आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय रणांगण: शिवसेनेसमोर 'पश्चिम'मध्ये आव्हान, पूर्व विदर्भात कमकुवत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला/नागपूर- २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मंगळवारी २३ जानेवारीला केल्यानंतर पूर्व, पश्चिम विदर्भातील राजकीय चर्चांना उधाण आले असून, येणारी निवडणुकीत शिवसेनेसमोर कोणती आव्हाने असतील याचा आढावा घेण्यात येत आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात शिवसेनेची स्थिती कशी राहील यावर टाकलेला दृष्टिक्षेप. 


अकोला : ताकद दाखवणे खडतर आव्हान 
शिवसेना निवडणूक स्वबळावर लढणार अशी घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. या संदर्भात जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार करता शिवसेनेसाठी हे आव्हान ठरणार आहे. गेल्या काही काळात शिवसेनेकडून एकेक मतदारसंघ काबीज करण्यात भाजपने यश मिळवले आहे. 


शिवसेनेने अकोला मतदारसंघात खासदारकीची निवडणूक लढवली नाही. भाऊसाहेब फुंडकरांनंतर खासदार संजय धोत्रे या मतदारसंघात तिसऱ्यांदा विजयी झाले. अकोट, अकोला पूर्व या मतदार संघात शिवसेनेचा वरचष्मा होता. धनुष्य बाणाची ताकद तिथे होती. परंतु अकोट ,अकोला पूर्व हे दोन्ही मतदारसंघ भाजपने काबीज केले. अकोला पश्चिम मतदारसंघात गेल्यावेळी शिवसेनेच्या उमेदवाराला दहा हजाराच्या जवळपास मते मिळाली होती. मनपात शिवसेनेचे ८ नगरसेवक आहेत. त्यामुळे स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाताना शिवसेनेला तळापासून बांधणी करावी लागणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. 


बुलडाणा : शिवसेनेला लढाई जड जाणार 
 जिल्ह्यात भाजप- शिवसेनेच्या युतीमुळे भाजपच्या घाटाखालील मतदारांमुळे शिवसेनेला फायदा हाेत आहे. या वेळी स्वबळावर लढल्यास शिवसेनेला निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे.भाजपचे जिल्ह्यात तीन मतदारसंघावर वर्चस्व आहे शिवसेनेचे घाटावर दोन ठिकाणी आमदार आहेत.शिवसेनेचे बुलडाणा विधानसभा मतदार संघात दोन गटही आहेत. विधानसभा निवडणुकीत बुलडाणा मतदार संघात त्याचा फटका शिवसेनेला बसला .भाजपचे ज्येष्ठ नेते, पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्याकडे उमेदवार म्हणून बघितले जात आहे. त्यामुळे घाटाखाली शिवसेना कमजोर असल्याने शिवसेनेला स्वबळावर ही निवडणूक जड जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जिल्ह्यात घाटावरील बुलडाणा, चिखली मतदार संघात कॉंग्रेसचे वर्चस्व आहे. 

 

यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेपुढे आव्हान 
शिवसेने स्वबळावर लढवच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शिवसेनेची स्थिती पाहिली असता शिवसेनेपुढे काही ठिकाणी मोठे आव्हान राहणार आहेत. यवतमाळ- वाशीम लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. जिल्ह्यातील इतर दोन लोकसभा क्षेत्रापैकी वणी-चंद्रपूर भाजपच्या,हिंगोली-उमरखेड काँग्रेसकडे आहे. येथे शिवसेनेला जोर लावावा लागेले. जिल्ह्यातील ७ विधानसभा क्षेत्रापैकी दारव्हा येथे शिवसेनेचे आमदार आहे. पुसद विधानसभा क्षेत्रावर राष्ट्रवादीचे, यवतमाळ, वणी, केळापूर, उमरखेड, राळेगाव या पाच विधानसभा क्षेत्रावर भाजपची सत्ता आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेला या सहा विधानसभा क्षेत्रात अडचण राहणार आहे. 


अमरावती जिल्ह्यात शिवसेनेला तगडे आव्हान 
शिवसेनेने विधानसभा निवडणूकीत सर्व जागांवर निवडणुक लढल्याचे घोषित केल्यानंतर जिल्ह्यात शिवसेनेला सर्वच मतदार संघात तगडे आव्हान आहे. दर्यापूर मतदार संघातही उमेदवार शोधण्याचेच आव्हान सेनेपुढे उभे ठाकणार आहे. अशीच स्थिती अमरावती शहर, बडनेरा वगळता सर्वच मतदार संघात दिसून येते. अचलपूर, धामणगाव रेल्वे, तिवसा, मोर्शी, मेळघाट, दर्यापूर या तालुक्यात तगडा उमेदवार शोधण्यापासून सेनेला सुरवात करावी लागणार आहे. त्यामुळे आगामी निवडणूक सेनेसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. अचलपूरला आमदार बच्चू कडूंचे वर्चस्व आहे. मेळघाटात स्थानिक स्वराज्य संस्था,ग्रामीण भागात कॉंग्रेस,राकॉचे प्राबल्य आहे. बडनेरात अपक्ष उमेदवार निवडून आला असला तरी येथे मात्र शिवसेनेला संधी े दिसते. तिवसा, धामणगाव रेल्वे मतदार संघ कॉंग्रेसकडे असून यापुर्वीही शिवसेनेला येथे स्थान मिळू शकले नाही. दर्यापूर मतदार संघात सेनेची शक्ती पुर्वीसारखी दिसून येत नसल्यामुळे या मतदार संघातही तगडे आव्हान आहे. यापुर्वी शिवसेनेचे असलेले व भाजपवासी झालेले आमदार डॉ. अनिल बोंडे ही वरुड-मोर्शीत सेनेसाठी आव्हान निर्माण करू शकतात. त्यामुळे निवडणुक सेनेसाठी जिल्ह्यात तगडे आव्हान निर्माण करणारी ठरू शकते. 

 

नागपूर : पूर्व विदर्भात शिवसेनेचा जम बसवता आला नाही 
विदर्भाचा विचार करता पश्चिम विदर्भात शिवसेना प्रभाव राखून आहे. मात्र पूर्व विदर्भात शिवसेनेला जम बसवता आलेला नाही. पूर्व विदर्भात शिवसेनेने प्रभावी नेतृत्वच तयार होऊ दिले नाही. मुंबईहून आयात संपर्क प्रमुखाला प्रदेशाची,माणसांचीही पारख नसते, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे स्वबळाच्या निर्णयाचा विदर्भात फरक पडणार नाही, असे सध्याचे वातावरण आहे. 


विदर्भात शिवसेनेचे चार आमदार, चार खासदार आहेत. त्यातील एक वरोऱ्याचे आमदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर हे आहेत. २०१४ पर्यत भंडारा मतदार संघात नरेंद्र बोंडेकर हे शिवसेनेचे आमदार होते. २०१४ च्या निवडणुकीत ते पराभूत झाले. वर्धेत अशोक शिंदे हे हिंगणघाटचे आमदार होते. त्यांचा मर्यादित प्रभाव आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख पदावरून धुसफूस सुरू आहे. वर्धा जिल्ह्यांत भाजपला आजतरी पर्याय नाही. 


नागपुरात शतप्रतिशत भाजप आहे. रामटेकला अॅड. आशिष जयस्वाल आमदार होते. २०१४ मध्ये ते पराभूत झाले. याशिवाय जिल्ह्यांत शिवसेनेचा प्रभाव नाही. जिल्हा प्रमुखावरून शिवसेनेतील धुसफूस टोकाला गेली होती. त्याची दखल घेत प्रकाश जाधव यांना जिल्हाप्रमुख केले. पण त्याने फरक पडणार नाही. पूर्व विदर्भात शिवसेनेची पकड नव्हती. काही पाॅकेटसमध्ये प्रभाव होता. पण २०१४ नंतर तोही ओसरला आहे. गडचिरोलीत शिवसेनेचा प्रभाव तसाही नव्हताच. 

बातम्या आणखी आहेत...