आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशिष्ट दुकानाची मक्तेदारी मोडीत; शहरात कोठूनही करता येणार स्वस्त धान्याची उचल!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- सरकारी स्वस्त धान्य दुकानातील धान्य खरेदीसाठी आता विशिष्ट दुकानावर अवलंबून राहण्याची गरज नाही. हव्या त्या दुकानातून त्यांना धान्य खरेदी करता येणार आहे. हे स्वातंत्र्य नव्याने वापरातील पॉइंट ऑफ सेलमुळे (पॉस मशीन) शक्य झाले असून तीव्र गतीने पुढे जात अंमलबजावणी सुरु झालेला राज्यभरातील हा बहुधा पहिलाच प्रयोग आहे. 


जिल्ह्यात एकूण साडे तीन लाख रेशन कार्डधारक आहेत. यात बीपीएलसह २ लाख ५२ हजार प्राधान्य गटातील कार्डधारक असून ५२ हजार शेतकरी आहेत. अंत्योदय श्रेणीतील ४५ हजार कार्डधारकांनाही पोर्टेबिलीटीचा लाभ मिळणार आहे. एपीएल असूनही शेतकऱ्यांना धान्य पुरवठा करण्याचा निर्णय शासनाने यापूर्वीच घेतला. नव्या बदलाने एका विशिष्ट भागात राहणारा व्यक्ती त्याला आवडणाऱ्या दुकानातून धान्य खरेदी करु शकेल. शासनाने सरकारी स्वस्त धान्य दुकानातील रेशन विक्रीसाठी 'पॉस' मशीनचा वापर अनिवार्य केला आहे. त्यासाठी रेशन कार्डधारकांच्या कुटुंबातील काही व्यक्तींच्या बोटांचे ठसे नोंदवण्यात आले आहे. 


बोटांच्या ठशांची ही नोंदणी रेशन दुकानदारांकडील पॉस मशीनमध्येच केली असली तरी तीची अंतिम नोंद एका विशिष्ट सर्व्हरवर केली आहे. विशेष असे की हे सर्व्हर देशभरासाठी एकमेवाद्वितीय आहे. त्यामुळे संबंधित रेशन कार्डधारक कोणत्याही दुकानात गेला आणि त्याने बोटांचा ठसा मशीनवर उमटवला की तो ठसा थेट सर्व्हरवरीला ठशाशी जुळवला जाईल आणि एकदा का तो जुळला की संबंधित रेशनकार्डधारकाला त्या दुकानातून धान्याची उचल करता येईल. जिल्ह्यात अंत्योदय, बीपीएल व प्राधान्य गटातील नागरिकांना स्वस्त धान्य दुकानांतून अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. हे सर्व परंपरागत दुकानांमधूनच धान्याची उचल करतात. परंतु भविष्यात त्यांना 'पोर्टेबिलीटी'चा वापर करता येणार असून रेशनची उचल करण्यासाठी आवडेल त्या दुकानात जाता येणार आहे. अकोल्यातील साडे तीन लाख कार्डधारकांना या नव्या बदलांचा लाभ घेता येईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. 


'पता बदल'अर्जाची गरजच नाही
सध्याच्या व्यवस्थेत एका मोहल्ल्यातून दुसऱ्या मोहल्ल्यात राहायला गेल्यानंतर पता बदलतो. त्यामुळे रेशनचे पूर्वीचे दुकान लांब पडत असल्यामुळे नव्या मोहल्ल्यातील दुकानांतूनच धान्याची उचल करणे अधिक श्रेयस्कर ठरते. यासाठी अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांकडे जाऊन पत्ता बदलाचा अर्ज भरुन द्यावा लागत होता. त्यानंतरच नवे दुकान अलाट केले जात होते. आता ती गरजच उरली नाही. 


दरमहा एक हजाराची वाढ 
पोर्टेबिलीटीचा वापर नवा असला तरी ज्यांना तो माहित आहे, त्यांनी त्याचा लाभ घेणे सुरु केले आहे. प्रायोगिक तत्वावर तीन महिन्यांपूर्वी ही योजना सुरु झाली. दरमहा त्यात नव्या हजार ग्राहकांची वाढ नोंदवण्यात आली आहे. मार्चमध्ये ४ हजार ३८८, एप्रिलमध्ये ५ हजार १४८ तर मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात ६ हजार ८०२ ग्राहकांनी पोर्टेबिलिटीचा वापर केला आहे. 
पुढे काय होणार ? पोर्टेबिलीटीमुळे दुकानाची निवड करण्याचे स्वातंत्र्य ग्राहकाच्या हाती आले आहे. त्यामुळे यापुढे कोणालाही मुस्कटदाबी सहन करावी लागणार नाही. एखाद्या दुकानदाराशी पटत नाही तरीही तेथेच धान्य घ्यायला जावे लागते, अशी सध्याची स्थिती आहे. ती नव्या योजनेमुळे बदलणार आहे. नागरिक खुल्या मनाने हवे तेथून धान्य खरेदी करु शकतील. 


हा सर्व ऑनलाइनचा महिमा 
अन्नधान्य वितरण व्यवस्थेत ऑनलाइन तंत्रज्ञानाने हे शक्य झाले. शहरातील ९५ टक्क्यांहून अधिक दुकानांत पॉस मशीनचा वापर सुरु झाला आहे. त्यामुळे कोणत्या दुकानातून किती अन्नधान्याची उचल झाली, हे कळत असून नागरिकांना कोठूनही धान्य उचलण्याची मुभा प्राप्त झाली. पुढील महिन्यापासून या योजनेची व्याप्ती आंतरराज्यीय होणार आहे. 
- सुभाष शिंदे, अन्नधान्य वितरण अधिकारी, अकोला.

बातम्या आणखी आहेत...