आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुटखा बंदीसाठी 11 जून रोजी आत्मदहन, कंझ्युमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशनचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शासनाने जाहीर केलेली गुटखाबंदी कुचकामी ठरली असून गावागावात गुटख्याची सर्रास विक्री होत आहे. गुटखा माफिया आणि प्रशासनाची साठगाठ यास कारणीभूत आहे. युवकांना व्यसनाधिन करण्याचे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी ११ जून रोजी आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा नॅशनलिस्ट कंझ्युमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष संजय पाठक यांनी गुरुवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिला. 

 

गुटखा बंदी नसताना कमी भावात गुटख्याची विक्री होत होती. मात्र बंदी घातल्यानंतर गुटख्याच्या पुड्या अव्वाच्या सव्वा भावाने विकल्या जात आहेत. बंदी असून नसल्यासारखीच आहे. अकोला जिल्ह्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी गुटखा विक्री होत आहे. अन्न व आैषधी प्रशासनाकडून थातुरमातुर कारवाई होते. परंतु एकाही प्रकरणात आरोपीला शिक्षा झालेली नाही. तेरी भी चूप मेरी भी चूप असा प्रकार सुरू आहे. परंतु गुटख्याच्या सेवनाने युवक बर्बाद होत आहेत. गुटखा बंदी व्हावी म्हणून १३ एप्रिल १८ पासून आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले होते. पालकमंत्र्यांच्या हस्ते उपोषणाची सांगता झाली. परंतु त्यावेळी समिती तयार करण्याचे आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. तसेच जिल्हाधिकारी गुटखा बंदी करण्यामध्ये अपयशी ठरत आहेत. लोकप्रतिनिधींनी हा विषय घेऊन पुढे आले पाहिजे परंतु तसे होत नाही, असेही पाठक म्हणाले. या आंदोलनाची धग महाराष्ट्रात पोहचवू असा इशाराही देण्यात आला. 

 

याप्रसंगी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष गजानन वारकरी, विदर्भ महिला अध्यक्ष टीना देशमुख, जिल्हाध्यक्षा विद्या जावके, संगीता नानोटे, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर विसपुते, जयश्री काळमेघ, डॉ. रेखा घरडे, भारती देशमुख, रामराव उपराटे, संतोष हिरोळकर, सुधीर वाघमारे, दिनेश रत्नपारखी, प्रशांत पेंढारकर, प्रिया पाठक, अमरावती अध्यक्ष कबीर खान, प्रल्हाद गाठेकर, गणेश हरणे, आेमप्रकाश वाडेकर, किरण हिवराळे उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...