आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांची लूट; जादा भाडे आकारणाऱ्या 20 खासगी बसला आरटीओचा दणका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - जादा भाडे दर आकारणाऱ्या खासगी बसचे कमाल भाडे नियंत्रित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रवाशांकडून जादा भाडे आकारणाऱ्या २० खासगी बसेसवर (लक्झरी बस) उपप्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) दंडात्मक कारवाई केली. त्यापैकी ८ खासगी बसेसकडून ३१ हजार १०० रुपये दंड तर ७३ हजार ६४१ रुपये टॅक्स वसुली करण्यात आली. उर्वरित १२ खासगी बसला नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. ही कारवाई स्थानिक रामलता हॉटेल ते पोलिस मुख्यालय दरम्यान करण्यात आली. 

 

एसटीला होणारी गर्दी लक्षात घेऊन अनेक प्रवासी खासगी बसचा पर्याय स्वीकारतात, त्याचा गैरफायदा घेत खासगी बसेस अव्वाच्या सव्वा भाडे आकारून प्रवाशांची लूट करीत होते. यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने खासगी बसचे कमाल भाडे निश्चित करताना विविध मार्गावरील एसटी तिकिट दरापेक्षा कमाल दीडपट भाडे आकारण्याची सवलत खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना दिली आहे; परंतु या आदेशाची अवहेलना खासगी बस संचालकांकडून होत आहे. गर्दीचा हंगाम बघून ते दुप्पट ते तिप्पट भाडे आकारतच आहेत. त्याला लगाम म्हणून अकोला उपप्रादेशिक परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकर यांनी धडक मोहीम राबवली. त्यांनी अकोला शहरातील रामलता हॉटेलपासून तर पोलिस मुख्यालयाजवळील अनिकट येथील खासगी बसेसच्या कार्यालयादरम्यान खासगी बसेस तपासल्या. अशा २० वाहनांची तपासणी केली असता, त्यात एसटीच्या तिकिटापेक्षा दुप्पट ते तिप्पट भाडे आकारल्याचे समोर आले. त्यांनी या खासगी बसेसच्या मालकांना कायदेशीर नोटीस पाठवल्या. त्यापैकी ८ बसेसच्या मालकांकडून एक लाख चार हजार ७४१ रुपये दंड वसूल केला. उर्वरित १२ बसेसच्या मालकांना नोटीस पाठवल्या आहेत. यामुळे प्रवाशांना काहीअंशी दिलासा मिळणार आहे. 

 

जादा भाडे घेतल्याचे कुणी सांगितले नाही 

आरटीओ अधिकाऱ्यांनी २० बसची तपासणी केली. मात्र जादा भाडे आकारल्याची कबुली प्रवाशांनी दिलीच नाही. त्यामुळे आरटीओ विभागाला कडक कारवाई करता आली नाही. यामुळे आरटीओ विभागाची अडचण झाली. मात्र तपासण्यात आलेले तिकिट व एसटीचे भाडे यामध्ये मोठी तफावत आल्याचा ठपका ठेवत आरटीओ अधिकाऱ्यांनी कारवाई केली. 

 

जादा भाडे घेतल्यास प्रवाशांनी काय करावे 
एसटीच्या तुलनेत दीडपटीपेक्षा जास्त दर आकारणाऱ्या खासगी बस विरोधात तक्रार करण्यासाठी नि:शुल्क हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध आहे. प्रवाशांना आपली तक्रार मोटार वाहनविभागाच्या 1800220110 या टोलफ्री क्रमांकावर नोंदवता येणार आहे. तसेच अकोला आरटीओ अधिकाऱ्यांकडे तक्रार करता येणार आहे. 

 

शासन निर्णयापासून प्रवाशी अनभिज्ञ 
गेल्या महिन्यात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी निर्णय घेऊन एसटी बसपेक्षा दीडपट जादा भाडे आकारल्यास खासगी बस मालकांवर कारवाई होईल, असा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाची माहितीच प्रवाशांना नाही. त्यामुळे कुणी तक्रार करण्यास पुढे आले नाही. या बाबत प्रसिद्धीही झाली नसल्याने प्रवाशी अनभिज्ञ आहेत. 

 

काय म्हणाले होते परिवहन मंत्री 
खासगी बसेस कडून प्रवाशांची लूट रोखण्यासाठी परिवहन विभाग सतर्क आहे. असून असे प्रकार निदर्शनास आल्यावर संबंधितांवर थेट कारवाई करण्यात येईल. खासगी बस चालकांकडून जादा पैसे आकारणीच्या तक्रारी प्रवाशांतून येत आहेत. याबाबत परिवहन विभागाला योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार त्यांचे काम गतीने सुरू आहे. याबाबत तक्रारी आल्या की त्याची खातरजमा करून संबंधितांवर थेट परवाना रद्दची कारवाई केली जाईल, असा इशारा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिला होता. 

 

प्रवाशांनी तक्रार केल्यास कारवाई 
एसटीच्या तुलनेत दीडपट भाड्यापेक्षा अधिक भाडे खासगी बस घेत असेल तर आमच्याकडे प्रवाशांनी तक्रार करावी. बसचा क्रमांक, आरक्षण केलेले तिकिट ही माहिती प्रवाशांनी योग्य प्रकारे दिली तर त्यांच्या तक्रारीवर कारवाई करणे अधिक सुलभ होऊ शकेल. 
- विनोद जिचकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अकोला.