आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रीय महामार्गावर 5 वाहनांचा झाला विचित्र अपघात, सर्व प्रवासी सुखरूप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मलकापूर- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर मलकापूर - नांदुरा दरम्यान काटी फाट्याजवळ एसटी बस, इनोव्हा कार, रेतीचे टिप्पर, क्रेटा कार व ट्रक अशा ५ वाहनांचा एकाच ठिकाणी विचित्र अपघात झाला. ही घटना आज, २६ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजेदरम्यान घडली. या अपघातात बसमधील ६९ प्रवाशांसह दोन्ही कारमधील प्रवाशी सुरक्षित आहेत. 


दारव्हा आगाराची जळगाव-यवतमाळ बस क्रमांक एम. एच. १४/ बीटी/ ४२९६ प्रवासी घेऊन मलकापूरवरून नांदुराकडे जात असतांना काटी फाट्याजवळ समोर वाहतुक खोळंबलेली असल्याने बस चालकाने बस थांबवली. त्यामागे असणारी जळगाव खान्देश येथील इनोव्हा क्रिस्टा क्रमांक एम. एच. १९/ यु/ ६००३ ही गाडी सुद्धा थांबली. कार मागील मलकापूर येथील वडनेरकडे जाणारे रेतीचे टिप्पर क्रमांक एम. एच. २८/ ७९९९ हे देखील वाहतूक खोळंबल्याने थांबले. त्यापाठोपाठ शिरपूर-धुळे येथील क्रेटा कार क्रमांक एम. एच. १८/ बीसी/ ८०८८ चालकाने समोर वाहतूक थांबली असल्याने आपल्या कारचा वेग कमी करत कार थांबवली. मात्र त्या मागुन भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक क्रमांक यु. पी. १४/ जी. टी./ ५२३३ ने क्रेटा कारला जोरदार धडक दिली. त्यामुळे समोरील सर्व वाहने एकमेकांवर आदळली. अचानक हा प्रकार घडल्याने वाहनांमधील प्रवाशांचे भंबेरी उडाली. यावेळी कारमधील प्रवासी व बसमधील प्रवासी या अचानक घटनेने पुरते घाबरले होते. या अपघातात इनोव्हा कारसह हुंदाई क्रेटा कारचा अक्षरशा चुराडा झाला. काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले. बसमधील प्रवाशांना इतर बसेसमध्ये बसवून रवाना करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच मलकापूर ग्रामिण पोलिस स्टेशनचे कर्मचारी दाखल झाले होते. यावेळी त्यांनी भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक चालकाविरुध्द गुन्हा नोंदवुन ताब्यात घेण्यात आले आहे. एसटी बस, इनोव्हा कार, रेतीचे टिप्पर, क्रेटा कार व ट्रक अशा ५ वाहनांचा एकाच ठिकाणी विचित्र अपघात झाल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघात पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. अपघातामध्ये सर्वच प्रवासी सुखरूप बचावले. 


रस्त्याचे काम सुरु असल्याने वाढले अपघात : राष्ट्रीय महामार्ग ६ च्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे या मार्गावर अनेक ठिकाणी किरकोळ अपघात होत आहेत. तर अनेक अपघातात गंभीर जखमी झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. 


काही काळ मार्गावर वाहतुकीचा खोळंबा 
एका पाठोपाठ एक वाहने धडकल्याने राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीचा पुरेसा खोळंबा झाला होता. घटनास्थळी मलकापूर ग्रामीण पोलिस स्टेशनचे बावने, पवार, कुलकर्णी पोहोचल्यानंतर मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. 

बातम्या आणखी आहेत...