आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अकोला - मागील आर्थिक वर्षात कोणत्याही महिन्यात मालमत्ता कराचे देयक मिळाले असले तरी ज्या नागरिकांनी मालमत्ता कराचा भरणा केला नाही, त्या थकीत मालमत्ता करावर २४ टक्के व्याज आकारले जाणार आहे. अकोलेकरांकडे ५१ कोटी रुपयाचा कर थकीत आहे. परिणामी व्याजाच्या रकमेतूनच महापालिकेला १२ कोटी पेक्षा अधिक महसूल मिळणार आहे.
मागील आर्थिक वर्षापासून महापालिकेने मालमत्ता करात भरमसाट वाढ केली. ही वाढ करताना अकोलेकरांची पेइंग कॅपॅसिटी लक्षात घेतली नाही. त्यात रस्त्याची वर्गवारी करण्यात आली. मुख्य रस्त्यावरील निवासस्थानांना अधिक प्रमाणात कर आकारण्यात आला. या विषम कर आकारणीमुळे मुख्य रस्त्यावर वडिलोपार्जित जुन्या घरात राहणाऱ्यांना कराचा भरणा करणे जिकरीचे झाले आहे. अशातच महापालिकेने अधिनियमाचा आधार घेत, मालमत्ता कराचे देयक मिळाल्या पासून ९० दिवसाच्या आत मालमत्ता कराचा भरणा न केल्यास प्रति महिना २ टक्के शास्ती (व्याज) आकारण्याचा निर्णय घेतला. मागील आर्थिक वर्षात डिसेंबरपर्यंत नागरिकांकडून व्याज आकारले. मात्र मनपाने जानेवारी महिन्यापासून अभय योजना जाहीर केली. या अभय योजने अंतर्गत व्याज माफ करण्यात आले. मागील आर्थिक वर्षात थकीत वसुली ४० कोटी तर चालु वसुली ५९ कोटी करायची होती. यापैकी एकूण ५० कोटी रुपयाचा मालमत्ता कर वसूल झाला. तर ५१ कोटी रुपये अकोलेकरांकडे थकीत आहेत. आता चालु आर्थिक वर्षात थकीत करासह ११० कोटी रुपयाची कर वसुली महापालिकेला करावी लागणार आहे.
मनपाला व्याजातून मिळणार १२ कोटी रुपये : कराचे देयक दिल्या नंतर ९० दिवसात देयकाचा भरणा न केल्यास पुढे प्रति महिना २ टक्के दराने व्याज आकारले जाते. ज्या नागरिकांना ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्यात देयके मिळाली असतील आणि त्यांनी मालमत्ता कराचा भरणा केला नसेल, ते नागरिक आता देयकाचा भरणा करण्यास गेल्यास त्यांच्याकडून १२ महिन्याचे व्याज आकारले जाणार आहे. म्हणजे थकीत करावर २४ टक्के व्याज आकारले जाईल. महापालिकेला एकूण ५१ कोटी रुपयाचा थकीत कर वसूल करावा लागणार आहे. यावर २४ टक्के व्याज आकारल्यास यातून महापालिकेला १२ कोटी पेक्षा अधिक महसूल प्राप्त होणार आहे.
१२२ कोटी रुपये वसुलीचे मनपासमोर टार्गेट
महापालिकेला चालू आर्थिक वर्ष आणि थकीत असा एकूण ११० कोटी रुपये तर थकीत करावर मिळणारे १२ कोटी रुपयांचे व्याज गृहीत धरता १२२ कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट आहे. यापैकी किती रुपयांची वसुली होते, त्यावर कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देणे निश्चित होणार आहे.
आवळा-देऊन भोपळा काढणार
मालमत्ता कराचा भरणा ९० दिवसाच्या आत केल्यास एकूण मालमत्ता करात नव्हे तर केवळ सामान्य करात ६ ते ७ टक्के सूट देण्यात येते. म्हणजे सूट देताना आवळा द्यायचा आणि व्याज मात्र भोपळ्या प्रमाणे (अधिक) आकारायचे, असा प्रकार सुरु आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.