या दोन वर्षाच्या काळात क्राईम ब्रॅन्चने कात टाकली. गेल्या अनेक वर्षापासून या शाखेचा ढेपाळलेला कारभार त्यांनी वठणीवर आणला. धडाकेबाज कारवाया करून त्यांनी गुन्हेगारांना सळो की पळो करून सोडले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या महिन्यातील कारवायांसंदर्भात दोनदा पोलिस अधीक्षकांनी स्वत: दखल घेऊन कारवायांची प्रशंसा केली आहे. 


बॅडमिंटन कोचने केलेले लैंगिक शोषण, विशेष कामगिरी 
बॅडमिंटन कोचने खेळाडू मुलींचे लैंगिक शोषण केले. पीडित मुलीने एसपी राकेश कलासागर यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी या घटनेचा तपास क्राईम ब्रॅन्चचे प्रमुख कैलास नागरे यांच्याकडे दिला. अवघ्या दोनच दिवसात पुराव्यानिशी बॅडमिंटन कोचचे खरे रुप त्यांनी समोर आणले. 


विशेष पथक, क्राईम ब्रॅन्चमध्येच सुरस, पोलिस ठाणे मात्र सुस्त 
पोलिस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आणण्याच्या कारवाया अतिशय मंद आहेत. येथील कर्मचाऱ्यांचा 'एककलमी' कार्यक्रमावर भर असल्याचे दिसून येत आहे. मात्र अशातच कारवायांमध्ये पोलिस अधीक्षकांचे विशेष पथक तर गुन्हे डिटेक्शनमध्ये क्राईम ब्रॅन्चच्या सर्वाधिक कारवाया आहेत. या दोन्ही शाखेच्या कारवाया रेकॉर्डब्रेक ठरत आहेत. 


आम्हाला माहिती द्या, कारवाई करतोच 
अनेकदा शेजारी गुन्हा घडत असतो. मात्र भीतीपोटी नागरिक पोलिसांना माहिती देत नाहीत. मात्र अशा लोकांची गुन्हेगारी कृत्य करण्याची हिंम्मत वाढत जाते. तक्रारदाराला तशी भीती वाटत असेल तर त्यांनी पोलिस नियंत्रण कक्षातील १०० नंबरवर फोन करून किंवा आमच्याकडे थेट तक्रार करावी. आम्ही कुणाचेही नाव उघड करत नाही. आम्हाला माहिती द्या कारवाईची हमी घ्या.
- कैलास नागरे, क्राईम ब्रँच प्रमुख 


ठळक कारवाया अशा 
- खांबावरील वीज तारांच्या चोरांना पकडले 
- बॅडमिंटन कोचने खेळाडू मुलींच्या केलेल्या लैंगिक शोषण गुन्ह्याचा तपास 
- चेन स्नॅचिंग करणाऱ्या चार आरोपींना पकडले 
- घरफोड्या करणाऱ्यांची धरपकड

बातम्या आणखी आहेत...