आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादमधील शिवसेनेच्या हिंदू शक्ती मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शिवसेनेतर्फे शनिवारी काढण्यात येणाऱ्या हिंदू शक्ती मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. गरज पडल्यास मोर्चेकऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटकही करण्यात येईल, अशी माहिती पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली. दुसरीकडे आम्ही मोर्चा काढणारच, असे खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. 


शहरात झालेल्या दंगलीचा तपास करण्यासाठी पोलिसांकडून एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन करण्यात आले आहे. पथकाने थेट कारवाई करत संशयितांना अटक करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, कारवाई करताना पोलिसांकडून भेदभाव करण्यात येत असल्याचा आरोप करत शिवसेनेने मोर्चाचे आयोजन केले आहे. शनिवारी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्तासह सीआरपीएफच्या सात कंपन्या विविध ठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत. मोर्चाच्या मार्गावर पोलिसांच्या ड्रोन कॅमेऱ्यांतून नजर ठेवण्यात येईल. 


आयोजकांना बजावल्या नोटिसा 
राजकीय पक्षाकडून आयोजित मोर्चाला परवानगी नाकारली आहे. या मोर्चाच्या आयोजकांना कलम १४९ (समान उद्दिष्ट साधण्यासाठी बेकायदेशीर जमावाचा भाग असणे) नुसार नोटिसाही बजावल्या. मोर्चा आयोजित करणाऱ्यांवर, सहभागी होणाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊ शकतात, अटकही होऊ शकते. 
- मिलिंद भारंबे, पोलिस आयुक्त 


शिवसेनेच्या मोर्चाला भाजपचे मदतीने उत्तर 
जुन्या शहरातील दंगलीवरून शिवसेना- भाजपतच राजकारण सुरू झाले आहे. शिवसेनेने शनिवारी आयोजित केलेल्या हिंदू शक्ती मोर्चाला उत्तर म्हणून शुक्रवारी भाजपने मदत फेरी काढून उत्तर दिले. दंगलीत नुकसान झालेल्या १४ नागरिकांना साडेसहा लाख रुपयांची आर्थिक मदत केल्याचे भाजपने सांगितले. खासदार चंद्रकांत खैरे यांनीच हिंदूंचा ठेका घेतला आहे काय? असा सवाल करत भाजप आमदार अतुल सावे यांनी खैरेंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. दंगलीचा राजकीय लाभ उठवणे निषेधार्ह आहे, असा टोलाही लगावला.  


हरिस मृत्युप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदवा 
नवाबपुऱ्यातील मोहंमद अब्दुल हरिस कादरी (१७) याचा दंगलीदरम्यान गोळी लागून मृत्यू झाला होता. त्यामुळे या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मुस्लिम नुमाइंदा कौन्सिलने शुक्रवारी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन केली. दंगलीत सहभागी नसणाऱ्या तरुणांना पोलिसांनी घरात घुसून मारहाण केली. चिथावणी देणारे राजकीय नेते, त्यांना साथ देणाऱ्या पोलिसांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. या वेळी आ. इम्तियाज जलील, जियाउद्दीन सिद्दिकी आदी उपस्थित होते. 

 

बातम्या आणखी आहेत...