आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक; बाटलीबंद पण प्लास्टिकयुक्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाटलीबंद पाण्याचा वापर हा प्रतिष्ठेचा विषय झाला आहे. आपण आरोग्याच्या बाबतीत खूपच सतर्क आहोत आणि बाटलीबंद पाणी हे शुद्धच असते, अशा समजातून या पाण्याचा वापर वरचेवर वाढतच आहे. पण फक्त भारतातच नाही तर जगभरातील ९० टक्के बाटलीबंद पाण्यात प्लास्टिकचे सूक्ष्म कण सापडले आहेत. यात ९ देशांतील ११ मोठ्या ब्रँडचा समावेश आहे. न्यूयॉर्कच्या स्टेट युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी या ब्रँडच्या २७ लॉटमधून २५९ बाटल्यांची तपासणी केली तेव्हा त्यांना हा धक्कादायक प्रकार लक्षात आला. बाटलीबंद पाण्यापेक्षा नळाचे पाणी अधिक सुरक्षित असल्याचे या पाहणीनंतर समोर आले आहे. जगभरातील वेगवेगळ्या १९ शहरांतील नमुने गोळा करून केल्या गेलेल्या चाचणीत १ लिटर पाण्याच्या बाटलीत १०.४ मायक्रोप्लॅस्टिकचे अवशेष सापडले आहेत. भारतातील  ९३ टक्के बाटलीबंद पाण्यात प्लास्टिकचे अंश सापडले आहेत.  


काही वर्षांपूर्वी बाटलीत पाणी विकत घ्यावे लागेल याचा विचारही केलेला नव्हता. त्या वेळी अतर्क्य वाटणारा हा प्रकार गेल्या काही वर्षांत नित्याचा झाला आहे. बाटलीबंद पाणी वापरणे हा प्रतिष्ठेचा विषय झाल्यामुळे ते न वापरणे म्हणजे कमीपणाचे लक्षण समजले जाते. एखाद्या हॉटेलमध्ये किंवा बाहेर कोठेही असे, पाणी नको म्हणत साध्या पाण्याची मागणी केली तर समोरचा धक्का बसल्यासारखे वर्तन करतो. इतके बाटलीबंद पाणी प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत आहे. पण ते खरेच किती उपयोगी आहे यावर गेल्या काही दिवसांपासून बरेच वादविवाद सुरू आहेत. 


साधारणपणे ३ रुपये निर्मिती खर्च असलेले एक लिटर बाटलीबंद पाणी १५ ते २० रुपयांत विकले जाते. हे सगळ्यांना माहीत असतानाही या कमाईवर आश्चर्य व्यक्त करत लोक याच पाण्याच्या वापराला प्राधान्य देत गेले. सगळ्यात आधी सगळ्याच कंपन्यांनी ‘मिनरल वॉटर’ या नावाने आणि या पाण्यात नैसर्गिक घटक आहेत असे सांगत त्याचा प्रचार केला. सगळ्यात जास्त आजार हे पाण्यामुळे होतात तेव्हा शुद्ध पाणी प्यावे असेही बिंबवले गेले. त्यामुळे अगदी खेड्यापाड्यांपर्यंत बाटलीबंद पाण्याचा प्रचार-प्रसार झाला आणि हे पाणी सर्व सामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत गेले. नंतर यातील ‘मिनरल वॉटर’ कसे, असा प्रश्न निर्माण केला गेला. या नावाने कंपन्या फसवत आहेत याबद्दल आक्षेप नोंदवले गेले. त्या वेळीही या गोरखधंद्यावर मोठी टीका झाली. त्यावर मार्ग काढत या कंपन्यांनी ‘पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर’ असा शब्दप्रयोग करत पुन्हा ते पाणी विकण्याचा व्यवसाय अधिकच वाढवला.  


भारतातील बाटलीबंद उद्योगाची उलाढाल २०१२-१३ मध्ये १० हजार कोटींचा आकडा पार करून गेली. त्यात दरवर्षी साधारणपणे २० टक्के वाढ सुरूच असल्याचे सांगितले जाते. याच काळात या पाण्याची जगातील उलाढाल ९ हजार कोटींवर पोहोचली होती.  यातही भारतात मिळणाऱ्या बाटलीबंद पाण्यापैकी फक्त ४० टक्के बाटलीबंद पाणी हे नामांकित आणि सर्वसामान्य ज्याला दर्जेदार समजतात अशा उद्योगात बनवले जाते. त्यांच्या दर्जाच्या बाबतीत ओरड आहेच पण त्यापेक्षा गंभीर बाब म्हणजे उर्वरित ६० टक्के पाणी हे प्रसिद्ध नसलेल्या आणि ज्याच्या दर्जाबाबत कोणतीच शाश्वती नसलेल्या उद्योगात तयार होते. या उद्योगासाठी भूजलाचा अमर्याद वापर होत असल्यामुळे पाण्याची समस्या वाढत आहे. तर दुसरीकडे या उद्योगासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्यांच्या अतिवापरामुळे कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाल्याचे समोर आले आहे. प्लास्टिकच्या कोणत्याही प्रकारात ठेवलेल्या खाद्य किंवा पेयांच्या बाबतीत विशिष्ट तापमानानंतर त्याचा वाईट परिणाम सुरू होतो आणि त्यातून कॅन्सरसारख्या रोगाचा धोका असतो, असे वैद्यकशास्त्र सांगते. त्यामुळे असे खाद्यपदार्थ किंवा पेय घातक आहे हे माहीत असतानाही जनतेला त्याच्या वापराचा मोह आवरत नाही. त्यातून अशा समस्या निर्माण होत आहेत.  


नळाच्या पाण्याला बाटलीबंद पाणी हा कोणत्याच अर्थाने पर्याय ठरू शकत नाही हे वारंवार सिद्ध होत आले आहे. हा गोरखधंदा हा बाजारपेठांच्या नियमाशीही विसंगत आणि धोकादायक असल्याचे सांगितले. पण तो रोखण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले जात नाही ही शोकांतिका आहे. प्लास्टिक बंदीसारख्या सवंग घोषणा अनेकदा केल्या जातात, त्याची जाहिरातबाजीही केली जाते; पण प्रत्यक्षात समाजात सुरू असलेल्या घातक गोष्टी दूर करण्यासाठी लोकांना जागृत करणारी, त्याचे फायदे-तोटे सांगणारी आणि चुकीच्या गोष्टी बंद करण्यासाठी पुढाकार घेणारी कोणतीच यंत्रणा काम करत नसल्यामुळे असे गोरखधंदे वाढत आहेत. चुकीच्या गोष्टींना चूक ठरवून त्ावर अंकुश आणण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.


- सचिन काटे, कार्यकारी संपादक, अकोला 

बातम्या आणखी आहेत...