आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनपा आयुक्तांना स्वत:च काढावे लागले अतिक्रमण, मनपा कार्यालयालगतच्या अतिक्रमणाचा सफाया

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - महापालिका अतिक्रमण विभागात १६ अधिकारी, कर्मचारी असताना आयुक्त जितेंद्र वाघ यांनी त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन महापालिका कार्यालयाच्या इमारतीलगत गेल्या अनेक वर्षापासून असलेल्या अतिक्रमणाचा सफाया केला. तसेच पुन्हा अतिक्रमण केल्यास मालासह चारचाकी गाड्या जप्त करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला. दरम्यान आयुक्तांनी स्वत: अतिक्रमण हटवल्याने अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांची चांगलीच गोची झाली. 


शहराच्या गांधी मार्ग, खुले नाट्यगृह ते फतेह चौक, टिळक रोड, जैन मंदिर मार्ग, बस स्थानक आदी प्रमुख ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. विशेष म्हणजे महापालिका कार्यालयाच्या इमारतीलगत महापालिकेच्या नाकावर टिच्चून गेल्या अनेक वर्षापासून तयार कापड विक्रीच्या चारचाकी गाड्या व्यवसाय करतात. आता पर्यंत आलेल्या आयुक्तांनी कार्यालया लगतचे अतिक्रमण काढले. मात्र दुसऱ्या दिवशी अतिक्रमण जैसे-थे झाले. त्यामुळे आयुक्त जितेंद्र वाघ यांनी अतिक्रमण हटवले असले तरी ते पुन्हा होणार नाही, याची काळजी प्रशासन घेणार का? अशी चर्चाही या निमित्ताने सुरु आहे. 


आयुक्त जितेंद्र वाघ नियुक्त झाल्यापासून इमारतीलगत असलेल्या अतिक्रमणाकडे त्यांचे लक्ष होते. १९ एप्रिलला कार्यालयातून दोन वेळा बाहेर जाणे-येणे झाल्या नंतर आयुक्त स्वत: त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह महापालिका इमारतीच्या भिंतीपाशी आले. आयुक्तांनी स्वत: अतिक्रमण धारकांना त्वरित चारचाकी गाड्या हटवण्याचे आदेश दिले. त्याच बरोबर पुन्हा अतिक्रमण केल्यास चारचाकी गाड्या जप्त करण्याचा इशाराही दिला. या इशाऱ्यामुळे अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले. दरम्यान, खुले नाट्यगृह ते फतेह चौक या मार्गावरील अतिक्रमण काढण्याचा निर्णयही प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे काही दिवसात अतिक्रमण हटाव मोहिम गाजण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 


अतिक्रमण हटाव विभाग ठरला बिनकामाचा, चिरीमिरी देऊन होते अतिक्रमण 
महापालिका कार्यालयाच्या भिंती लगतचे अतिक्रमण आयुक्त जितेंद्र वाघ यांनी स्वत:काढले. 
अतिक्रमण विभाग अधिकारी, कर्मचाऱ्यांची केली कानउघाडणी 
अतिक्रमण काढल्यानंतर आयुक्तांनी विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कक्षात बोलावले.यावेळी आयुक्तांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांची कान उघाडणी केली. भिंती लगत अतिक्रमण दिसता कामा नये, असा दमही आयुक्तांनी या कर्मचाऱ्यांना भरला. 


माझ्या कक्षालगत व्यवसाय करा 
महापालिका कार्यालयाच्या भिंती लगत अतिक्रमण केले जात असल्याबाबत आयुक्तांनी तीव्र संताप व्यक्त केला. आज कार्यालयाच्या भिंतीपाशी अतिक्रमण केलेत, उद्या माझ्या कक्षालगत व्यवसाय कराल, अशा शब्दात आयुक्तांनी अतिक्रमण धारकांना सुनावले. 

बातम्या आणखी आहेत...