आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतातील गुलाबी बोंडअळी आता थेट पोहोचली कापूस जिनिंगमध्ये!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खामगाव- शेतकऱ्यांचे हमी पीक असलेल्या कपाशीवर यावर्षी गुलाबी बोंड अळीचा प्रादूर्भाव वाढला असून, कपाशीचे पीक अक्षरशः नेस्तनाबूत झाले आहे. जिल्ह्यातील एक लाख ७५ हजार हेक्टरवरील कपाशीचे पीक बाधित असल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. बोंड अळीने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले असताना हीच गुलाबी बोंड अळी शेतीतून थेट कापूस जिनिंगपर्यंत पोहोचली आहे. तथापि, कृषी विभागाने गुलाबी बोंड अळी नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करत असताना खामगावात क्रॉपसॅप अंतर्गत कापूस जिनिंग मिल्सची पाहणी केली. 


शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून कपाशीकडे पाहिले जाते. जिल्ह्यात कपाशीचे सरासरी क्षेत्र लाख ४४ हजार ४३० हेक्टर असून, खरीप हंगाम २०१७-१८ मध्ये जिल्ह्यात लाख ७५ हजार क्षेत्रात कपाशीची लागवड करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने यावर्षी तरी समाधानकारक पिक येईल, या आशेवर शेतकरी जगत असताना निसर्गाने शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा पार चुराडा केला. उडीद, मूग , तीळ हातचे निघून गेले तर सोयाबीनलाही अपुऱ्या पावसाचा फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा हमी पिक कपाशीवर होत्या. मात्र, बीटी बियाणे असलेल्या कपाशी पिकावर यावर्षी गुलाबी बोंड अळीने आक्रमण करून लाखो हेक्टर क्षेत्र बाधित केले आहे. गुलाबी बोंंड अळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या राज्यभर गुलाबी बोंड अळीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कीटकनाशकांचा वापर करूनही बोंड अळी नियंत्रणात येता आणखी वाढतच आहे. कपाशीची वेचणी सुरू असताना यंदा कपाशीची झळती खूपच कमी आहे. 


पेरणीसाठी लागलेला खर्च सुद्धा निघाला नाही. त्यामुळे शेतकरी पार अडचणीत सापडला आहे. शेतातून वेचणी करून घरी आणलेला कापूस शेतकरी विक्री करत आहे. गुलाबी बोंड अळीने येथेही शेतकऱ्यांचा पिच्छा सोडला नाही. शेतकऱ्यांच्या घरातही गुलाबी बोंड अळी मुक्तपणे फिरताना दिसून येत आहेत. कापूस विकल्यावर हा कापूस जिनिंग मिल्समध्ये पाठवला जात असताना हीच बोंड अळी आता थेट जिनिंग मिल्समध्ये पोहोचली आहे. 


येथील उपविभागीय कृषी अधिकारी एन. के. राऊत, कीड नियंत्रक विलास परिहार, कीड सर्व्हेक्षक पवन टाले, गणेश लोखंडे यांनी एमआयडीसी भागातील सुगोसा जिनिंग मिल, जानकी जिनिंग मिल्सला भेट देऊन पाहणी केली. यावेळी कपाशीवर गुलाबी बोंड अळी तिचे कोष खरेदी केलेल्या कापसामध्ये आढळून आले. गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे कवडीचे प्रमाण अधिक वाढले आहे तसेच यावर्षीच्या तुलनेत मागील वर्षी कापूस चांगल्या प्रतीचा असल्याचा अभिप्राय जिनिंग मिलच्या संचालकानी व्यक्त केला. कपाशी वरील गुलाबी बोंड अळीचा नायनाट करण्यासाठी कृषी विभागाने सर्वोतोपरी पाऊल उचलले असून, शेतापासून तर जिनिंगपर्यंत बोंड अळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. 


कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी कपाशीचे फरदड घेऊ नये 
कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी फरदडीचा कापूस घेता डिसेंबर अखेर कपाशीची झाडे शेतातून काढून टाकावी. ही झाडे तशीच शेतात ठेवता ती कष्ट करावी. जेणेकरून कीडीची अंडी कोष नष्ट करण्यासाठी मदत होईल. 


शेत पाच ते सहा महिने कपाशीविरहीत ठेवणे हा ठरु शकतो एक उपाय 
गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम दोन महिन्याचा असून, या अळीचा जीवनक्रम खंडित करण्यासाठी शेती पाच ते सहा महिने कपाशीविरहीत ठेवणे आवश्यक आहे.'' 
-एन. के. राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी, खामगाव. 


कृषी विभागाचे आवाहन 
शेतकरी हिताच्या दृष्टीने सर्व जिनींग मिल्स संचालकानी गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रम खंडित करण्याच्या दृष्टीने आपल्या जिनिंग मिल परिसरात ४-५ फेरोमॅन ट्रॅप्स लावावेत तसेच एक लाइट ट्रॅप्स लावावे जेणेकरून अळीचे पतंग नष्ट केल्या जातील, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...