आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन; सुरुवातीपासनू लक्ष देणे गरजेचे; डॉ. उंदिरवाडे यांचा सल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- खरिपाचा हंगाम तोंडावर आला आहे. गेल्यावर्षीच्या हंगामातील पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी अगदी सुरुवातीपासूनच काळजी घ्यावी. गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनास प्राधान्य द्यावे. मुख्य म्हणजे पेरणी वेळेवर करावी, शिफारशीनुसार नत्राचा वापर करावा याकडे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. डी. बी. उंदिरवाडे यांनी शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. 


पेरणी केल्यानंतर ३० ते ३५ दिवसात कापूस निघाल्यावर ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. पुन्हा १५-१५ दिवसांच्या अंतराने फवारणी केल्यास बोंडअळी, रसशोषण करणाऱ्या किड्यांपासून संरक्षण होईल. तसेच ४५ ते ५० दिवसांचे पीक झाल्यावर गुलाबी बोंडअळीच्या निरीक्षणासाठी एकरी २ फेरोमन (कामगंध) सापळे लावावे. त्या सापळ्यातील लूर दर १५-२० दिवसांनंतर बदलावी. प्रत्येक कामगंध सापळ्यात ८ ते १० पतंग सतत ३ दिवस आढळल्यास त्यावर क्युनॉलफॉसची फवारणी करावी. तत्पूर्वी ४५-५० दिवसानंतर जिथे उपलब्ध असेल तिथे ट्रायकोग्रामा या परोपजीवी कीटकाचे एकरी ३ कार्ड शेतात कपाशीच्या झाडाच्या पानाला स्टेपल करावे. दर १५ दिवसाच्या अंतराने ६ ते ७ वेळा करत राहिल्यास त्याचा फायदा होईल. तसेच, निंबोळीची फवारणी व आर्थिक नुकसान पातळी गाठलीच तर आवश्यकतेनुसार क्युनॉलफॉस किंवा २० ते २५ सप्टेंबरच्या दरम्यान ७५ ते ८० टक्क्यावर आर्द्रता असल्यास बिव्हेरिया बॅशियाना या बुरशीनाशकाची फवारणी ४ ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून करावी. त्यामुळे गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करता येईल. गुलाबी बोंडअळी सुरुवातीला फुलांच्या अवस्थेत येत असते. त्यामुळे फुले सकाळी ९ ते १० च्या नंतर उमलायला पाहिजे. तसे न होता गुलाबाच्या कळ्यासारखे पाकळ्याबंद राहत असल्यास त्याला 'डोमकळी' असे म्हणतात. अशा डोमकळ्या सर्वेक्षण करताना शेतकऱ्यांना आढळल्या तर त्या वेचून पूर्णपणे नष्ट कराव्या म्हणजे पुढे त्या वाढणार नाहीत. यासाठी शेतकऱ्यांनी ८ ते १० वेळा सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. 


विद्यापीठाच्या शिफारशींचा अवलंब फायदेशीर 
कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार अंतराने पेरा करावा, नत्राच्या मात्रा द्याव्या जेणेकरून कपाशीची उंची वाढणार नाही. तसेच रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव राहणार नाही. शेतकऱ्यांनी शक्यतोवर शिफारशीत नसलेले ग्रोथ रेग्युलेटर मारण्याचे टाळावे. झाडांची उंची वाढल्यास फवारणी करणाऱ्या व्यक्तीच्या जीवावर बेतू शकते. फवारणी करताना संरक्षित किट, गॉगल, अॅप्रन, हँडग्लोव वापरावे. 


नि:शुल्क प्रशिक्षण 
शेतकऱ्यांनी महिन्यापूर्वी मागणी केली, कीटकशास्त्र विभागाकडून शेतकऱ्यांना ट्रायकोग्रॅमा कार्डस, ते तयार करण्याचे नि:शुल्क प्रशिक्षण देता येईल, असे डॉ. डी. बी. उंदिरवाडे यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...