आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्याच्या होमकुंडात 'त्या तिघींनीही' दिली आहुती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - 'स्वातंत्र्याच्या होमकुंडात सावरकर बंधूंनी सर्वस्व पणाला लावले परंतु त्यांच्या वीर पत्नींचे योगदान कमी मोलाचे नव्हते. 'त्या तिघींनी' देखील या रणसंग्रामात आहुती दिली,' असे प्रतिपादन नागपुरातील सावरकर साहित्याच्या अभ्यासक डॉ. शुभा साठे यांनी केले. 

अ. भा. ब्राह्मण महासंघाच्या युवा आघाडीने स्वा. वि. दा. सावरकरांच्या १३५   व्या जयंतीनिमित्त प्रमिलाताई आेक सभागृहात रविवारी 'त्या तिघी' यावरील व्याख्यानात डॉ. साठे बोलत होत्या. सावरकर कुटुंबातील येसूबाई, यमुनाबाई 'माई' शांताबाई 'ताई' या तिघींचा वीर स्त्रिया असा उल्लेख करुन डॉ. शुभा साठे म्हणाल्या, पतीच्या कार्यात लोपामुद्रेप्रमाणे लोप होऊन जाण्यात त्यांनी धन्यता मानली. एकेकाळी जहागिरी असलेल्या सावरकर कुटुंबावर स्वातंत्र्य चळवळीतील सहभागाने घरावर तुळशीपत्र ठेवायची वेळ आली. बाबाराव सावरकरांना अटक होऊन जन्मठेपेची शिक्षा झाली. तात्याराव बॅरिस्टर होण्यासाठी लंडनला गेलेले. घरावर जप्ती आल्याने घरदार सोडण्याची वेळ कुटुंबातील स्त्रियांवर आली. परंतु प्रत्येक प्रसंगाला त्यांनी तांेड दिले. स्वाभिमानाला तडा जाईल अशी कृती घडणे अशक्य होते. त्या तिघींना डॉ. साठे यांनी त्रिवेणी संगमाची उपमा देऊन त्यांच्या विषयी बोलणे म्हणजे त्रिवेणी संगमाचे स्मरण होय अशा शब्दात त्यांच्या कार्याचा गौरव केला. कुटुंबातील प्रभाकर हाही देवीचे निमित्त होऊन 'खेळायला' निघून गेला अशा प्रसंगाच्या वर्णनाने उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. सावरकरांनी अभिनव भारतमधून युवकांना प्रेरित केले तर त्या तिघींनी 'आत्मनिष्ठ युवती संघ' स्थापन करुन क्रांतिकारकांच्या माता,भगिनी, पत्नींना आधार देण्याचे कार्य केले. येसूबाई त्यासाठी फिरल्या. नाशिकच्या त्रिखंडेश्वर गल्लीतील सावरकरांचे घर क्रांती कार्याचे माहेरघर झाले होते, असा उल्लेखही वक्त्यांनी केला. महासंघाचे प्रदेशाध्यक्ष उदय महा, जिल्हाध्यक्ष संजय देशमुख, शकुनताई परांजपे, जिल्हाध्यक्ष कुशल सेनाड उपस्थित होते. कुशल सेनाड यांनी कार्यक्रमांमागील भूमिका सांगितली. प्रास्ताविक समीर देशपांडे, वक्त्यांचा परिचय सायली देशपांडे, संचालन अनुराग जोशी यांनी केले. वैभव देशपांडेने मर्म बंधातली ठेव ही हे नाट्यगीत गायले. गजानन रत्नपारखी, प्रशांत इंगळेंनी त्याला साथ केली. अनिल कुळकर्णी यांचा अ. भा. नाट्य परिषद कार्यकारिणीत समावेशाबद्दल सत्कार केला. 


२६ नोव्हेंबर १९३७ ला सावरकर पहिल्यांदा अकोल्यात : १९३७ मध्ये रत्नागिरीच्या स्थानबद्धतेतून स्वा. सावरकरांनी दौरा सुरू केला. भारत पिंजून काढला. त्यावेळी २६ नोव्हेंबर १९३७ रोजी सावरकर पहिल्यांदा शहरात आले. श्रीराम नाट्यगृहात सभा झाली. रा. ब. आठल्येंच्या हस्ते सावरकरांचा सत्कार केला. २७ रोजी हिंदू परिषदेला त्यांनी संबोधित केल्याची आठवणही डॉ.साठे यांनी सांगितली. 


'घरोघरी सावरकर' उपक्रम 
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या युवा आघाडीने घरोघरी सावरकर हा उपक्रम हाती घेतला आहे. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या प्रतिमा घराघरात पोहोचवून त्याद्वारे त्यांच्या विविध क्षेत्रातील कार्याची माहिती युवकांपर्यंत जावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. 

बातम्या आणखी आहेत...